सर्वसामान्य लैंगिक समस्यांबद्दल काही खुलासा –
स्वप्नावस्था – झोपेत नकळतपणे वीर्यस्खलन होणे म्हणजे स्वप्नावस्था. “मनी वसे ते स्वप्नी दिसे” ही म्हण ह्या समस्येशी निगडीत आहे. मनात सतत लैंगिक विचार असले तर त्याची परिणीती स्वप्नातही होते. मेंदूतील हायपोथॅलॅमसद्वारा संप्रेरकांमध्ये तसे बदल होतात आणि स्वप्नावस्था निर्माण होते.
हस्तमैथुन – हस्तमैथुन म्हणजे मैथुनावस्थेचे काल्पनिक चित्र रचून हाताने शिस्नपीडन करून वीर्यपात घडविणे. सातत्याने लैंगिक विचार केल्याने मनावर कामवेग आरूढ होतो व त्यातून ही क्रिया करण्याची इच्छा निर्माण होते. हस्तमैथुन केल्याने लिंग लहान होते, वीर्य पातळ होते, वंध्यत्व येते असे अनेक गैरसमज समाजात चर्चिले जातात. हे निव्वळ गैरसमज असल्याने मनात कोणतीही अशी भीती बाळगू नये. परंतु “अति सर्वत्र वर्जयेत्” हा नियम लक्षात ठेवावा.
स्वप्नावस्था किंवा हस्तमैथुन ह्या दोन्ही अवस्था मानसिक दोषांमुळे व चुकीच्या आहारामुळे उत्पन्न होऊ शकतात. रज व तम ह्या दोन प्रकारच्या मानसिक दोषांच्या प्रभावाने, त्याचबरोबर मद्यपान, अमलीपदार्थ सेवन, अति मांसाहार, तामसी अन्न अशा कारणांमुळे ह्या अवस्था निर्माण होतात. सात्विक चिंतन, मनन, अभ्यास, वाचन, सुविचार अशा साध्या सोप्या गोष्टींचा अंगिकार व सुयोग्य संतुलित आहार केल्याने ह्या समस्यांपासून चार हात लांब राहणे शक्य आहे.
वीर्य पातळ होणे – हस्तमैथुन किंवा स्वप्नावस्था दीर्घकाळ राहिल्याने “वीर्य पातळ झाले” असी तक्रार अनेक रुग्ण करतात. हे म्हणणे चुकीचे आहे. अशा कारणांमुळे वीर्य पातळ होत नाही किंवा वंध्यत्व येत नाही. हा गैरसमज डोक्यातून काढून टाकावा. ह्यामुळे मानसिक असंतुलन मात्र वाढते आणि “आपण काहीतरी चुकीच्या कृत्यामुळे मोठ्या रोगाला बळी पडलो” अशी भीती वंध्यत्वाला कारणीभूत होते. वीर्य पातळ असो की घट्ट, त्यातील शुक्रबीजांची संख्या, चलनवळण गती, फ्रुक्टोजची पातळी हीच प्रजननक्षमतेला जबाबदार असते.
लिंग उत्थान समस्या – कुपित अपानवायु, मानसिक क्लेश आणि अपुरा रक्तसंचार ही तीन प्रमुख कारणे लिंग उत्थान समस्येशी निगडीत आहेत. नळाला रबरी पाईप जोडून पाणी जोरात सुरु केल्यावर पाईप ताठ होतो. लिंग उत्थान क्रिया नेमकी अशीच होते. पाईप वर बाहेरून दाब पडला किंवा त्यातील रक्त संचारात काही अडथळा आला तर रक्तसंचार खंडित होतो व उत्थान क्रिया बंद पडते किंवा कमी होते. आतड्यांमध्ये माळाचे खडे किंवा गॅस भरल्यामुळे शिस्नाच्या खालच्या बाजूला असलेल्या रक्तवाहिन्यांवर दाब पडतो व रक्तसंचार मंदावतो. ३० एम.एम.एच.जी. एवढा रक्तदाब लिंग सुप्तावस्थेत असतांना राहतो. लिंग पीडनाने हा दाब ९० ते १०० एम.एम.एच.जी. एवढा वाढतो. उत्तेजक शब्द, स्पर्श, रुप, रस व गंध अशा कारणांमुळे केंद्रीय मज्जा यंत्रणा उत्तेजित होऊन हा रक्तसंचार वाढविते.
मानसिक क्लेशनिवारक औषधे, बस्ति चिकित्सा, रक्तसंचार संतुलित करणारी औषधे योग्य सल्ल्याने घेतल्यावर उत्थान क्रिया सुरळीत होऊन उत्थान प्राकृत होते. ह्यात वयाची मर्यादाही महत्वाची आहे. तरुण वयात ज्याप्रकारे उत्थान होते तेढ्या प्रमाणात उत्थान होण्याची अपेक्षा वय वाढल्यानंतर करणे नक्कीच चुकीचे आहे. मधुमेही, स्थौल्य व उच्च रक्तदाबाचे रुग्ण ह्यांच्या समस्या निराळ्या असतात. प्रकृती, आहार, वय, रोगावस्था अशा गोष्टींचा विचार करून चिकित्सा करावी लागते.
हे औषध कुठे मिळेल.
याची किंमत किती आहे?