ब्रिटिश अंमलात अनेक यूरोपीय सर्कशी भारतात येत व प्रमुख शहरी खेळ करून जात. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन व भारतीयांची स्वतंत्र सर्कस असावी, हा विचार मूर्त स्वरूपात आणून भारतातील पहिली सर्कस काढणारे आदय सर्कस चालक म्हणजे महाराष्ट्रातील विष्णुपंत छत्रे हे होत. त्यांनी १८७८ मध्ये सांगलीला छत्रे सर्कसची स्थापना केली. ते स्वत: उत्कृष्ट अश्वशिक्षक असून, घोडयांवरील कसरतींची अनेक कौशल्यपूर्ण कामे सर्कशीत करीत. त्यांनी १८८४ मध्ये विल्सन सर्कस खरेदी करून अनेक यूरोपीय कसरतपटू आपल्या सर्कशीत घेतले. त्यांनी आपल्या सर्कसला ‘गँड इंडियन सर्कस’ हे नाव देऊन भारतभर तसेच परदेशांतही दौरे काढले.
छत्रे सर्कशीत असलेले सदाशिव कार्लेकर यांनी १८८३ मध्ये सांगली येथे ‘कार्लेकर गँड सर्कस’ची स्थापना केली. प्रचंड शिकारखाना हे छत्रे सर्कसचे प्रमुख वैशिष्टय; तर त्या काळातील जेंकिन्स व फॅमिलीचे चित्त-थरारक मोटारसायकल उड्डाण हे कार्लेकर सर्कशीचे खास आकर्षण होते, १९४३ मध्ये ती बंद पडली. छत्रे यांच्या सर्कशीत नाव कमावलेले देवल बंधू यांनी आपली स्वतंत्र ‘देवल सर्कस’ १८९५ मध्ये काढून भारतभर व परदेशांतही दौरे करून चांगली नावारूपाला आणली. ही सर्कस ‘ग्रेट इंडियन सर्कस’ या नावाने प्रसिद्ध होती. १९५७ साली ती बंद पडली. शारीरिक कसरतींचे खेळ व पशूंची कौशल्याची कामे ही या सर्कसची लक्षणीय वैशिष्टये होती.
काशिनाथ सखाराम ऊर्फ बंडोपंत देवल हे या सर्कसचे एक मालक भारतातील सर्वोत्कृष्ट विदूषक म्हणून ख्यातकीर्त होते. ‘द बेस्ट क्लाउन इन इंडियन सर्कस’ म्हणून त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो. सुमारे ४० वर्षे नवनवे चित्तथरारक खेळ व कसरती सादर करुन परदेशातही वाहवा मिळवली.
सर्कस सम्राट काशिनाथ सखाराम तथा यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी मिरज येथे निधन झाले.
बंडोपंत देवल यांचे १६ डिसेंबर २००० रोजी निधन झाले.
Leave a Reply