गुंतवणुकीचे दोन प्रकार असतात . एक सक्रिय आणि दुसरी निष्क्रिय गुंतवणूक सक्रिय प्रकारात फंड व्यवस्थापक एक पोर्टफोलिओ बनवतो . बाजारातील चढ – उतारांप्रमाणे आणि आपल्या आकलनानुसार त्यात बदल करतो . बेंचमार्क निर्देशांकापेक्षा जास्त परतावा मिळवून देणे हा अशा गुंतवणुकीचा उद्देश असतो . त्याउलट निष्क्रिय गुंतवणुकीत गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ कायम राखण्याचे धोरण असते . भारतातील बहुतेक इक्विटी फंड सक्रिय गुंतवणुकीच्या प्रकारात मोडतात . निष्क्रिय गुंतवणूक इंडेक्स फंडाची श्रेणी जगभरातील गुंतवणूकदारांत लोकप्रिय आहे . हे फंड आणि त्याची उपयोगिता याबाबत …
इंडेक्स फंड म्हणजे काय :
इक्विटी म्युच्युअल फंडावर आधारित अप्रत्यक्ष गुंतवणुकीचा मार्ग म्हणजे इंडेक्स फंड होय . एखाद्या निर्देशांकातील समभागात गुंतवणूक करून एकाच निर्देशांकावर यात भर देण्यात येतो . समजा एखाद्या कंपनीच्या निर्देशांकातील भार १० टक्के आहे , तर इंडेक्स फंडातही त्या समभागाचा तेवढाच भार राहतो . जो बेंचमार्क आहे , त्या निर्देशांकाची बरोबरी साधणे हा या फंडाचा उद्देश असतो .
फायदे काय :
अशा प्रकारच्या योजना अद्याप भारतीयांत तेवढ्या लोकप्रिय नाहीत . मात्र , त्याचे फायदे जाणून घेणे महत्त्वाचे आहे .
१. एक्स्चेंजवर व्यवहार :
या योजनांमध्ये गुंतवणुकीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हे फंड शेअर बाजारात नोंदणीकृत असतात . त्यावर कोणीही कोणत्याही वेळी ट्रेडिंग करू शकतो.
२. कमी खर्च :
हा निष्क्रिय स्वरूपाचा फंड आहे आणि याची खरेदी – विक्री केवळ बाजारातच होते . त्यामुळे इंडेक्स फंडासाठी कमी खर्च येतो . या उलट सक्रिय प्रकारच्या डायव्हर्सिफाइड इक्विटी फंडाच्या व्यवस्थापनासाठी कमाल २ ते २.५ टक्के खर्च येतो . तर इंडेक्स फंडात १ ते १.५ टक्के खर्च येतो .
३. कमी नुकसान :
हे फंड बेंचमार्क इंडेक्सप्रमाणे असतात . त्यामुळे संबंधित पोर्टफोलिओमध्ये कमीत कमी बदल होतात . यामुळे पोर्टफोलिओतील बदलांमुळे होणारा खर्च वाचतो . त्याशिवाय व्यवस्थापन कंपनीला या फंडासाठी फंड व्यवस्थापकावर विसंबून राहण्याची गरज भासत नाही . सक्रिय प्रकारच्या गुंतवणूक योजनांत योग्य निर्णयासाठी फंड व्यवस्थापकाच्या कौशल्यावर सर्व काही अवलंबून असते . इंडेक्स फंडात जोखीम नसते त्यामुळे व्यवस्थापकाला बाजारातील कलानुसार निर्णय बदलण्याची गरज नसते .
लोकप्रियता का नाही ?
भारतीय गुंतवणूकदारांत अप्रत्यक्ष गुंतवणुकीचा हा प्रकार फारसा लोकप्रिय नाही . फंड मॅनेजमेंटच्या कौशल्यामुळे बेंचमार्कला मागे टाकण्याची शक्यता असते . त्यामुळे इंडेक्स फंडातून मिळणाऱ्या कमी परताव्यामुळे गुंतवणूकदार फारसे आकर्षित होत नाहीत . या श्रेणीत फरकही खूप आहे . ट्रॅकिंग एररद्वारे हे समजून घेता येते . झालेला खर्च आणि फंडाने दिलेला परतावा मोजण्याचे ट्रॅकिंग एरर हे एक प्रमाणक आहे . खर्च जेवढा जास्त तेवढी ट्रॅकिंग एरर जास्त असेल आणि त्या फंडाचा परतावा कमी असेल . सक्रिय फंडाच्या तुलनेत इंडेक्स फंडात जोखीम अत्यंत कमी असते . त्यामुळेच सक्रिय फंडात फंड व्यवस्थापकाचा एखादा निर्णय चुकल्यास गुंतवणूकदाराचे जास्त नुकसान होऊ शकते . या उलट इंडेक्स फंडाच्या बाबतीत ही शक्यता अत्यंत कमी असते .
यात गुंतवणूक करावी का ?
इंडेक्स फंड हे गुंतवणुकीचे उत्तम साधन आहे . जास्त जोखीम उचलण्याची तयारी नसेल तर इंडेक्स फंड एक चांगला पर्याय आहे आणि यात बेंचमार्कच्या बरोबरीने परतावा मिळण्याची शक्यता असते . एवढेच नव्हे तर , जास्त जोखीम असणाच्या गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओला इंडेक्स फंडामुळे संरक्षण देण्यास मदत होते.
–व्यास टीम
Leave a Reply