ताटात वाढलेलं जेवण ताटातून तोंडात आणि आता पोटात जाणारे. आपल्याला हवं तसं संस्कारीत करून अन्न खाल्ले. घश्यातून जेवढे बारीक होऊन उतरायला हवं तेवढं दातांनी दाढांनी, सुळ्यांनी बारीक केलं. दात दाढा सुळे प्रत्येकाचे काम वेगवेगळे. ज्याला जी जबाबदारी दिली आहे, तेवढं काम निमूटपणे करत असतो. कोणतीही तक्रार नाही, कोणतीही भांडणे नाहीत, मलाच मोठे तुकडे बारीक करायचं काम का, मी लहानच तुकडे बारीक करणार. मला नाही ते काम आवडत, मला आपलं एवढंच जमेल, असं कोणताही दंतप्रकार म्हणत नाही. मोठे तुकडे आपोआपच सुळ्यांनी फोडले जातात. फोडलेले तुकडे दाढांकडे येतात, ते बारीक करून झाले की, परत इकडे तिकडे फिरवून काही शिल्लक राहिले नाही ना, याची चाचपणी मधे मधे जीभ करत असते, काही काम बाकी राहिले असेलच तर दात आहेतच. दातांना घट्ट धरून ठेवायला हिरडी आहेच. म्हणजे दात घट्ट हवेत तर हिरड्याही तेवढ्याच मजबूत पाहिजेत. नाहीतर ज्या घराचा पाया कमकुवत असतो, ती घरे कितीही सुंदर टाईल्सनी सजवलेली असली तरी छोटा भुकंप सगळं घर उद्ध्वस्त करून टाकतो, तसं एखादा खडखडा लाडू किंवा चिक्की चा तुकडा देखील, सगळे दात खाली पाडू शकतो.
एकमेकांना पूरक असलेले हे इंजिनियरींग आधी नीट शिकले तर अन्य कोणत्याही क्षेत्रातील, कोणत्याही समस्या सोडवता येतील, असे वाटते.
कोणतेही अन्नावशेष बाहेर पडू नये यासाठी गाल आहेत. ज्यांचे गाल कॅन्सर सारख्या आजाराने काढावे लागलेत, त्यांच्या व्यथा लक्षात घेतल्या की गालाचे महत्व समजते. केवळ गालावर खळी पुरते गाल लक्षात ठेवायचे नाहीत.
ज्या विधात्याने हे सर्व निर्माण केले तो केवढा मोठा स्ट्रक्चरल इंजिनिअर असेल ना !
बारीक झालेले अन्न घश्यातून आत खाली जाऊ शकेल अशी खात्री झाली की, जीभ आपले काम करते. आणि अन्न खाली उतरवले जाते.
ढकलून दिले जात नाही, तर सापाच्या तोंडातून जसे अंडे हळुहळू आत सरकवले जाते, तसा अन्नाचा गोळा आत लहरीप्रमाणे सरकवला जातो.
अगदी अलगद लहरेदार !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
25.03.2017
Leave a Reply