नवीन लेखन...

कॅनडातील भारत

सरी (कॅनडा) बैसाखीतील एक दृश्य

मी कॅनडातील विविध पर्यटन स्थळांना भेटी दिल्या. प्रत्येक ठिकाणी एखाददुसऱ्या भारतीय कुटूंबाची हमखास भेट व्हायची. तसा कॅनडा हा संमिश्र संस्कृतीचा देश आहे. नवे जग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिका खंडातील विस्तारने सर्वात मोठा असलेल्या या देशात जगातील विविध देशांच्या लोकांनी येऊन वास्तव्य केले. येथे निर्विवादपणे गोऱ्या… इंग्रजांचे वर्चस्व असले तरी चीनी व भारतीयांची संख्या निश्चितच नगण्य नाही. कॅनडातील हॅलिफॅक्स, सेंटजॉन, टोरेंटो, व्हँकुव्हर, सरी व डेल्टा शहरात मी कमी-अधिक काळ घालविला. मी जिथे, जिथे जाईन तिथे भारतीयत्व शोधण्याचा प्रयत्न करीत होतो. अधून-मधून भारतीय लोकांची भेटही व्हायची. त्यांच्याशी बोलून आपल्या माणसात आल्यासारखे वाटायचे. टोरेंटो, व्हँकुव्हर, सरी नि डेल्टा शहरात भारतीय, त्यातल्यात्यात पंजाबी लोकांची संख्या लक्षणीय असल्याचे आढळून आले. तिसऱ्या दौऱ्यात कन्येच्या घरी डेल्टामध्ये मी रहात होतो. या शहरात तर 40 टक्के लोक भारतीयच आहेत. इथे फिरतांना प्रदेश वेगळा असला तरी पंजाबी व हिंदी भाषा बोलणारे लोक अधिक संख्येने आढळून यायचे. दुकानात, हॉटेलमध्ये हिंदीतच व्यवहार चालायचे. त्यामुळे भारतातल्याच एका प्रांतात असल्यासारखे वाटायचे.इथे रहाणारे लोक भाषा, प्रांतभेद विसरून भारतियत्वाच्या भावनेने एकत्र रहाताना दिसतात. आपली संस्कृती जपतात. व्हँकुव्हर, सरी, डेल्टा परिसरात रहाणाऱ्या मराठी लोकांनी तर मराठी मंडळाची स्थापना केली आहे. या संघटनेच्या माध्यमातून विदेशातही मराठीपण जपण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

पहिल्या भेटीतील पहिल्या आठवड्यात आम्ही हॅलिफॅक्समधील एका उपहारगृहात गेलो. एका भव्य व्यापारी संकुलात असलेल्या  या उपहारगृहाचे नाव होते ‘दी टेस्ट ऑफ इंडिया’ ! नावात कल्पकता नि दूरदृष्टी  होती. भारतीय खाद्य संस्कृतीने उपहारगृहाची नाळ भारतीयांशी जोडली होती. एका भव्य हॉलमध्ये ग्राहकांना बसण्यासाठी टेबल, खुर्च्यांची व्यवस्थीत मांडणी केलेली. स्वच्छता व निटनेटकेपणा डोळ्यात भरण्यासारखा ! मध्ये हॉल नि चारी बाजूना भारताच्या विविध प्रांतातील विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स् …. सेल्फसर्व्हीसचाच प्रकार!  भारतातील विविध संस्कृत्या इथे एकत्र आल्या होत्या. कोणी होते मराठी, कोणी तमिळ, तेलगू, पंजाबी …. !  भारतातल्या संमिश्र संस्कृत्यांचे इथे दर्शन घडले. कॅनडातल्या भारतात आल्यासारखे वाटले.

टोरेंटो हे कॅनडातील सर्वात मोठे व औद्योगिक शहर. इथेही भारतीय व चीनी लोकांची संख्या मोठी आहे. टोरेंटोत गेल्यानंतर त्याचा प्रत्यक्ष अनुभवही आला. शहरातील भारतीय वसाहतीच्या भागात आम्ही गेलो नि एकंदर वातावरण पाहून आश्चर्य वाटले. बाजारपेठेत सुध्दा भारतीय पध्दतीची दुकाने थाटलेली ! विदेशातील मॉल संस्कृती या भागात क्वचितच होती. रस्त्यावर, दुकानातून इंग्रजीपेक्षा हिंदी बोलणारे लोकच अधिक! येथील बॉंबे चौपाटी नावाच्या हॉटेलमध्ये आम्ही गेलो. खाद्यपदार्थ तर भारतीयच होते, शिवाय मालक, वेटर आणि ग्राहकसुध्दा हिंदीच बोलत होते. ऐकून बरे वाटले.
टोरेंटोमधील तीन दिवसाच्या वास्तव्यात फिरण्यासाठी आम्ही टॅक्सी केली होती. सर्व टॅक्सी चालक भारतीयच होते. 20-25 वर्षापूर्वी येऊन ते इथे स्थायिक झाले होते. टोरेंटोमधील भारतीयांची निश्चित आकडेवारी समजू शकली नाही, परंतु एकूण लोकसंख्येत त्यांचा वाटा निश्चितच नगन्य नव्हता. या शहराच्या आर्थिक प्रगतीत भारतीय लोकांचे मोठे योगदान आहे.

कॅनडातील वास्तव्यात मी अनेक गोष्टी पाहिल्या, जाणून घेतल्या. अनेक गोष्टी मला भावल्या, माझ्यावर प्रभाव टाकून गेल्या. परंतु जिथे जाईन तिथे माझं मन कांही तरी शोधीत होतं. नेमक काय हे उमगत नव्हत; परंतु पुढे हळुहळू सारं माझ्या लक्षांत आलं. ते कॅनडातील भारत शोधीत होतं. 

गोऱ्यांच्या प्रभावाखालील या देशात संमिश्र संस्कृती आहे. चीनी व भारतीय संस्कृतीचा इथे मोठा प्रभाव आहे. इथल्या कांही भागात भारतीय संस्कृती दुर्लक्ष करण्यासारखी निश्चितच नाही, हे लक्षात येण्यास वेळ लागला नाही. प्राचीन काळापासून या नव्या जगताचा भारतांशी ऐतिहासिक संबंध असावा, असे मला सारखे वाटे. मात्र त्याचे नेमक कारण समजत नव्हते. भाषा बदलली की संस्कृती बदलते म्हणतात. मला इथे अगदी उलटा अनुभव आला. इंग्रजीच्या साम्राज्यात लोकांवर इंग़्रजीचा प्रभाव निश्चितच  आहे, परंतु भारतीय संस्कृतीला ते विसरलेले नाहीत. त्यांच्या नसानसात स्वदेशाभिमान आहे. कॅनडात फिरतांना अनेक भारतीयांशी गाठीभेटी झाल्या. त्यांच्या बोलण्यातून, कृतीतून स्वदेशप्रेम दिसून आले.

भारतात जात, धर्म, भाषा भेदातून अनेकवेळा संघर्ष होतात; परंतु इथे सगळे भेद विसरून केवळ स्वदेशीच्या भावनेतून सारे एकत्र येतांना दिसतात. संस्कृतीच्या माध्यमातून त्यांनी  सहकाराची आणि संघटनेची भावना जपली आहे.

कॅनडात रहाणारे पाकिस्तानी सुध्दा भारतीयांशी तेवढ्याच आपुलकीने, आपली माणसे असल्याच्या भावनेतून रहातांना आढळून येतात, याचे कौतूक वाटते. एक दिवस संध्याकाळी सौभाग्यवतींसह फिरण्यासाठी  हॅलिफॅकेसच्या बीचवर गेलो. ऑगस्ट महिना होता, त्यामुळे अजून धरती गोठविणारी थंडी नव्हती. मात्र बोचरी थंडी अंगाला झोंबत होती. त्यात अटलांटिक महासागराच्या किनारपट्टीवर फिरण्यात एक आगळाच आल्हाद वाटायचा. त्यात गरमगरम कॉफिचे घुटके घेत समुद्र किनाऱ्यावरून फिरण्याची मजा कांही औरच!

