नवीन लेखन...

भारतीय गणिती दुसरी आवृत्ती

भारतीय गणितज्ञांच्या कर्तृत्वाचा रोचक परिचय भारतीयांची प्रज्ञा आता जगात पुन्हा नव्याने गाजत आहे. भारतीय आणि गणित यांचा अतूट संबंध तर जगात सर्वांच्याच मनात ठसलेला आहे. गणिताच्या विकासात अनेक भारतीय गणितींनी/गणितज्ञांनी वेळोवेळी मोलाची भर टाकली. प्राचीन काळ ते आधुनिक काळापर्यंतच्या अशा 51 श्रेष्ठ भारतीय गणितींच्या जीवनाचा व त्यांच्या कार्य-कर्तृत्वाचा आणि त्यांनी गणितात दिलेल्या योगदानाचा नेमका परिचय प्रा. अनंत व्यवहारे यांनी भारतीय गणिती मध्ये सोप्या भाषेत करून दिला आहे. प्रत्येक भारतीयाचा अभिमान वाढेल, असाच हा परिचय आहे. पृ. 180 किं. 180 रू. ISBN : 978-81-907138-2-5

नागपूर चे नचिकेत प्रकाशन हे वैशिष्ट्यपूर्ण विषयांवर पुस्तके प्रसिद्ध करण्याचे ध्येय बाळगून असलेले आणि या व्यवसायात तसे नवेच असले तरी विचक्षण ग्रंथप्रेमींमध्ये मान्यता मिळालेले आहे. ज्या विषयांना तसा साधारणत: स्पर्श झाला नाही, असे विषय वाचकांपुढे ठेवण्याच्या या मालिकेत गणिताचे सिद्धहस्त व विद्यार्थीप्रिय प्राध्यापक श्री अनंत वासुदेव व्यवहारे यांचे भारतीय गणिती हे पुस्तक “नचिकेत” ने नुकतेच प्रकाशित केले आहे.

गणित हा विषय सर्वसामान्य माणसासाठी तसा रूक्ष असतो. पण या शास्त्राच्या आधारानेच अन्य शास्त्रे व कलविश्र्वही बहरते. गणित हा एका अर्थी सर्व शास्त्रांचा पायाच आहे. या विश्र्वाचे संचालन अत्यंत काटेकोर पद्धतीने चालते, आकाशस्थ ग्रहगोलांच्या चलन व परिचालनाचे परिणाम मानवी जीवनावर होतात या दृढ विश्वासातून प्राचीन भारतीय गणितज्ज्ञ व ज्योतिर्विदांनी याचे रहस्य उलगडायला प्रारंभ केला. आर्यभट्ट-प्रथम यांच्या पासून सुरू झालेल्या या गणितज्ञांच्या प्रयत्नांना पुढे अनेक भारतीय गणितींनी आपापल्या परीने विकसित केले. याचे फलित म्हणूनच भारतीय गणितशास्त्र सर्व जगापुढे एक प्रगत व परिणत शास्त्र म्हणून प्रकट झाले. अशा 51 थोर भारतीय गणितज्ञांच्या कार्यकर्तृत्त्वाचा परिचय प्रा. व्यवहारे यांनी या पुस्तकातून घडविला आहे.

आर्यभट्ट, वराहमिहिर, भास्कर, ब्रह्मगुप्त, लल्लाचार्य, महावीराचार्य, श्रीधराचार्य, माधव, परमेश्र्वरन असे इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून ते पंधराव्या शतकापर्यंत गणित अभ्यासणार्‍या संशोधकांचा परिचय वाचताना मन थक्क होते. या प्रत्येकाने लिहिलेल्या मूळ संस्कृत ग्रंथांची यादीच लेखकाने दिली आहे. आर्यभटांचे क्रांतिकारी विचार, वराह मिहिरांचे फलज्योतिष साधन, लल्लाचार्यांचे कालमापन, अंकगणित व महत्वमापनावरील श्रीधराचार्यांचे मूलभूत संशोधन, माधवांची धनभूमिती याची अत्यंत रोचक माहिती प्रा.व्यवहारे यांनी त्या-त्या ग्रंथामधील मूळ संस्कृत श्र्लोकांसह आणि त्यांच्या स्पष्टीकरणासह दिलेली आहे. पंधराव्या शतकाच्या शेवटी जन्माला आलेले केरळी गणिती ज्येष्ठदेव यांच्या पासून आधुनिकाळातील प्रसिद्ध गणिती श्रीनिवास रामानुजन या कालखंडातील महत्वाचे गणिती म्हणजे स्वामी भारती कृष्णतीर्थ शंकराचार्य हे होत. वैदिक गणिताचे हे प्रणेते. स्वत: प्रा.व्यवहारे हे वैदिक गणिताचे सखोल अभ्यासक व प्रचारकही आहेत. यामुळे हा लेख जरा विस्तृत आहे. सामान्य परिस्थितीतून वर आलेला पण आपल्या विलक्षण आणि मेधावी प्रतिभेने जगाचे डोळे दिपवून टाकणारा भास्कराचार्यांनंतरचा भारतीय गणिती म्हणजे श्रीनिवास रामानुजन्‌‌‌‌‌‌‌‌‌! यांच्यावरील लेखही माहितीपूर्ण आहे.

