शुक्रजंतू तयार होणे आणि गर्भाचे रोपण होणे येथपर्यंत अनेक अडथळे येऊ शकतात. शुक्रजंतू तयार न होणे, तयार झाल्यास ते व्यवस्थित तऱ्हेने पक्व न होणे, शुक्र-नलिकेमध्ये काही अडथळे आल्यामुळे शिस्नापर्यंत न पोहोचणे, शिस्नामधून बाहेर पडू न शकणे (इज्यॅक्युलेशन), बाहेर पडले तरी योनीमार्गातून- गर्भाशयातून गर्भनलिकेपर्यंत न पोहोचणे, स्त्रीबीजाशी फलन होऊ न शकणे अशी अनेक किंवा एकच कारण वंध्यत्व देऊ शकते. जर शुक्रजंतू तयार होत नसतील तर उपाय करणे कठीण.
तसेच स्त्रीबीज पण स्त्रीच्या शरीरात तयार होत नसेल तर त्यावरही उपाय करण्याची शक्यता कमीच. अशावेळी दात्याकडून जरुरीप्रमाणे स्त्रीबीज किंवा शुक्रजंतू घेऊन शरीराबाहेर किंवा स्त्रीच्या शरीरातच फलन करता येते व गर्भ राहू शकतो. पण अर्थातच एका बीजाचे जनुक दात्याचे असतात.
शुक्रजंतू शरीराबाहेर पडू न शकले तर ते खास उपकरणाद्वारे बाहेर काढून, बाहेरच किंवा स्त्रीच्या गर्भनलिकेत टाकून फलन करता येते. बाहेर स्त्रीबीजाशी फलन झाल्यास नलिका बालकाचा प्रयोग करता येतो. शुक्रजंतूचे प्रमाण खूपच कमी असले तर स्त्रीबीजाच्या पेशी रसात शुक्रजंतू टोचणे शक्य असते आणि फलन झाल्यावर स्त्रीच्या गर्भाशयात रोपण करणे शक्य असते. यावरून असे निदर्शनात येते की, पत्नी किंवा पती यापैकी एकात किंवा दोघांतही दोष असू शकतो. कधी कधी दोघांतही दोष नसूनसुद्धा २५% जोडप्यात वंध्यत्व असते ज्याचे निश्चित कारण कळत नाही (अन एक्सल्पेन्ड इन्फरटिलिटी), स्त्रीबीज किंवा शुक्रजंतूची प्रतिकारके रक्तात असतील तर शरीराबाहेर या बीजांचे फलन करणे हा उपाय आहे. पण जनुकामध्ये काही बदल असेल तर त्यावर उपाय कठीणच. वंध्यत्व असल्यास त्यावर उपाय अनेक आहेत तेव्हा जोडप्याने दोघांचाही पूर्ण तपास करून घेणे जरुरीचे आहे.
-डॉ. तरला नांदेडकर
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply