क्रिकेटमधील ‘जंटलमन’ म्हणून ओळखले जाणारे भारताचे माजी कसोटीपटू गुंडप्पा विश्वनाथ यांचा जन्म १२ फेब्रुवारी १९४९ रोजी कर्नाटकातील भद्रावती येथे झाला.
गुंडप्पा विश्वनाथ हे शैलीदार स्ट्रोक प्लेयर म्हणून क्रिकेटवर्तुळात परिचित होते. गुंडप्पा विश्वनाथ स्क्वेअर कटचे बादशहा म्हणून ओळखले जात असत. त्यांचा लेटकटही तितकाच प्रभावी असे.
बीसीसीआयच्या निवड समितीवर त्यांनी कामही केलं आहे. गुंडप्पा विश्वनाथ यांनी रणजी क्रिकेटच्या पहिल्याच सामन्यात द्विशतक झळकावले होते. तेव्हा ते म्हैसूर संघाकडून खेळत होते. या सामन्यात आंध्र प्रदेशच्या संघाविरुद्ध त्यांनी २३० धावा केल्या होत्या. नोव्हेंबर १९६९ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध कानपूरमध्ये झालेल्या सामन्यातून गुंडप्पांनी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. पहिल्या डावात ते शून्यावर बाद झाले होते तर दुसऱ्या डावात त्यांनी १३७ धावा केल्या होत्या, यापैकी ९० धावा त्यांनी फक्त चौकाराच्या मदतीने केल्या होत्या.
भारताकडून पदार्पण करताना शतक झळकावणारे विश्वनाथ हे पहिले फलंदाज ठरले होते. यापूर्वी एकाही फलंदाजाला पहिल्या सामन्यात शतक झळकावता आले नव्हते. गुंडप्पा यांनी ज्या-ज्या सामन्यात शतक झळकावले, त्या-त्या सामन्यात भारताचा कधीच पराभव झाला नाही. त्यांनी पहिल्या सामन्यात शतक झळकावले होते, तो अर्निर्णित ठरला होता. त्यानंतर त्यांनी शतकी खेळी केलेले सगळे सामने भारत जिंकला होता. गुंडप्पा विश्वनाथ यांनी दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. यातील एका सामना अनिर्णित ठरला होता तर एका सामन्यात भारताचा पराभव झाला होता. १९७९-८० साली एका कसोटी सामन्यात इंग्लंडच्या टेलर नावाच्या फलंदाजाला अम्पायरने बाद दिले होते. पण टेलर बाद नसल्याचं गुंडप्पा यांच्या लक्षात आलं. तेव्हा त्यांनी त्याला परत बोलावलं. तो सामना भारत हरला होता. मात्र, गुंडप्पांच्या खिलाडू वृत्तीचं कौतुक झालं होतं. तरुण खेळाडूंना संधी देण्यासाठी ते अनेकदा मागे राहत असत. गुंडप्पा विश्वनाथ यांना १९७९मध्ये ‘अर्जुन अवार्ड’नं सन्मानित करण्यात आलं होतं. १९८३मध्ये गुंडप्पा विश्वनाथ यांनी निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतरही ते बी.सी.सी.आय.मध्ये विविध पदांवर सक्रिय राहिले. २००९मध्ये त्यांना बीसीसीआयच्या जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. विश्वनाथ भारतासाठी ९१ कसोटी सामने खेळले. या ९१ कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी ४१.९३च्या सरासरीने ६०८० धावा केल्या. यामध्ये एका द्विशतकाचाही समावेश आहे. विश्वनाथ यांनी १९८२ साली चेन्नई येथे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात ३७४ चेंडूंमध्ये २२२ धावांची अविस्मरणीय खेळी साकारली होती. या द्विशतकामध्ये ३१ चौकार लगावले होते. विश्वनाथ यांनी २५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४३९ धावा केल्या होत्या. यामध्ये ७५ ही त्यांनी सर्वोच्च धावसंख्या होती.
गुंडप्पा विश्वनाथ यांच्या नावावर एक अनोखा विक्रम आहे. जेव्हा जेव्हा विश्वनाथ यांनी शतक झळकावले तेव्हा एकदाही भारताला पराभवाचे तोंड पाहावे लागले नाही. गुंडप्पा विश्वनाथ आणि सुनील गावस्कर अत्यंत घनिष्ट मित्र आहेत. गुंडप्पा अनेकदा सुनील गावस्कर यांना भेटायला त्यांच्या घरी जात असत. इथेच गावस्कर यांची बहीण कविता आणि गुंडप्पा यांचे सूत जुळले. कविता आणि गुंडप्पा नंतर विवाहबद्ध झाले.
-संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply