नवीन लेखन...

इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग तीन

स्वयंपाकघरात मधे वाढलेली राईस प्लेट थेट टेबलावर आणून समोर ठेवणे आणि टेबलावर ताट ठेवून एकामागून एक पदार्थ आणून वाढणे, यात फरक आहे. पदार्थ कोणत्या क्रमाने वाढले जातात, त्या क्रमालाही महत्व आहे. सुरवात लिंबू मीठाने करून शेवट वरणभातावर वाढलेल्या तुपाने करावा. तूप वाढून झाले की बसलेल्यांनी समजावे, आता वाढायला येणारी आणखी कोणी नाही. आता फक्त “हर हर महादेव” म्हणून आक्रमणाला सुरवात करायची, एवढे समजले तरी पुरे.

ताटात जसजसा एक पदार्थ येत जातो, तस तसा डोळ्यांनी म्हणजे चक्षुरेंद्रियांनी, घ्राणेंद्रियांनी म्हणजे नाकाने वास घेत त्याची वार्ता आतमधे पोहचवलेली असते. बाकी सगळे अगदी तैय्यार असतात. प्रत्येक पदार्थ वेगळा वाढल्यामुळे प्रत्येक पदार्थाचे रसग्रहण अगदी उत्तम करता येते.

मीठ वाढताना त्याची सूक्ष्म चव आपण अनुभवतो, लिंबू वाढताना, त्याच्या रसाचा फवारा आपल्या तोंडात उडायला सुरवात होते, पापड वाढताना त्याचा कुर्रकुर्र आवाज कानात नाद निर्माण करतो. भजी आल्यावर त्याचा खमंग वास चोंदलेलं नाक सैल करून टाकतो. लालबुंद रस्सा डोळ्यांनी बघताक्षणी पोटात भूक चाळवायला सुरवात झाली नाही, तरच नवल.

(काहीजण एवढे चाळवतात, की वाढला पापड झाला गट्टम, कोशिंबीर पुढच्या पानात वाढायच्या अगोदर ही संपली सुद्धा. वाढली भाजी खाऊन टाकली. याला पंगत म्हणत नाही. त्याचेही काही भारतीय नियम असतात, तेही “मॅनर्स” पाळलेच पाहिजेत. थोडा संयम हा हवाच. तरच “सहना ववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यम्, यातील सह ला महत्व आहे. ) असो.

तळलेला किंवा भाजलेला कुरकुरीत पापड त्याच्या आवाजाने, पुरणपोळी आपल्या स्पर्शाने, भजी आपल्या वासाने, चटणी आपल्या चवीने, आणि सुंदर रंगसंगतीने, असं छान वाढलेलं, पदार्थांनी भरलेलं ताट, बघताक्षणी डोळ्यांचेही पारणे फिटते. म्हणजे डोळ्यांनी ते पचवायला सुरवात केलेली असते.

शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या तन्मात्रा या परिपूर्ण आहारात एकवटलेल्या असतात. केवळ कॅलरीज मोजून जेवणे, वजनी प्रमाणात जेवणे, याला चौरस आहार म्हणता येईल का, विचार करून पहावे.

एकापेक्षा एक उत्तम पदार्थांचे एकमेकांमधे एकत्र झालेले वास. आणि आग्रह करून, प्रेमाने वाढणाऱ्यांचा सहवास यामुळे अग्निवृद्धी आपोआपच होत जाते. कधी एकदा ताटातले हे उत्तम पदार्थ पोटात जातात असे होऊन जाते.
हे सर्व मीच अगोदर अनुभवणार अशी जणु काही स्पर्धाच लागते सगळ्या इंद्रियामधे.
जो जे वांछील तो ते लाहो, अशी अनुभुति इंद्रिये घेत असतात, तो आनंद शब्दात वर्णन करणं अशक्यच आहे. याचा दृष्य परिणाम म्हणून हर हर महादेव चा गजर होण्याअगोदरचा कल्ला, पुढील पाच मिनिटांसाठी पूर्ण बंद झालेला असतो. निमूटपणे सर्वजण आतील प्रज्वलीत अग्निनारायणाला एकेका पदार्थाची आहुती देत असतात.

पंचहाभूतात्मक आहार, पंचमहाभूतात्मक शरीरासाठी, पंचमहाभूतांच्या तन्मात्रांसह…

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
18.03.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..