नवीन लेखन...

भारतीय राष्ट्रीय सौर दिनदर्शिका

India's National Solar Calendar

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ५ वर्षांनी, म्हणजे १९५२ च्या सुमारास सी.एस्.आय्.आर्. या संस्थेने पंचांग सुधारणा समिती या नावाने एक समिती नेमली. या समितीचे अध्यक्ष डॉ. मेघनाद साह भौतिकशास्त्रज्ञ तर होतेच परंतु ते काही काळ लोकसभेचे खासदारही होते. पंचांग सुधारणा समितीने आपल्या देशासाठी एक दिनदर्शिका सुचवावी असे या समितीला सांगण्यात आले.

कालगणनेच्या बाबतीत भारतात खूपच विविधता आहे. काही पध्दतीत चांद्रमहिने विचारात घेतात. या महिन्यांची सुरुवातही कोणी पौर्णिमेला करतात तर कोणी अमावस्येला करतात. काही प्रांतात तर सौर महिने विचारात घेतात. आपले सण,वार,धार्मिक उत्सव विशिष्ट ति्थीला असतात, म्हणजेच ते चंद्रभ्रमणावर अवलंबून असतात. तिथी आणि महिन्यांशी सणांची बांधिलकी असते. उदा. दसरा, त्या दिवशी आश्र्विन शुध्द दशमी तिथीच तर गोकुळाष्टमी म्हणजे श्रावण महिन्यातील कृष्ण अष्टमीच असायला हवी.

महिन्यांची कालगणना चंद्रभ्रमणावरुन केली तर १२ महिन्यांचे वर्ष संपल्यावर होणार्‍या एकूण दिवसांची संख्या ३५४ होते, त्यामुळे चांद्रवर्षाचा ऋतुंशी मेळ राहत नाही. ऋतू हे सूर्यभ्रमणावर अवलंबून आहेत आणि म्हणूनच सूर्याचे वार्षिक भ्रमण विचारात घेणारी दिनदर्शिका व्यवहारात सोयीची पडते. आपले दैनंदिन व्यवहार दिवस व रात्र यांच्या अनुषंगाने घडत असल्यामुळे सरासरी २४ तासांचा दिवस ही कल्पना सोयीची होते. जानेवारी व डिसेंबर ही सध्या प्रचारात असलेली दिनदर्शिका सौर दिनदर्शिकाच आहे. धार्मिक सण आणि उत्सव इत्यादिंसाठी आपण चंद्राची दिनदर्शिका विचारात घेत असलो, तरी दैनंदिन व्यवहारात आपण सूर्याचीच दिनदर्शिका वापरतो.

राष्ट्रीय दिनदर्शिका :

डॉ. मेघनाद साहा यांच्या समितीने वरील गोष्टींचा विचार करुन सौर दिनदर्शिकां सुचविली आहे. मात्र ती जानेवारी ते डिसेंबर अशा बारा महिन्यांची नाही. त्यातील महिन्यांची नावे, वर्षारंभाचा दिवस इत्यादी गोष्टी वेगळ्या आहेत आणि वेगळेपण का व कसे ते आपण पाहणार आहोत. राष्ट्रीय दिनदर्शिकेच्या १२ महिन्यांची नावे चैत्र ते फाल्गुन अशाच क्रमाने आहेत, फक्त मार्गशीर्ष महिन्याचे नाव ‘अग्रहायण’ असे आहे. राष्ट्रीय दिनदर्शिकेचा वर्षाचा पहिला दिवस (लीप वर्ष सोडून) २२ मार्च हा असतो. या तारखेला राष्ट्रीय दिनदर्शिका १ चैत्र या नावाने संबोधते. राष्ट्रीय दिनदर्शिकेचे वैशाखापासूनचे महिने पुढील तारखांना सुरु होतात. वैशाख (२१ एप्रिल), ज्येष्ठ (२२ मे), आषाढ (२२ जून), श्रावण (२३ जुलै), भाद्रपद (२३ ऑगस्ट), आश्र्विन (२३ सप्टेंबर), कार्तिक (२३ ऑक्टोबर), अग्रहायण (२२ नोव्हेंबर), पौष (२२ डिसेंबर), माघ (२१ जानेवारी), फाल्गुन (२० फेब्रुवारी).

वर्षाचा क्रमांक शालिवाहन शकाप्रमाणे घेतात. या महिन्यांचे दिवस एक आड एक ३० किंवा ३१ असे घेत नाहीत. वैशाख ते भाद्रपद या सलग ५ महिन्यांचे दिवस प्रत्येकी ३१ असून उरलेल्या ७ महिन्यांचे दिवस प्रत्येकी ३० घेतात. अशा तर्‍हेने ३६५ दिवसांचे वर्ष पूर्ण होते. सूर्य उत्तर गोलार्धात असण्याचा काळ त्याच्या दक्षिण गोलार्धातील कालावधीपेक्षा थोडा जास्त आहे, त्यामुळे वैशाख ते भाद्रपद या सलग महिन्यांचे दिवस प्रत्येकी ३१ घेण्याची शिफारस समितीने केली.

