नवीन लेखन...

इंद्रिये, अवयव आणि आहार – अंतिम भाग पंचवीस

निरोगी कोण ?

आपण नक्की निरोगी आहोत का, हे समजण्यासाठी ग्रंथात एक व्याख्या सांगितली आहे. ती व्याख्या अधिक सोपी करून सांगितली तर समजेल.
आपल्या शरीरातील वात पित्त आणि कफ हे तीन दोष. सात धातु जसे, रस म्हणजे रक्ताला पातळपणा निर्माण करणारा द्रव पदार्थ, रक्त, मांस, अस्थि म्हणजे हाडे, मज्जा म्हणजे हाडे कवटी इ. च्या मधला भाग म्हणजे जसे मेंदू, आणि शुक्र म्हणजे शक्ती हे सात धातु, मल, मूत्र, घाम हे तीन मल आणि आर्तव. हे सर्व आपल्या ‘देवदत्त’ प्रमाणात हवेत. म्हणजे देवाने दिलेले.

यांच्या बरोबरीनेच, मन आत्मा इंद्रिये यांचे प्रसन्नत्व ओळखावे. तो निरोगी होय.

जन्माला येताना जे शरीर संघटन असते, तसेच रहाणे म्हणजे आपली प्रकृती. ही प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते. त्यात सहसा बदल होत नाही. जन्मतः जे शरीर संघटन असते, ते बदलत नाही. अगदीच मोठ्ठे उलथापालथ करणारे आजार झाले तरच शरीर संघटन बदलते. आणि याचे आपल्या दैनंदिन जीवनावर कोणतेही नकारात्मक परिणाम दिसले तर ती विकृती समजावी.

जिममधे जाऊन फक्त मांस धातुचे संघटन बदलवू शकतो. मना मार्फत, विशिष्ट व्यायामांनी अग्निचे कार्य बदलवू शकतो. प्रकृती बदलवता येत नाही.

प्रकृती आणि अग्नि सोबतच आणखी दोन गोष्टींचा विचार पचनामधे महत्वाचा असतो, कोष्ठ आणि सार. या दोन गोष्टींना सामान्य परिभाषेत समजावणे हे जरा अवघड आहे.
कोष्ठ परीक्षणामधे, एखाद्याचा कोठा कसा असतो, याचे अनुमान केले जाते. व्यवहारात आपण म्हणतो, हलका कोठा, जड कोठा, मध्यम कोठा. स्रोतसांची आतड्यांची गती कशी आहे, त्यावर दाब किती आहे, हालचाली किती आहेत, अन्न पुढे पुढे सरकायला किती वेळ लागतोय, यावर कोठा ठरत असतो. हा सुद्धा सहसा बदलत नाही. ठरलेला असतो. प्रत्येकाचा “नाॅर्मल” वेगळा असतो. हे पण लक्षात ठेवावे. जर काही त्रास नसेल तर आपणच आपले ठरवून, ओढून ताणून बदलवणे घातक असते. काही जणांना दोन नंबरला औषधे घेऊनसुद्धा समाधानकारक होत नाही, हे कोष्ठावर अवलंबून असते.

आणखी दुसरी गोष्ट म्हणजे सार. मूळ प्रकृतीशी जवळ जाणारे, पण आपले स्वतःचे वैशिष्ट्य असणारे, प्रकृतीहून भिन्न असणारे हे परिक्षण असते. सारता ही धातूंवर अवलंबून असते. एखादी रस सार व्यक्ती ही रसरशीत दिसते. तिचे डोळे पाणीदार असतात. तिच्याकडे बघितल्यावरच प्रसन्न वाटते. त्वचा तुकतुकीत चमकणारी असते. अशी सात धातुंच्या सात सार परीक्षा करायच्या असतात. जसा वैद्याचा अनुभव वाढत जातो, तसा एखाद्याचा सार निर्णय त्याला सहज घेता येतो. आणि औषध ठरवावे लागते.

म्हणजे एखाद्याला “तपासल्यानंतर सल्ला अधिक चांगला देता येईल ” असे जेव्हा सांगितले जाते, तेव्हा सर्व तपासणी म्हणजे पॅथालाॅजीची तपासणी अपेक्षित नसते तर आयुर्वेदीय पद्धतीने, हे सार परीक्षण, अग्नि परीक्षण, कोष्ठ परीक्षण करणे अपेक्षित असते, जे कोणत्याही पॅथ लॅबमधे शक्य नसते.

पोट दाबून ते हलके आहे का, घट्ट लागते का, तिंबलेल्या कणकेप्रमाणे मऊ आहे की, आठ दिवस फ्रिजमधे मळलेली कणिक ठेवल्यानंतर जशी लागते, तसे पोट घट्ट लागते का, हे तपासून च ठरवता येते ना ?

या सर्वांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध पचनाशी येत असतो, त्यावर औषधे त्यांचे प्रमाण, औषध कशाबरोबर घ्यायचे, मधातून, तुपातून, दुधातून ते अनुपान, सकाळी, दुपारी, सायंकाळी रात्री , जेवतानामधे मधे, जेवणापूर्वी, जेवणात मिसळून, जेवणानंतर कधी घ्यायचे हे ठरवावे लागते.

आयुर्वेद म्हणजे चार दोन मुळ्या एकत्र करायच्या, कशात तरी उकळवून कशाहीबरोबर, केव्हाही घ्यायच्या, एवढं सोप्प नाहीये. घरगुती औषधे सांगायला खूप मर्यादा येतात हे लक्षात ठेवावे. घरगुती उपाय करणे हा फक्त त्यावेळी अचूकपणे उपयोगी होणारा नुस्खा असतो. त्याला अनेक मर्यादा येतात. हे या निमित्ताने लक्षात घ्यावे. घरगुती (यथा मिलीतोपचार द्रव्यैः ) उपाय करणे म्हणजे आयुर्वेद चिकित्सा करणे नव्हे.
पण जे उपलब्ध आहे त्यातच, हाताशी आहेत ती द्रव्ये वापरून, रूग्णाच्या आत्यंतिक वेदना कमी करण्याचे सामर्थ्य फक्त आयुर्वेदातच आहे.

आपण निरोगी आहोत की नाही, हे कसे ठरवावे ?

सकाळी हलकेच जाग यावी.
उठल्यावर लगेच “ती” जागा आठवावी.
पोट, शरीर हलके ही प्रसन्नता अनुभवावी.
समाधानाची अनुभूती घ्यावी.
सणसणीत भूक लागावी.
मनमोकळ्या आहाराने ती भरावी.
दिवसभर गाडी पळवावी.
तरी सायंकाळी रिझर्वावर न यावी.
शक्ती पुरवून वापरावी.
विझत्या अग्नीवर पुरेशी लाकडे घालावी.
पुनः भुकेची जाणीव व्हावी.
हलक्या आहाराने ती पुरी करावी.
झालेली कामे सहज आठवावी.
ही ईश्वराची कृपा समजावी.
आणि मस्त झोप यावी.
निश्चिंत मनाने जबाबदारी सोपवावी.
“तो” मला उठवणार, याची खात्री असावी.
आणि सकाळी हलकेच जाग यावी.

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
09.04.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..