स्वातंत्र्याच्या वाढदिवशीं सुंबरान मांडलं ऽ
आजपुरतं आनंदाला आवतान धाडलं ऽ ।।
रोज-रोज रडन्याचा कट्टाळा आला रं
येका दिवसापुरतं दु:ख खोलखोल गाडलं ऽ ।।
आयतं मिळालं म्हनुन, किंमत न्हाई रं त्याची
ठाऊक हाये कां रं, रगत किती सांडलं ऽ ?
धर्माच्या कुर्हाडीनं आईचं तुकडं कां ?
सांग की रं, कशासाठी भाऊ-भाऊ भांडलं ऽ ?
जातपात अन् जमात, वाढतात अंतरं ऽ
आरक्षन हें कारन, लहान-मोठं तंडलं ऽ ।।
कोन जाइल खड्ड्यात, अन् वरती राहील कोन ?
आपनऽच पडूं , जिथं आपनऽच खांदलं ऽ ।।
देश किती जाइल पुढं, करा इचार, खरा इचार
जर समदं याच्यापुढं एकोप्यानं नांदलं ऽ ।।
– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
Leave a Reply