आज ८ ऑक्टोबर. देवरुख येथील ‘मातृमंदिरच्या मावशी ऊर्फ मा.इंदिराबाई हळबे यांची पुण्यतिथी.
इंदिराबाई हळबे या समाजसेविका होत्या. इंदिराबाई रघुनाथ तथा मावशी हळबे मूळच्या रत्नागिरीतील केळय़े-मजगावच्या, पूर्वाश्रमीच्या चंपावती वासुदेव खेर-कुलकर्णी. प्रचंड गरीबीमुळे अवघ्या ४ इयत्तेपर्यंतचेच शिक्षण झालेल्या मावशींचे वयाच्या १३ वर्षीच लग्न झाले. लग्नानंतरचा काही काळ सुखात जात असतानाच त्यांना दुदैवाने वेढले. लग्नानंतर अवघ्या १० वर्षात त्यांना वैधव्य आले, त्यातून सावरत असतानाच त्यांना अपत्य वियोगाचे दुखही पेलावे लागले. मात्र या धक्क्यातून खचून न जाता आपली मुलगी मीनाचे डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगत त्यांनी नर्सिंग शिकण्याचा निर्णय घेतला. आपल्या एकाकी आयुष्य त्यांनी समाजसेवेसाठी वाहून घेतले. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात इंदिराबाई हळबे यांनी देवरूखसारख्या ग्रामीण भागात राहून रूग्णसेविकेसारखा खडतर कोर्स पूर्ण केला.
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवरुख गावी १९५४ साली त्यांनी ‘मातृमंदिर’ ही संस्था स्थापली. समाजसेवेसाठी आणि गोरगरिबांना आरोग्य सेवा पुरविता याव्यात यासाठी दोन खाटांच्या प्रसूतिगृहाने मातृमंदिरची सुरवात केली. मावशींच्या धडाडीने प्रभावित होऊन देवरुखच्या लक्ष्मणराव राजवाडेंनी आपली २४ एकर जागा मावशींना सामाजिक कार्यासाठी मोफत दिली. या जागेतच मातृमंदिररुपी रोपटयाचा महाकाय वृक्ष आज विस्तारला आहे. ग्रामीण दुर्गम भागात कार्यरत असताना अनाथ मुलांची होणारी परवड नजरेत आल्यावर त्यांनी गोकुळ या अनाथालयाची स्थापना केली. मुलांवर चांगले संस्कार रुजविण्यासाठी वाचनालयासह होतकरुंना चांगले शिक्षण घेता येण्यासाठी विद्यार्थी वसतीगृहाची स्थापना केली. शिक्षणाचे महत्व तळागाळात पोहोचवण्यासाठी बालवाडय़ांची निर्मिती झाली. ग्रामीण भागातील वीज-रहदारीचे प्रश्न विचारात घेऊन ग्रामविकास हा व्यापक दृष्टीकोन विचारात घेऊन त्यांनी शेती, मृदसंधारण, वनीकरण व पाणलोटक्षेत्र विकासाचे कार्य उभारले. तालुक्यातील महिलांच्या व शेतकऱयांच्या आजच्या प्रगतीचे सार या प्रयत्नांमध्ये सामावले आहे. तालुक्यात आधुनिक तंत्रज्ञानाने होणारी शेती, शेतकऱयांचे उंचावलेले जीवनमान, आरोग्य-पाणी-स्वच्छतेविषयी झालेली जाणीवजागृती, महिलांमध्ये नेतृत्वासाठी निर्माण झालेला आत्मविश्वास यासर्वासाठी मातृमंदिरचे योगदान निश्चितच मोठे राहिले आहे.
बचत-पाणी-शेती-वनीकरणाचे ६० वर्षांत हजारो प्रयोग संस्थेने यशस्वी केले आहेत. विविध परदेशी संस्थांशी तांत्रिक सहकार्य करत येथील शेतकऱयाला अधिकाधिक ज्ञानाने समृध्द बनवून त्यांचे जीवनमान उंचावले आहे. श्रमप्रतिष्ठेचे मर्म समजावून देत नैसर्गिक जाद्धूद्बूरह्नर्द्ब व छोटय़ा नळपाणी पुरवठा योजना आखून तालुक्यातील मोठा पाणी प्रश्न संस्थेने हलका करुन आपला लोकचळवळीचा विशेष पर्टनच तयार केला आहे. त्यामुळेच संस्थेचा उल्लेख आज ग्रामविकासाचे विद्यापीठ या आदराने होताना दिसतो. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र, उद्यानपंडीत या मानांच्या पुरस्कारांसह महाराष्ट्र राज्य सिंचन परिषदेचा विशेष सन्मानही संस्थेने मिळवला आहे.
गेल्या ५६ वर्षांत देवरूख येथील मातृमंदिर संस्थेचा विस्तार विविध क्षेत्रात झाला. रुग्णालयाच्या बरोबरीने शेती, बचत गट, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अनाथालय, पाणीपुरवठा, ग्रामीण विकास आणि शेती विद्यालय अशा क्षेत्रांत संस्थेने आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला आहे. मा.इंदिराबाई हळबे ८ ऑक्टोबर १९९८ यांचे निधन झाले.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
संपर्क :- 02354-241056
विजय नारकर, मातृमंदिर संस्था
Leave a Reply