काव्य शास्त्र विनोद गुंफणारी चतुरस्र लेखिका इंद्रायणी सावकार यांचा जन्म २६ जून १९३४ रोजी पुणे येथे झाला.
इंद्रायणी सावकार यांचे आजोबा भाऊसाहेब साठे हे वकील होते आणि आईचे वडील धर्मानंद कोसंबी ऊर्फ बापू हे संस्कृतचे प्रकांड पंडित आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक होते. या दोघांमुळेच इंद्रायणींना संस्कृतची गोडी लागली. इंद्रायणी सावकार या पुण्याच्या मॉडर्न हायस्कूलमधून १९४९मध्ये मॅट्रिक झाल्या. त्या परीक्षेत त्यांना युनिव्हर्सिटीत संस्कृतमध्ये पहिली आल्याबद्दल जगन्नाथ शंकरशेठ पारितोषिक आणि इंग्रजीत पहिली आल्याबद्दल दादाभाई नौरोजी पारितोषिक मिळाले. १९५३ मध्ये इंद्रायणी सावकार या फर्गुसनमहाविद्यालायातून बी.ए.(ऑनर्स), आणि १९५५मध्ये सॉरबॉन-पॅरीस विद्यापीठातून डी.एल.(Doctorat es Lettres) झाल्या.
इंद्रायणी सावकार यांचे माहेरचे नाव इंद्रायणी साठे. लग्नानंतर इंद्रायणी साठे या इंद्रायणी सावकार झाल्या. त्यांचे पती प्रभाकर सावकार हे एम.एस्सी. पीएच.डी आहेत. २० कादंबऱ्या, १६ लघुकथा संग्रह इतर मराठी-इंग्रजी वाङमयीन लिखाण याची संख्या ५० च्या वर आहे. मराठी मासिकांतून आणि त्यांच्या दिवाळी अंकांतून प्रकाशित होत असलेल्या मराठी लघुकथा हे त्या अंकांचे भूषण असे. आकाशवाणीवर विविध विषयांवरील भाषणे, संस्कृत वृत्तनिवेदिका, दूरदर्शवर मराठी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन याही भूमिका त्यानी पार पाडल्या आहेत.
इंद्रायणी सावकार यांनी काही वर्षे वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीबाई पाटील यांच्या खासगी सेक्रेटरीचे काम केले आहे. इंद्रायणींचे पती प्रभाकर सावकार हे माजी खासदार प्रकाशबापू पाटील यांचे सहकारी होते. इंद्रायणींचा या निमित्ताने मराठी राजकारणी लोकांशी संबंध आला. त्यांच्या कादंबऱ्यांतून येणारी राजकारणी पात्रे ही त्या अनुभवांवरच बेतलेली असावीत.
१९८९पासून पुढे अनेक वर्षे इंद्रायणी सावकार दैनिक ’सामना’च्या उपसंपादक होत्या. स्वतः लेखिका असल्याने त्या इतर स्त्रियांनाही लेखनासाठी उत्तेजन देतात. इंद्रायणी सावकार यांनी, सांगली जिल्ह्यातल्या अंकलखोप गावातील शेतकरी महिला वैशाली पाटील यांना लिहिते केले. त्यांचा ’ठिबक सिंचना’वरचा लेख इंद्रायणी सावकारांनी वर्तमानपत्रात छापून आणला, आणि त्यांना ५०० रुपये मानधन मिळवून दिले. आज वैशाली पाटील यांची सहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
वैशाली पाटलांवर इंद्रायणींनी ’शेतावर राहणारी लेखिका’ हा लेख लिहिला होता. अनेक ऋषीमुनींच्या कथांचा समावेश असलेले ‘Stories of Sages’ हे पुस्तक त्यानी परदेशस्थ भारतीय मुलांना आपल्या पौराणिक संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून लिहिले आहे व परदेशात त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
इंद्रायणी सावकार यांनी लिहिलेली The White Dove ही कथा, इंग्रजी आणि जर्मन भाषेतील ’एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रियांसाठी लिहिलेल्या कथा’ या प्रकारच्या कथासंग्रहांत समाविष्ट झाली आहे. Our Inheritance of Spirituality (आपला संस्कृतिक वारसा) या त्यांच्या पुस्तकाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply