नवीन लेखन...

इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग चौवीस

मन मनास उमगत नाही

इंद्रियातील सर्वात सूक्ष्म इंद्रिय म्हणजे मन. या मनाचा सहभाग पचनामधे महत्वाचा असतो. कशासाठी हे अन्न मी सेवणार ? असा विचार त्यावर चिंतन मनन केल्याशिवाय जेवू नये. यासाठी घास बत्तीस वेळा चावायचा. तेवढाच वेळ चिंतनाला मिळेल. लाळ चांगली मिसळेल पचन सुलभ होईल आणि महत्त्वाचे म्हणजे लक्ष जेवणातच राहील.

खाताना भीती बाळगू नये, आणि खाल्ल्यावर आठवू नये.
मी हे खाल्ले तर मला चालणार का ? मला अमुक पदार्थ पचेल का ? हे उष्ण आहे की थंड ? अशा शंका कुशंका मनात आणून खाल्ले तर हमखास त्रास होतो. आणि खाऊन झाल्यावर, “उगाच खाल्ले, त्यानेच त्रास झाला असणार ! असं आठवत खाल्लेल्या अन्नाला दूषणे दिली की पचन बिघडणारच !

रोग असेल तेव्हा पथ्य नाहीतर प्रत्येक वेळी प्रत्येक पदार्थ तपासूनच खाल्ला पाहिजे असं नाही. आयुष्य कसं मस्त मजेत जगावं. संसारातल्या सर्व सुखांचा आस्वाद घ्यावा. पण त्यांच्या आहारी जावू नये, एवढी खबरदारी जरूर घ्यावी.

समर्थ म्हणतात,
संसार मुळीचा नासका, विवेके करावा नेटका।
नेटका करीता, फिका होत जातो ।।
त्यातील आसक्ती सोडावी म्हणजे गुंतुन राहू नये, मायेत अडकू नये, हे मला पाहिजेच या नादात वर्तमानातला आनंद हरवू नये. नसलं तरी चालेल, असलं तर आनंदच आहे, ही मनोवृत्ती आपल्याला प्रयत्नांनी, विवेक वापरून तयार करता येते.

विशेषतः जेवताना मन प्रसन्न असलेच पाहिजे. तरच भावना आनंदाच्या तयार होतात, राग, असूया, मत्सर, द्वेष, भांडण, मनात ठेवून जेवलो तर मेंदूतले न्युरो ट्रान्समीटर बदलतात. आपल्याच मनातल्या भावना चांगल्या हव्यात असे नाही तर समोर सुद्धा चेहरा हसरा हवा. टीव्हीवर सुरू असलेली नकोत ती भांडणे, नको त्यांच्या अंत्ययात्रा, नकोत त्या विषयवासना चाळवणाऱ्या जाहीराती, आणि याच्या सगळ्या समोर आपण जेवणार ! कसं पचणार आणि कसं त्यातून चांगलं तयार होणार ?

आज पाश्चात्य जगतातील अशांती भारतात येऊन पोचली आहे. न्यूनगंडाने भरलेली पिढी अनेक दुसऱ्या रोगाना जन्माला घालत आहे.
‘मला काय त्याचे, माझे घर तर जळत नाही ना, मग मी कशाला काळजी करू ? एवढे बेभरवंशी राहून चालणार नाही. ती आग स्वतःच्या घरात केव्हा भडकेल ते कळणार देखील नाही.

वेळीच सावध व्हायला हवे. पाश्चात्य जगतात ही अशांती कशी आली, यावर चिंतन व्हायला हवे. मनाचा तोल कसा सांभाळावा, याच्या नीतीनियमांची चौकट, भारतीय संस्कृतीच्या इतिहासात आहे. वेदवाञ्ग्मय, पुराणे, उपनिषदे, रामायण, महाभारत, गीता, नाथांचे भागवत, तुकारामांची गाथा, आणि समर्थ रामदास स्वामींचे मनोबोध या सर्वांचा पुनः एकदा नव्याने अभ्यास व्हायला हवा. मनाचे श्लोक पुनः एकदा पाठांतराला घेतले पाहिजेत.

मनाच्या आजाराची चिकित्सा सूत्रे म्हणजे मनाचे श्लोक आहेत, हे जेव्हा जर्मन लोक आम्हाला सांगतील तेव्हा आम्हाला पटेल. नाहीतर आम्हाला ‘रामदास स्वामी हा माणूस म्हणे आमच्या शिवरायांचा गुरू नव्हताच, यासारख्या बिनबुडाच्या भांडणात गुंतुन ठेवले जात आहे. वेळ जात नसलेली बिनडोक माणसे, नको ते वाद उकरून काढून, समाजमनाला कलुषित करून जातीय वादाचे भूत जागे करीत आहेत.

या सर्वांपासून सावध रहाणे, आपल्या मनाला सुरक्षित ठेवणे, काळाची गरज आहे.
” चला, चर्चा करूया मनाच्या आरोग्याची ! ” असे, जागतिक आरोग्य संघटनेचे या वर्षीचे घोषवाक्य आहे. या निमित्ताने आपणच आपल्या मनाशी संवाद साधूया. आपल्या मनाशी संवाद साधायला आपले मन आपल्या जवळ तर हवे, कारण ते आजच्या व्यस्त जीवनशैलीत आपल्याजवळ रहातच नाही. त्यामुळे ते आपल्यालाच उमगत नाही.
मन मनास उमगत नाही,
आधार कसा शोधावा ?

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
08.04.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..