जे इंग्रजी वर्ष लीप वर्ष असते त्या वर्षी सुरु होणारे राष्ट्रीय दिनदर्शिकेचे वर्षही लीप वर्ष घेतात. मात्र त्या वर्षी चैत्र महिन्याचेही ३१ दिवस घेतात आणि अशा लीप वर्षाची सुरुवात २२ मार्चला न होता २१ मार्च रोजी करतात.

राष्ट्रीय दिनदर्शिकेची शास्त्रीय बैठक :
वरील विवेचनावरुन राष्ट्रीय दिनदर्शिकेची वैशिष्ट्ये आणि त्याची शास्त्रीय बैठक आपल्या लक्षात येईल. चैत्र, आषाढ, आश्र्विन आणि पौष या महिन्यांची सुरुवात सूर्याच्या स्थानांशी निगडीत आहे. चैत्र आणि आश्र्विन महिन्यांच्या सुरुवातीस (अनुक्रमे २२ मार्च आणि २३ सप्टेंबर) सूर्य वैषुविकवृत्तावर असतो. दिवस आणि रात्र समान असतात. आषाढ महिन्याच्या १ दिनांकापासून (२२ जून) दक्षिणायन सुरु होते, तर पौष महिन्याची म्हणजे उत्तरायणाचीही सुरुवात असते. (२२ डिसेंबर) इंग्रजी महिन्याची सुरुवात सूर्याच्या अशा विशिष्ट स्थानांशी निगडीत नाही. वैशाख ते भाद्रपद या महिन्यांचे प्रत्येकी ३१ दिवस घेण्यामागील भूमिकाही आपण पाहिली.

राष्ट्रीय दिनदर्शिकेचे वर्ष २२ मार्चला सुरु होत असल्यामुळे ते आर्थिक वर्षाशीही जुळते आहे. हा त्याचा व्यावहारिक लाभही आहे.

राष्ट्रीय दिनदर्शिकेची भारतीय नागरिकांकडून उपेक्षा :
राष्ट्रीय दिनदर्शिका २२ मार्च, १९५७ या दिवसापासून भारत सरकारने अधिकृतपणे स्वीकारली. हा दिवस राष्ट्रीय दिनदर्शिकेप्रमाने १ चैत्र १८७९ असा होता. तेथपासून आजतागायत ही दिनदर्शिका शासकीय स्तरावर अस्तित्वात आहे. वर्तमानपत्रांमध्ये आजचे पंचांग या नावाखाली जी माहिती येते, त्यामध्ये या दिनांकाचा उल्लेख असतो. म्हणजे या दिनदर्शिकेच्या स्वीकृतीला आणि वापराला ५४ वर्षापेक्षा जास्त काळ होऊन गेला. सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन व्यवहारात लोकांकडून ही दिनदर्शिका वापरली जात नाही त्यांनी ती स्वीकारली नाही. ही वस्तुस्थिती आहे. कित्येक लोकांना तर अशी काही दिनदर्शिका आहे हे माहीतच नाही. ही भारताची अधिकृत दिनदर्शिका असून सरकारी पातळीवर (अजूनतरी) ती वापरली जाते याचे लोकांना आश्र्चर्य वाटते. राष्ट्रीय दिनदर्शिकेची ही दुर्दशा नव्हे का? राष्ट्रीय दिनदर्शिका समाजात अजूनही रुजू शकते. शासन आणि समाज यांची इच्छाशक्ती तशी असायला हवी.

राष्ट्रीय दिनदर्शिका दैनंदिन जीवनात वापरली जायला हवी असेल तर पुढील गोष्टी करता येतील :
कार्यालयीन वेतनपत्रके राष्ट्रीय दिनदर्शिकेच्या महिन्यांप्रमाणे तयार करावीत. उदा. चैत्र पेड इन वैशाख…. वैशाख पेड इन ज्येष्ठ…. याप्रमाणे वेतन मिळाले म्हणजे आपोआपच दिनदर्शिका गरजेची होईल.

जानेवारी महिन्यात जेव्हा नवीन दिनदर्शिका येतात तेव्हा त्यातील भारतीय महिने व दिनांक ठळक छापण्याची सक्ती करावी. इंग्रजी दिनांक व महिने बारीक अक्षरात छापावेत. संक्रमण अवस्थेच्या एक दोन वर्षात हे करावे लागेल. नंतर चैत्र, वैशाख असेच महिने असलेल्या दिनदर्शिका निघू लागतील.

