इवलीशी काडेपेटी आली कुठून माहितीय का ? अग्नी पेटवण्यासाठी चकमक वापरण्याच्या किचकट मार्गातून सुटका करायला जॉन वॉकर या ब्रिटिश शास्त्रज्ञानं काड्यापेटीचा शोध लावला. माचिस बाजारात आली त्याला आज तब्बल १९१ वर्षं झाली. या मेणाच्या पृष्ठभागावर घासुन ज्वाला निर्माण करणारी काडेपेटी जॉन वॉकरने तयार केली, अन ७ एप्रिल १८२७ ला पहिली काडेपेटी जगाच्या बाजारात आली. दैनंदिन जीवनात गरजेची ठरलेल्या काडीपेटीचा जगभर वेगानं प्रसार झाला. आजही बहुतेकांच्या किचन ओट्यावर ती हाताशीच ठेवलेली असते. ८० च्या दशकात काडेपेटीच्या वैविध्यपूर्ण कव्हर्सचा संग्रह करायचा अनेक जणांना नाद होता त्यातीलच एक मुलुंडच्या सज्जनवाडीत राहणाऱ्या नंदकुमार देशपांडे यांनी गेल्या ४० वर्षांपासून हा छंद जोपासलाय. त्यांनी निरनिराळ्या प्रकारच्या तब्बल सहा हजार काडेपेट्या जमवल्यात. त्यात आपल्याकडच्या सर्वात जुन्या ‘अनिल’ ब्रॅण्डसोबतच अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सचिन तेंडुलकर, अझरुद्दीन, श्रीदेवी यांची चित्र असलेल्या वैशिष्ठयपूर्ण माचिस आहेत. स्वीडन, इंडोनेशिया, पाकिस्तान, चीन, जपान, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रिया या देशातल्या त्रिकोणी,चौकोनी, आयताकृती अन लिपस्टिक, बॅटरी सेलच्या आकाराच्याही काडेपेट्या त्यांच्या संग्रहात आहेत. त्यातल्या रिकाम्या काड्यांतून आयफेल टॉवरची प्रतिकृती उभारून एका प्रदर्शनात त्यांनी लक्ष वेधून घेतलं होतं….
आपल्याकडं शिवकाशीला काडेपेटी उत्पादनाचाही मोठा उद्योग आहे. केरळातल्या कोचिमध्येही हे कारखाने आहेत. हजारो लोकांचं पोट या उद्योगावर अवलंबून आहे. अलीकडच्या काही वर्षांत गॅस लायटर्सचं प्रस्थ बरंच वाढलं.
धुम्रपानविरोधी मोहीम जगभर सुरू झालीय. त्याचा परिणाम काडेपेटी उद्योगांवर झालाय. वार्षिक तब्बल दीड हजार कोटींची उलाढाल असलेल्या या उद्योगात दहा वर्षांत पंचवीस टक्क्यांनी घट झालीय. माचीस बनवणारे ८ हजार कारखाने बंद पडलेत. पूर्वी आपण पाकिस्तान आणि आफ्रिकेतही माचिस निर्यात करायचो. आता पाकिस्तानमध्ये हा उद्योग सुरू झालाय. त्यांच्या स्वस्त दरामुळं आफ्रिकन देश त्यांच्याकडून काडेपेट्या आयात करतात. आपल्याकडं ‘विमको’ ही काडेपेटी उत्पादन करणारी प्रमुख कंपनी. त्यांचे ‘एम’, ‘आय नो ‘, ‘होम लाईट’,’शिप’ हे माचीस ब्रँड सर्वांनीच कधी ना कधी हाताळलेत यात शंकाच नाही.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
छायाचित्र सौजन्य: बीबीसी
पुणे.
Leave a Reply