आपल्या आजच्या वीजनिर्मितीपैकी दोन-तृतीयांश वीजनिर्मिती ही कोळसा आणि नैसर्गिक वायूद्वारे होते आहे. भविष्यातली विजेची वाढती गरज लक्षात घेता, आपल्या देशात उपलब्ध असलेला कोळसा आणि नैसर्गिक वायू काही दशकांतच संपुष्टात येणार आहे. यामुळे वीजनिर्मितीसाठी आपल्याला सौरऊर्जेसारख्या अपारंपरिक स्त्रोतांची मदत तर घ्यावी लागणार आहेच, पण त्याबरोबर अणुऊर्जेसारख्या मोठ्या स्तरावरील ऊर्जानिर्मितीकडेही वळावं लागणार आहे. कारण अणुइंधन हे कोळशाच्या तुलनेत सुमारे वीस लाखपट अधिक ऊर्जानिर्मिती करतं.
अणुइंधन म्हणून वापरता येणाऱ्या मूलद्रव्यांपैकी युरेनिअमचे आपल्याकडील साठे मर्यादित तर आहेतच, पण ते कमी प्रतीच्या खनिजाच्या स्वरूपातलेही आहेत.
थोरिअम या अणुइंधनाच्या बाबतीत मात्र आपण श्रीमंत असून, थोरिअमच्या वैपुल्यानुसार भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. आपल्याकडे सव्वादोन लाख टन थोरिअमचे साठे सहजपणे उपलब्ध होऊ शकतील, अशा स्वरूपात आहेत. हे थोरिअम आपल्याला दीर्घकाळपर्यंत वापरता येणार असल्याने भारताचा अणुऊर्जा कार्यक्रम हा अर्थातच थोरिअमवर केंद्रित झाला आहे.
भारताचा अणुऊर्जा कार्यक्रम हा तीन टप्प्यांचा आहे. यातला पहिला टप्पा सुरू असून, या टप्प्यांतील अणुभट्ट्यांत युरेनिअम हे इंधन म्हणून वापरलं जात आहे. या अणुभट्ट्यांत निर्माण होणारं प्लुटोनिअम हे दुसऱ्या टप्प्यातील अणुभट्ट्यांत इंधन म्हणून वापरलं जाईल. या दुसऱ्या टप्प्यातील अणुभट्ट्यांत प्लुटोनिअमच्या जोडीने थोरिअमचाही वापर करून त्यातून विखंडनक्षम युरेनिअम निर्माण करण्यात येईल. तिसऱ्या टप्प्यातील अणुभट्ट्या या नवनिर्मित यूरेनिअमवर आधारित असतील. या तिसऱ्या टप्प्यातील अणुभट्टया ऊर्जानिर्मितीबरोबरच स्वतःच थोरिअमपासून युरेनिअमची निर्मितीही करू लागतील.
भारताच्या अणुवीजनिर्मितीच्या प्रमाणात येत्या दहा वर्षांत आजच्या तुलनेत चौपट तर त्यानंतरच्या दहा वर्षांत आजच्या तुलनेत दहा पटींहून अधिक वाढ होणं अपेक्षित आहे. या वीस वर्षांच्या काळानंतर आज एकूण वीजनिर्मितीच्या तीन टक्क्यांच्या आत असलेली अणुवीजनिर्मिती ही तेव्हाच्या एकूण वीजनिर्मितीच्या आठ टक्क्यांपर्यंत पोहोचलेली असेल. इ.स. २०५० सालापर्यंत हे प्रमाण सतरा टक्क्यांपर्यंत पोहोचेल.
Leave a Reply