तासभर टाईमपास केला नि घरी निघालो. चाळीशीतील एक सुंदर स्त्री आपल्या दोन मुलांसह आमच्या पुढे-पुढे जात होती. तिला पाहिल्य़ावर ती गोरी बाई नाही हे समजण्यास आम्हाला वेळ लागला नाही. भारतीय लोक कितीही गोरे असले तरी त्यांची ओळख लपत नाही. समोरची बाई भारतीय असावी असा माझा समज. आम्हाला पाहून ती थांबली नि कांहीशा सहानुभूतीच्या स्वरात म्हणाली,

‘आर यु इंडियन ?’

भारतीय माणूस कुठेही गेला तरी त्याला भारतीयत्वाची ओळख करून द्यावी लागत नाही. त्यात माझ्या पत्नीने परिधान केलेली साडी हा भारतीयत्वाचा ट्रेडमार्क होताच. त्यामुळे आम्ही भारतीय असल्याचे ओळखण्यात अडचण येण्याचे कारण नव्हते. तिच्या प्रश्नावर मी म्हणलो,

‘याऽ !’ त्याबरोबर ती हिंदीत बोलू लागली,

‘अच्छा लगा अपको मिल के।’

‘आप इंडियासे हो ?’ माझ्या प्रश्नावर तीने नकारार्थी मान हलविली नि म्हणाली,‘मै पाकिस्तानी हूं । लेकीन हम यहॉं इंडियन और पाकिस्तानी अपने आपको अलग नही मानते। भाईबहन, भाईभाई जैसेही रहते है।’ तिने कॅनडातील आपले बरेच अनुभव सांगितले. ऐकून बरे वाटले. हीच भावना पाकिस्तानमध्ये रहणाऱ्या लोकांमध्ये असती तर……

***
आम्ही सेंट जॉनमध्ये किल्ला (फोर्ट) पहायला गेलो होतो. सेंट जॉन नदीच्या शेजारी एका उंच टेकडीवर किल्याचे कांही अवशेष आहेत. टेकडीच्या पायथ्याजवळ एक शिलालेख दिसला. त्यावर ‘इंडियन वार’ असा कांहीसा उल्लेख आहे. तो वाचल्यानंतर भारताचा कॅनडाशी कांही ऐतिहासिक संबंध असावा असे वाटून गेले. हे “इंडियन वार’ नेमके काय, याचा मी विचार करू लागलो. त्याविषयी जाणून घेण्याची तेवढीच उत्कंठा लागली. दोन दिवसानंतर कन्येसोबत सेंट जॉनच्या सार्वजनिक वाचनालयात जाण्याचा योग आला. वाचनालयात कॅनडाच्या प्राचीन ईतिहासाच्या तीन सीडी (चित्रफीत) मिळाल्या. हॅलिफॅक्समध्ये गेल्यानंतर तिथल्या वाचनालयातून कॅनडाच्या प्राचीन इतिहासाची दोन पुस्तकेही आनली. सीडी पाहून व पुस्तक वाचून कांही गोष्टींचा मला उलघडा झाला.

