गर्भधारणेसाठी ऋतु – क्षेत्र – अम्बु – बीज हे चार घटक सुयोग्य स्थितीत असणे आवश्यक आहे. ऋतु म्हणजे योग्य काळ, क्षेत्र म्हणजे ठिकाण, अंबु म्हणजे आवश्यक असे सर्व हॉर्मोन्स व बीज म्हणजे सामर्थ्यवान पुरुष व स्त्रीबीज.
हे चार घटक सर्वदृष्टीने समृद्ध आणि सामर्थ्यवान होण्यासाठी गर्भधारणेपूर्वी पुरुष व स्त्री दोघांनी पंचकर्माने शरीरशुद्धी करावी असा शास्त्रादेश आहे. दैनंदिन चयापचयातून तसेच निरनिराळ्या विद्युतचुंबकीय लहरींपासून काही विषारी घटक सतत निर्माण होत असतात. त्यांना पेशी विघातक परमाणु (फ्री रॅडिकल्स) म्हणतात. पुरुष व स्त्रीबीजांवर तसेच अम्बु म्हणजे हॉर्मोन्सचे असंतुलन फ्री रॅडिकल्समुळे होऊन त्यांचे अनिष्ट परिणाम संपूर्ण प्रजनन यंत्रणेवर होतात. परिणामी त्यांचे प्राकृत कार्य आणि सामर्थ्य खालावते. मानसिक क्लेश, ताणतणाव, वाढते प्रदूषण, फास्ट फूड मधून सेवन केले जाणारे रासायनिक प्रिझर्व्हेटिव्हज किंवा रंग, वाढते वय अशा गोष्टींचा दुष्परिणाम देखील तितकाच महत्वाचा आहे. ह्या सर्व अनिष्ट गोष्टींचा प्रतिकार करून पुरुषबीज सामर्थ्य उत्तम ठेवणे हाच ह्या लेखाचा प्रमुख उद्देश आहे.
ऋतु – ऋतु म्हणजे काळ.
पूर्णषोडशवर्षा स्त्री पूर्णविंशेन सङ्गता शुद्धे गर्भाशये मार्गे रक्ते शुक्रेऽनिले हृदि ।। अ. हृदय, सूत्रस्थान १/८
सोळा वर्ष पूर्ण झालेली शुद्ध गर्भाशय असलेली स्त्री, जिचा अपत्यमार्ग, रक्त, शुक्रवायु, हृदयातील वायु अदूषित असेल व ती वीस वर्ष पूर्ण झालेल्या निरोगी पुरुषाबरोबर मैथुन करेल तिला उत्तम वीर्यवान संतती प्राप्त होते. ह्या श्लोकात पुरुषाच्या वयाचे वर्णन स्पष्ट आहे. अर्थात पुरूषबीज ह्या वयात उत्तम व स्वास्थ्यसंपन्न असते. ह्यालाच योग्य ऋतु समजावे. ह्यापेक्षा लहान वयात शुक्रबीज अविकसित असतात व वय जसजसे वाढत जाते तसतसे त्याची क्षमता कमी होऊ लागते.
क्षेत्र – शुक्रनिर्मिती आणि वहन करणारी संपूर्ण यंत्रणा म्हणजे क्षेत्र. शुद्ध शुक्र निर्मिती होण्यासाठी ही सर्व यंत्रणा सुस्थितीत आणि कार्यक्षम असणे जरुरीचे आहे. ही क्षेत्ररचना सकस राहण्यासाठी आहार, पंचकर्म चिकित्सा आणि औषधी चिकित्सा फलदायी ठरते. पुढे हा विषय विस्ताराने मांडला आहे.
अम्बु – ह्याठिकाणी शुक्राणुंसाठी खतपाणी म्हणजे अम्बु. बीजातून रोपटे व पुढे वृक्ष स्वरूप प्राप्त होण्यासाठी खतपाणी आवश्यक आहे. समृद्ध शुक्रधातुसाठी सुयोग्य हॉर्मोन्स (संप्रेरके) असा अर्थ येथे अभिप्रेत आहे. एफ. एस. एच.; एल, एच, टेस्टोस्टेरॉन ह्या संप्रेरकांचा असमतोल असल्यास औषधांच्या सहाय्याने सुधारता येतो.
बीज – बीज म्हणजे शुक्राणु. गर्भधारणा यशस्वी होण्यासाठी शुक्राणूंची संख्या किमान २० दशलक्ष असणे आवश्यक आहे. ह्यापैकी फक्त एकच शुक्राणु गर्भधारणा होण्यास पात्र ठरतो तरीदेखील ही संख्या कमी असून चालत नाही. ह्या शुक्राणूंना विशिष्ट गती असावी लागते. ह्या गतीला मोटिलिटी म्हणतात. हा शुक्राणु गर्भाशयात प्रवेश करून पुढे बीजवाहिनीच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचतो. एकूण शुक्राणूंपैकी कमीतकमी ३० % शुक्राणुंनी आपली विशिष्ट गती किमान एक तास टिकवून ठेवण्याची गरज असते.
