प्रत्यक्ष इंद्रिय पचनाला ताटातच सुरवात होते. आपल्या हातानी, बोटांनी आपण आहार जेवायला सुरवात करतो. म्हणजे त्या अन्नाचा स्पर्श आपण अनुभवतो. एखादा पदार्थ गरम, गार, कोमट, कडक, मऊ, त्याचा घट्टपणा, पातळपणा हे आपण बोटांमार्फत अनुभवतो.
सुरी काट्या चमच्याने जेवत हा अनुभव घेता येईल का ? नाही.
आणि हातपाय पाण्याने धुवुन जेवायला बसावं हे ओघाने आलंच.
आणि नखं सुद्धा कापलेलीच असावीत, हे पण गृहीत धरलेले असते. नाहीतर नखातील घाण जेवताना पोटात जाते, त्याने पोट दुखते, हे इयत्ता दुसरी अ मधे आपण शिकलेलो आहोतच !
हेच भारतीयत्व !
बाळाला भरवताना सुद्धा चमचा वापरू नये. बाळाला सुद्धा या ज्ञानेंद्रियांचा अनुभव घेऊ देत ना ! घास किती गरम आहे हे आईच्या हाताला सुद्धा समजलं पाहिजे. नाहीतर घाई घाईत चमच्याने जर त्या बाळाला काही गरम भरवलं तर बाळाचं काही खरं नाही. जमाना जरी चमच्यांचाअसला तरी “हात” असताना, वेगळ्या चमच्यांची काय गरज ?
भात किती मुरडला पाहिजे, ते चमच्यापेक्षा बोटानाच कळेल ना. आता चायनीज राईस बाहेर मुरडायचा नसतो, हे मॅनर्स समजल्यानंतर चाजनीज राईस खायला चमचा ठीक आहे. पण नूडल्सना मात्र स्टीकच लागणार.
कोकणातल्या ताज्या शेवया खाताना हाताच्या पाची बोटांचा युक्तीने वापर करता यायलाच हवा. शेवया नारळाच्या रसात बुडवून अंगावर न सांडता, सर्व शेवया बाहेर न लोंबता, थेट तोंडात घालवण्याची ती मजा स्टीकने खाण्यात नाही.
दक्षिण भारतीय लोक इडली सांबार खाताना सुद्धा काटे चमचे वापरत नाहीत. इडली हातानी कुस्करून, सांबारात बुचकळून, भुरके मारत खातात.
पंजाबी लोकांना पराठा कधी चमच्याने खाताना बघितलंय ? दोन्ही हातानी धरून त्याला उभा आडवा फाडून दह्यात बुडवूनच खातात.
शेवग्याची शेंग चमच्याने कशी खाणार ? तर्जनी आणि करंगळी मधे उभी धरून थम्स अप करीत, सगळा गर अंगठ्यावर कोरून कोरूनच खायचा, त्यापेक्षा तो शेंगेचा तुकडाच तोंडात कोंबायचा आणि त्या तुकड्याचे पार रसग्रहण करून चोथा चिपाड करूनच बाहेर काढायचा, हा शेंग खाण्याचा उत्तम प्रकार.
आमरसात पुरी बुडवताना तिच्या दोन बाजू तर्जनी आणि अंगठ्यात पकडून पुरीला आमरसाच्या वाटीत अशी आंघोळ घालून बाहेर काढावी की जशी विहिरीत कळशी.
समोसा, वडापाव खाताना काय चमच्याने खायचा ? मस्त दोन्ही हातांनी धरून जणुकाही माऊथ ऑर्गन वाजवतो आहोत, असा भास दुसऱ्याला होईल अशा शिस्तीत राहूनच वडापाव खाल्ला पाहिजे.
आहारीय पदार्थ पचवण्यासाठी तो तोंडात जाण्याआधी ताटातच पचवून घ्यायला सुरवात झालेली असते, हे समजलं म्हणजे झालं.
जो पदार्थ जसा खायचा तसा खाल्ला तरच त्यातून इंद्रियाना आनंद मिळतो, नाहीतर करकोच्याला ताटलीतून आणि कोल्ह्याला बाटलीतून खीर “सर्व्ह” केल्यासारखं होईल.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
17.03.2017
Leave a Reply