कोलंबस समुद्रमार्गे भारताला यायला निघाला; पण योगायोगाने तो अमेरिका खंडाच्या किनारपट्टीवर येऊन पोहोचला. त्याने एका नव्या खंडाचा शोध लावला म्हणून लोक या खंडाला नवे जग म्हणू लागले. अमेरिका खंडाच्या शोधानंतर जगातल्या सगळ्याच देशातून….., बहूसंख्येने युरोपमधून लोक येऊन इथे स्थायिक झाले. परंतु त्याआधी कॅनडासह अमेरिका खंडात कांही आदिवासी लोक रहात होते. हेच अमेरिकेचे मूळ रहीवासी आहेत. ते भारत, आशिया व अफ्रिका खंडातून आले असावेत, असा इतिहासकारांचा कयास आहे. कोलंबस इथे आला तेंव्हा हा भारत देश असावा असे त्याला वाटले. म्हणूनच त्याने या मूळ रहीवाशांना “इंडियन’ असे संबोधिले, असे येथील इतिहासकार म्हणतात. या मूळ रहीवाशांशी म्हणजेच इंडियन लोकांशी बाहेरून वास्तव्यास आलेल्या लोकांना संघर्ष करावा लागला. याचाच कॅनडाच्या इतिहासात “इंडियन वार’ असा उल्लेख आहे.

इतिहास कांही असो, कॅनडा हे भारतीय लोकांचे आकर्षण ठरले आहे, हेच खरे !

***

डेल्टा शहर व्हँकुव्हरलगतचाच उपनगरी भाग. ब्रिटिशकोलंबिया (बीसी) राज्यातील व्हॅंकुव्हर एक महत्वाचे शहर. अमेरिकेची (युएस) उत्तर सीमा इथून कांही मिनिटाच्या अंतरावर आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या शहराला “गार्डन सिटी’ म्हणूनच ओळखले जाते. हे शहर भारतीयांचे, त्यातल्यात्यात पंजाबी लोकांचे मोठे आकर्षण ठरले आहे.

व्हॅंक़ुव्हरशेजारच्या ‘सरी’ नि ‘डेल्टा’ भागात भारतीय व त्यातही पंजाबी लोक मोठ्या संख़्येने राहतात. माझी कन्या संतोषी सध्या डेल्टा मध्येच रहाते. त्याच्या शेजारीच सरी आहे. सरी व डेल्टा म्हणजे भारतीय लोकांची त्यातल्या त्यात पंजाबींचीच जणू वसाहत. त्यामुळे बहूतेक आस्थापनावर इंग्रजीबरोबरच पंजाबीतही लिहिलेले आढळून येते. इथल्या लोकांची व्यवहारी भाषा इंग्रजी असली तरी बहूतेक लोक पंजाबी व हिंदीही बोलतात. त्यामुळे या भागात फीरताना भाषेची अडचण येत नाही. पंजाबी लोकांचे व्यक्तीमत्व, त्यांचा खास बनावटीचा पोशाख, डोकीवरची वैशिष्ट्यपूर्ण पगडी, स्त्रीयांचा पंजाबी ड्रेस याचे खास असे वैशिष्ट्य आहे. किंबहूना ती त्यांची  ओळखच आहे. ते कुठेही गेले तरी आपली ओळख त्यांनी गमविलेली नाही. आम्ही सरी, डेल्टात सगळीकडे फिरलो, पंजाबी व अन्य भारतीय लोक अणि त्यांनी चालविलेले उद्योग, व्यवसाय येथे जागोजागी पहायला मिळतात. गोरे किंवा चीनी लोक इथे क्वचितच दिसायचे. आम्ही या भागात फिरायला गेलो की लोक आम्हाला पाहून हिंदीत बोलायचे.

इंडिया मे कहांके रहनेवाले हो ?

असा त्यांचा हमखास प्रश्न असायचा. आम्ही सहज इथल्या मॉलमध्ये गेलो. भारतातले सगळे पदार्थ इथे विक्रीसाठी उपलब्ध होते. दुकानातून इंग्रजीबरोबरच हिंदीही बोलली जात होती. मॉलमध्ये फिरताना एखाद-दुसऱ्या मराठी कुटूंबाचीही हमखास भेट व्हायची. या भागात भारतीय लोकांची संख्या अधिक असल्याने व्हँकुव्हरला नव्याने येणारे भारतीय लोक रहाण्यासाठी सरी, डेल्टाचीच निवड करतात. व्हँकुव्हर परिसरात रहाणाऱ्या मराठी लोकांनी तर मराठी मंडळही स्थापन केले आहे. वेळोवेळी ते विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. त्यानिमित्ताने एकत्र येतात नि आपल्या संस्कृतीचे जतन करतात.

2020 च्या फेब्रुवारीमध्ये मी कन्येला भेटण्यासाठी पुन्हा कॅनडाला गेलो होतो. त्यावेळी व्हँकुव्हरच्या मराठी मंडळाने रौप्य महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु देशभरात पसरलेल्या कोरोनाव्हायरसच्या महामारीमुळे कार्यक्रम रद्द करावा लागला.

सरीमधील बैसाखी उत्सवाचे खास आकर्षण असते. दुसऱ्या भेटीत या उत्सवाचा आनंद लुटता आला. व्हँकुव्हर, सरीमध्ये होणाऱ्या या उत्सवात केवळ शीखच नाही, तर इतर भारतीय आणि गोरे लोकही भाग घेतात. कार्यक्रमाचा आनंद लुटतात. भारताबाहेर ईतक्या भव्य प्रमाणात होणारा हा एकमेव कार्यक्रम असेल. यावेळी सुशोभित फ्लोट्सची मिरवणूक काढण्यात येते, संगीताची त्याला साथ असते. रंगींबेरंगी कपडे परिधान करून लोक मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाग घेतात.  पवित्र गुरु ग्रंथसाहिबाची भक्तीभावाने मिरवणुक काढण्यात येते.

या कार्यक्रमाचे खरे नाव नगर कीर्तन आहे, याचा अर्थ रस्त्यावर वाद्य वाजवून निर्मात्याचे सवाद्य गुणगान गाणे असा होतो. हा एक आध्यात्मिक व धार्मिक  मेळावा आहे.

अन्नदान हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट ! अन्न देणे ही लंगरची परंपरा आहे. सर्वजण समान पातळीवर एकत्र येऊन नम्रपणे अन्नदानाचा लाभ घेतात. सामाजिक मतभेद बाजूला ठेऊन कार्यक्रमात सहभागी होतात. आम्हीही त्याचा एक घटक बनलो व बैसाखीचा प्रसाद समजून अन्नदानाचा लाभ घेतला.

सरीत पंजाबींचा मोठा दबदबा आहे. गोरे लोक इथे यायला घाबरतात असे कुणीतरी सांगितले. परंतु त्यांची दहशत वाटावी असा अनुभव मला तरी या भागात कुठेच जाणवला नाही. कॅनडात पंज़ाबी लोक इतक्या मोठ्या संख़्येने असण्याचे कारण मला समजले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर भारतात शिखांवर हल्ले होऊ लागले. त्यावेळी शिख लोकांनी मोठ्या संख़्येने कॅनडात स्थलांतर केले आणि ते इथेच स्थायिक झाले, असा इतिहास आहे. कारण कांही असो, पंज़ाबींची संख़्या कॅनडात लक्षणीय आहे, हे विसरून चालणार नाही. इंडिया म्हणजे पंजाबी अशीच सर्वसाधारण ओळख इथल्या लोकांना आहे.

……. मनोहर (बी. बी. देसाई)

बी. बी. देसाई
About बी. बी. देसाई 23 Articles
लेखन : पुनर्वसन कादंबरी, ‘मला भावलेला कॅनडा’ प्रवास वर्णन प्रकाशनाच्या वाटेवर, दैनिक "सकाळ' व "बेळगाव वार्ता'मधून विविध विषयांवर 20 वर्षे लेखन, ज्वाला, जिव्हाळा, अमरदीप दिवाळी अंकातून कथा, लेख व कविता प्रसिद्ध, अमरदीप दिवाळी अंकाचे सात वर्षे संपादक म्हणून कार्य हव्यास : लेखन, वाचन, विविध विषयांवर व्याख्याने, सामाजिक कार्यात सहभाग
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..