शुक्राणूंच्या रचनात्मक दोषांमुळे वंध्यत्व आणि बीजदोषजन्य विकृती उत्पन्न होऊ शकतात. ह्याला मॉर्फलॉजिकल दोष म्हणतात. ह्यात पेशीतील डी. एन. ए. ची स्थिती बिघडलेली असते. त्यामुळे बीजदोषजन्य अनुवांशिक व्याधी उत्पन्न होतात. ह्यांना म्युटेजेनिक डिसऑर्डर्स म्हणतात. पंचकर्म व विशिष्ट औषधोपचारांनी ह्यावर मात करता येऊ शकते. परंतु हा विषय मोठ्या संशोधनाचा आहे. सध्या फक्त शास्त्राधारित सूत्रांच्या आधारे गृहीतकांच्या (Hypothetical) स्वरुपात हा विषय मांडता येतो.
प्राकृत शुक्रधातूचे मापन किमान २ मिली असावे. त्यात फ्रुक्टोजची मात्रा ३ मिलीग्राम प्रति मिली असावी. वीर्य द्रावित होण्याचा काळ २० मिनिटांपेक्षा कमी असू नये. ह्या सर्व गोष्टी वीर्य तपासणी करून समजू शकतात. काही चिह्ने व रुग्ण सांगतो त्या लक्षणांद्वारे इलाज करणे वंध्यत्वाच्या दृष्टीने आवश्यक ठरते. स्वप्नावस्था, शीघ्रपतन, मैथुनेच्छा न होणे, लिंगाला आवश्यक असलेला ताठरपणा प्राप्त न होणे अशा ह्या समस्या आहेत.
वरील सर्व लक्षणांची सविस्तर माहिती घेऊन आवश्यक त्या दोषावर सुयोग्य उपचार करून पुरुष वंध्यत्वाचा इलाज करता येतो.
वृषणकोषात (Scrotum) दोन वृषणग्रंथी (Testicles) असतात. ह्या ग्रंथींमध्ये शुक्राणूंची उत्पत्ती होते. पुढे सेमिनल व्हेसिकल्स नावाच्या कोषिका असतात, त्यातून वीर्याची उत्पत्ती होते. पौरुष ग्रंथींमधून (Prostate gland) चिकटसर द्रव ह्यात मिसळला जाऊन शुक्र धातु समृद्ध होतो. मेंदूतील विशिष्ट यंत्रणा उत्तेजित झाल्याने शुक्रवाहिन्यांच्या मार्गाने शुक्राणु व वीर्याचे हे मिश्रण शिस्नातून बाहेर टाकले जाते.
पुरुष वंध्यत्व चिकित्सा करतांना सर्वप्रथम वीर्य तपासणी केली जाते. ह्या तपासणीत शुक्राणूंची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आल्यावर त्याची चिकित्सा करावी लागते. ह्यासाठी अश्वगंधा, शतावरी, कवचबीज, गोक्षुर, तालिमखाना, विदारीकंद सारख्या वनस्पतींचा उपयोग होतो. ह्या वनस्पतीच्या सेवनाने शुक्राणूंची संख्या वाढते खरी परंतु हे शुक्राणु वीर्य स्खलनाच्या वेळी पुरेशा प्रमाणात बाहेर पडत नाहीत असे अनेक वेळा लक्षात येते. त्याची कारणे समजून उपचार करणे आवश्यक आहे.
शुक्राणूंची उत्पत्ती झाल्यावर शुक्रवाहिन्यांच्या मार्गाने वीर्य शिस्नापर्यंत येते. ह्या मार्गात काही अडथळा आला तर शुक्राणूंची कमतरता दिसून येते. आतड्यातील अपान वायु, मळाचे खडे हे त्या भागातील रक्तवाहिन्यांवर व शुक्रवाहिन्यांवर दाब निर्माण करू शकतात. हा दाब नाहीसा करण्यासाठी बस्ति चिकित्सा महत्वाची ठरते. बस्ति चिकित्सेने अपानाचे कार्यही सुरळीत होते.
अपानोऽपानगः श्रोणिवस्तिमेढ्रोरुगोचरः । शुक्रार्तवशकृन्मूत्रगर्भनिष्क्रमणक्रियः ।। अष्टांगहृदय, सूत्रस्थान १२/९)
अपानवायु गुदस्थानी रहात असून कटि, शिस्न व मांड्या ह्या ठिकाणी संचार करतो. तो शुक्र, आर्तव, मल, मूत्र व गर्भ ह्यांना योग्य काळी शरीराबाहेर काढण्याचे कार्य करतो. त्यामुळे शुक्र धातूची चिकित्सा करतांना अपानवायूचा विचार महत्वाचा आहे.
हे औषध कुठे मिळेल.
याची किंमत किती आहे?