अठरावे, एकोणीसावे व विसावे शतक वैज्ञानिक व औधौगिक क्रांतीसोबतच अवकाश संशोधनाच्या दिशेने पावले टाकणारे ठरले. त्यात डॉ. सत्येंद्रनाथ बोस, डॉ. राजचंद्र बोस, डॉ. सी.एस.वेंकटरमण, डॉ.जयंत नारळीकर, डॉ.नरेंद्र करमरकर, डॉ. प्रभुलाल भटनागर, डॉ. अमलकुमार रॉय चौधरी, राधानाथ सिकदार, डॉ. सर्वदमन चावला, डॉ. हरिश्र्चंद्र खरे यांचा सिंहाचा वाटा आहे. तसेच द.रा.काप्रेकर, डॉ.के.ल.दप्तरी, डॉ. हरिश्र्चंद्र खरे यांचाही वाटा आहे. अशा 51 दिग्विजयी गणितज्ञांची माहित एकमित्र करणे व ती परिष्कृत करून सामान्य वाचकांसाठी पुस्तकरूपाने उपलब्ध करून देणे, हे सोपे काम नाही, कारण हा विषयच वेगळा आहे. प्रा. व्यवहारे यांनी अत्यंत परिश्रमाने ही माहिती संकलित केली. ते स्वत: गणिताचे प्राध्यापक असल्याने या विषयाकडे त्यांनी एका स्वतंत्र दृष्टिकोनातून पाहिले. देशाच्या उभारणीसाठी याही शास्त्रज्ञांचे योगदान फार महत्वाचे असून त्या प्रयत्नात या गणितज्ञांनी भारताची मान उंचावण्याचा प्रयत्न कसा केला, याचेही दर्शन प्रा.व्यवहारे यांनी घडविले आहे.

गणिताचे प्राध्यापक, अध्यापक, विद्यार्थी व गणितात रूची असणार्‍यांसाठी हा गं्रथ म्हणजे एक “गोल्डन ट्रेझरी” आहे. विशेषत: गणिताच्या विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचलेच पाहिजे, संग्रही ठेवले पाहिजे. गं्रथाच्या शेवटी प्रा. व्यवहारे यांनी संदर्भ ग्रंथांची यादी दिल्याने ते ग्रंथ वाचण्याची उत्सुकता लागावी. गणितासारखा जड विषय असूनही लेखकाची शैली सहज व प्रासादिक आहे. त्यामुळे लेखनाला लालित्याचाही स्पर्श झाला आहे. नागपूरच्या मथुरादास मोहता विज्ञान महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक राहिलेले जुन्या पिढीतील सिद्धहस्त गणित प्रबोधक व प्रा. व्यवहारेंसह अनेकांचे गुरू असलेले कै. प्रा. श्रीनिवास मंगळगिरी यांना हा गं्रथ लेखकाने अर्पण केला आहे. एक उत्तम, दर्जेदार पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल आणि त्याचे अंतरंग व बहिरंगही दर्जेदार राखल्याबद्दल प्रकाशकांचे अभिनंदन!
प्रकाश एदलाबादकर भारतीय गणिती प्रकाशक
लेखक-प्रा. अनंत व्यवहारे नचिकेत प्रकाशन
पाने : १८०
किंमत : १८० रू. 24,
योगक्षेम ले आऊट, स्नेहनगर, वर्धारोड, नागपूर-400015, (:0712-2285473, 9225210130

— मराठीसृष्टी टिम

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..