भारताच्या हवाई इतिहासात तीन टप्पे महत्वाचे आहेत. त्यातला पहिला टप्पा हा ब्रिटिश विमानांचा व तो सुद्धा पिस्टन इंजिनांच्या विमानाचा! दुसरा टप्पा हा जास्त वाहतुकीची क्षमता असणारा व मध्यम आणि कमी पल्ल्याच्या विमानांचा आणि तिसरा टप्पा हा जेट विमानांचा. जेट विमानांचा पल्ला हा जास्त कार्यक्षम व लांब होता.
भारतीय मुलकी हवाई वाहतुकीच्या इतिहासात पहिल्या टप्प्यात भारतीय वायुसेनेतील माल वाहतुकीच्या विमानांच्या अंतर्गत भागात सुधारणा करून ती मुलकी सेवेसाठी वापरण्यात आली. उदाहरणार्थ व्हायकिंग व डाकोटा विमानांची उत्तम सेवा मिळाली. मुंबई – दिल्ली हे उड्डाण डाकोटाने आणि दिल्ली-लंडन हे उड्डाण व्हायकिंग वापरून केले जात होते.
मध्यम व छोटया पल्ल्यासाठी प्रथम पिस्टन इंजिन असलेली विमाने होती. त्यांची वाहन क्षमता २०-२५ प्रवाशांची होती. नंतर हर्बो-प्रॉप तऱ्हेची म्हणजे जेट इंजिन असलेली पण प्रॉपेलर बसवलेली होती. त्यामुळे इंधनाची बचत होऊन प्रवाशांची संख्या वाढली. त्यामुळे दर प्रवासी खर्च आणि प्रती किलोमीटर खर्चही कमी झाला आणि उड्डाणांची संख्या वाढली. परंतु जशी प्रवाशांची आणि उड्डाणांची संख्या वाढली तशीच मोठया शहरांशिवाय औद्योगिक आणि शिक्षणदृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या मध्यम शहरांपर्यंतही विमान वाहतूक करण्याची गरज निर्माण झाली. उदाहरणार्थ, पुणे, जमशेटपुर, कोचीन, जबलपूर, नागपूर, अलाहाबाद, गोहत्ती इत्यादी. ही शहरे हवाई प्रवासाने जोडण्याची गरज निर्माण झाली, त्यावेळी बोईंग ७२७-एस किंवा एअरबस -३२०-एस ही विमाने वापरात आली.
आता तर विमान प्रवासाचे भाडे कमी झाल्याने ही सेवा लोकप्रिय झाली. त्यामुळे उच्च आणि मध्यमवर्गीय लोक आगगाडीपेक्षा विमान प्रवासाची निवड करू लागले आहेत. त्यामुळे हा टप्पा एका सामाजिक व आर्थिक क्रांतीशी निगडीत आहे. वाहतुकीचा टप्पा हा आर्थिक परिस्थितीशी निगडीत आहे. फारशा खानपानाची सुविधा नसलेली उड्डाणेही लोकप्रिय झाली कारण प्रवाशांना प्रवास स्वस्तात हवा.
– डॉ. अविनाश वळवडे, पुणे
मराठी विज्ञान परिषदेच्या कुतुहल या सदरातून साभार
डॉ अविनाश वळवडे भारतीय हवाई दलातील उच्च शिक्षित अधिकारी होते. सन २०२१ च्या सुमारास त्यांना देवाज्ञा झाली. २००३ साली ते विश्वकर्मा इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी या कॉलेजचे प्राचार्य होते. त्यांच्या निमंत्रणावरून मी त्या कॉलेजच्या रजिस्ट्रार पदावर काम केले. अत्यंत ज्ञानी, मनमिळाऊ एयर कमोडर पदावरून निवृत्त झाले होते.