केंद्र सरकारने रेल्वेचे तसेच सर्वसामान्य अंदाजपत्रक सादर करताना या दिनांकाचा उल्लेख करुन ते सादर करावे. काही बॅंका, संस्था, कंपन्या आपली स्वत:ची दिनदर्शिका छापतात. त्यांनी राष्ट्रीय कालगणनेप्रमाणे दिनदर्शिका काढाव्यात. धनादेशावर किंवा अन्य ठिकाणी राष्ट्रीय दिनदर्शिकेची तारीख लिहून व्यक्तिगत पातळीवर या दिनदर्शिकेच्या अंमलबजावणीस सुरुवात करावी. राष्ट्रीय दिनदर्शिका अंमलात यावी असे ज्यांना वाटते, अशा लोकांनी इतरांचे याबाबत प्रबोधन करावे.
आपल्या भागातील लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यांच्याशी याबाबत चर्चा करावी आणि हा प्रश्न शासकीय स्तरावर उपस्थित करण्यास सांगावे.

राष्ट्रीय दिनदर्शिका दैनंदिन जीवनात वापरात येण्यासाठी अशी मनोभूमिका तयार होणे आवश्यक आहे. राष्ट्रीय दिनदर्शिकेबाबत सर्व पालळ्यांवर एवढे औदासिन्य असल्यामुळेच तिच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. धार्मिक गोष्टी, सण, वार इ. प्रत्येकजण आपापल्या धर्माप्रमाणे आणि पंचांगाप्रमाणे साजरे करु शकतील. राष्ट्रीय दिनदर्शिकेमुळे या गोष्टींना बाधा येणार नाही.

राष्ट्रीय दिनदर्शिका आणि इंग्रजी दिनदर्शिका या दोन्ही दिनांकांचा निश्र्चित संबंध असल्यामुळे त्यांचे एकमेकांत रुपांतरण सहज शक्य आहे. थोडक्यात, शास्त्रीय पायावर आधारलेली राष्ट्रीय दिनदर्शिका आपल्या व्यवहारात आणणे राष्ट्रीय दिनदर्शिका आपल्या व्यवहारात आणणे राष्ट्रीय अस्मितेला धरुन आहे. उशीर झाला असला तरी हि चूक सुधारता येईल. त्यासाठी कटिबध्द होऊया !

(इच्छुकांनी व अभ्यासकांनी तसेच राष्ट्रीय वृत्ती जोपासणार्‍यांनी लेखकाशी संपर्क करावा.)

— हेमंत मोने

फोन : ९८२०३१६३१५ 

इ-मेल : hvmone@gmail.com

12 Comments on भारतीय राष्ट्रीय सौर दिनदर्शिका

  1. खूप छान माहिती आहे. आपण जर दैनंदिन व्यवहारात भारतीय सौर आणले तर काही प्रमाणात का होईना, भारतीय सौर प्रचालित होईल.

  2. ? जय जिजाऊ?
    हेमंतजी , आपण छान व अभ्यास पुर्ण माहीती दिली आहे . भारतीय सौर दिनांक व चांद्र तिथी तसेच इंग्रजी तारखा असलेली कॅलेंडर व त्यावर दर दोन महीन्यानी बदलनारे ऋतु या गोष्टी ठळक पणे नमुद असणाऱ्या दिनदर्शिका आज घरा घरात असणे काळाची गरज आहे . मला अश्या दिनदर्शिका मिळाल्या तर मि स्वतः घरी वापरणार व विक्री सुद्धा करू शकतो . कृपया आपल्या मार्ग दर्शनाच्या प्रतिक्षेत . एक मावळा .

  3. दिनदर्शिके बद्दल चांगली माहिती वाचायला मिळाली. कृपया ही दिनदर्शिका कुठे मिळेल हेही सांगावे. आज 25 मार्च 2020 आहे , अर्थातच भारतीय सौर दिनदर्शिकेप्रमाणे नवीन वर्ष सुरू होऊन पाच दिवस झाले आहे. त्यामुळे भारतीय सौर दिनदर्शिका नवीन वर्षासाठी घ्यायला हरकत नाही. कृपया पत्ता किंवा ऑनलाईन सुविधा कुठे असेल तर कळविण्याचे कष्ट घ्यावेत.
    बाळासाहेब पुरी : मोबाईल क्रमांक – 7709039833

  4. सर मी इच्छुक आहे आपल्या राष्ट्रीय वृत्ती जोपासली

  5. I could not fully understand the post as i dont know marathi, used google translate to understand it but obviously google wasnt much help.

    Is there a Hindi or English version of the post available.

    Is this calendar accessible? Is it different from panchang that we use?

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..