हिंदी, बंगाली अभिनेत्री इंद्राणी मुखर्जी यांचा जन्म दि. १ मार्च १९४२ अलाहाबाद येथे झाला.
सुपरस्टार राजेश खन्ना यांची इंद्राणी मुखर्जी या पहिली हीरोईन होत. १९६६ मध्ये आलेल्या राजेश खन्नांच्या ‘आखरी खत’ या पहिल्या चित्रपटात इंद्राणी मुखर्जी त्यांच्या हीरोईन होत्या. एक अत्यंत देखणी अभिनेत्री म्हणून त्यांना ओळखले जाते. राजेश खन्नाबरोबरचा त्यांचा ‘आखरी खत’ हा सिनेमा बऱ्यापैकी गाजला होता. ‘उस ने कहा था’, ‘परवरीश’, ‘धरमवीर’, ‘हकिकत’, ‘हीर रांझा’ अशा कितीतरी सिनेमांतून त्या झळकल्या. मात्र आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये त्या सामील होऊ शकल्या नाहीत. मीनाकुमारीसारखे सौंदर्य होते, पण ते स्थान त्यांना मिळाले नाही. १९८४ पर्यंत इंद्राणी मुखर्जी यांनी सिनेमांत कामे केलीत. अनेक चित्रपटात अभिनेत्री, आई, बहीण अशा भूमिका त्यांनी वठवल्या. सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी त्या अलाहाबाद येथील ऑल इंडिया रेडिओवर हिंदी नाटकांत काम करत असत. त्यांच्या थोरल्या भगिनी माया मुखर्जी या बंगाली सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. बहिणीच्या सांगण्यावरुन इंद्राणी यांनी सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला होता. अभिनेत्री नूतन आणि शोभना समर्थ या स्पर्धेच्या परीक्षक होत्या. १९६० मध्ये बिमल रॉय यांनी त्यांना ‘उसने कहा था’ या सिनेमात ब्रेक दिला. नंदा आणि सुनील दत्त या सिनेमात मेन लीडमध्ये होते. त्यानंतर १९६१ मध्ये त्यांना शशी कपूरसोबत ‘धरमपूत्र’ या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. १९६६ मध्ये सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या पदार्पणातील सिनेमा असेल्या ‘आखरी खत’ यामध्ये काम करण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे इंद्राणी मुखर्जी राजेश खन्ना यांना सिनिअर होत्या. हा सिनेमा बराच गाजला. इतकेच नाही तर भारताकडून ऑस्करसाठी पाठवला गेलेला हा पहिला सिनेमा होता. त्यांनी केवळ हिंदीतच नव्हे तर मराठी आणि भोजपूरी या सिनेमांमध्ये अभिनय केला. ‘अपराध’ या मराठी सिनेमात तर ‘लागी नाही छुटे राम’ या भोजपूरी सिनेमात त्या झळकल्या. १९८० मध्ये इंद्राणी यांनी सिनेसृष्टीला रामराम ठोकला. प्रसिद्ध व्यापारी किशनलाल खन्ना यांच्यासोबत त्या विवाहबद्ध झाल्या. १९९२ मध्ये त्या नाशिकला स्थायिक झाल्या. त्यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. दीपांजली आणि मोन्या ही त्यांच्या मुलींची तर अनिरुद्ध आणि दीपांकर ही त्यांच्या मुलांची नावे आहेत. इंद्राणी मुखर्जी यांनी १९६० ते १९८४ या काळात जवळजवळ ५० सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.
https://www.youtube.com/watch?v=S4MQ5QbDkuA
https://www.youtube.com/watch?v=fVKY-jZneGk
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply