नवीन लेखन...

आयएनएस विराट विमानवाहू युद्धनौका

INS Virat - India's Aircraft Carrier

Naval Security - समुद्र सुरक्षा

विराटची तीस वर्षे सेवा

ऐंशीच्या दशकापर्यंत भारताकडे फक्त आयएनएस विक्रांत ही एकच विमानवाहू युद्धनौका होती. हिंदी महासागरावर आपले वर्चस्व कायम राहावे, यासाठी आणखी एका युद्धनौकेच्या शोधात भारत होता. अंतिमतः ब्रिटनच्या एचएमएस हार्मिसची खरेदी ४६५ मिलियन डॉलर्सला केली गेली. आणि भारतीय नौदलाच्या गरजांनुसार नूतनीकरण होऊन ती आयएनएस विराट म्हणून सेवेत रुजू झाली. विराट आपली सेवा योग्य पद्धतीने देण्यात यशस्वी झाली होती. भारतीय नौदलात दाखल झाल्यानंतर विराटची पाच वेळा दुरुस्ती करण्यात आली. भारतीय नौदलाच्या तंत्रज्ञांनी मात्र, अखेरपर्यंत ती अद्ययावत आणि कार्यरत ठेवण्याची किमया साध्य केली. त्यामुळेच अवघे दहा वर्ष आयुर्मान असणारी विराट तीस वर्षे सेवा देऊ शकली.

आयएनएस विराट ही दुसर्‍या महायुद्धाच्या काळात तयार करण्यात आलेली यंत्रणा असली, तरी त्यातील अनेक भाग आज सुस्थितीत आहेत. यातील काही यंत्रणा अन्य जहाजांवर बसविण्यात येणार आहे. १९९७ मध्ये विक्रांत निवृत्त झाली. त्यानंतर भारतीय नौदलाच्या ताफ्यात विराट ही अवघी एकच विमानवाहू युद्धनौका होती. भारताची नवी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रमादित्य ही रशियाकडून भारताला मिळण्यास विलंब झाला. सन २००७ मध्ये अपेक्षित असलेली ही विमानवाहू युद्धनौका नोव्हेंबर २०१३ अखेरीस नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. अलीकडेच विराटने मुंबई ते कोची बंदर हा अखेरचा प्रवास केला. कोचीमध्ये तिचे पुन्हा नूतनीकरण करण्यात आले. मात्र, ५७ वर्षांहून अधिक काळ सेवा दिलेल्या या विराट युद्धनौकेचे आयुष्य आणखी लांबविणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा सहा मार्च २०१७ रोजी विराटला अलविदा करण्याचा निर्णय झाला.

विमानवाहू युद्धनौका

जगात सर्वाधिक काळ वापरली गेलेली ही विमानवाहू युद्धनौका आहे. पाच लाख ८८ हजार २८७ सागरी मैल म्हणजेच १० लाख ९४ हजार २१५ किलोमीटर्सचा प्रवास विराटने केला. फ्लाइंग डेकवरून लढाऊ विमानांनी सुमारे २२ हजार ६२२ तासांचे उड्डाण केल्याची नोंदही आयएनएस विराटच्याच नावावर आहे.
१९८७ च्या आधी ब्रिटनच्या शाही नौदलात एचएमएस हर्मिस म्हणून कार्यरत या नौकेचे नेतृत्त्व त्यावेळेस १३ ब्रिटिश अधिकार्‍यांनी केले होते. तर १९८७ साली भारतीय नौदलात दाखल झाल्यापासून २२ अधिकार्‍यांना आयएनएस विराटचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्यातील पाच अधिकारी नंतर भारतीय नौदलाचे प्रमुखही झाले.
विराटचे ब्रीदवाक्य होते, जलमेव यस्य बलमेव तस्य. म्हणजेच ज्याचे सागरावर राज्य तोच खरा बलशाली. २१ व्या शतकातही ते तेवढेच खरे आहे. जलमार्गाने होणारा व्यापार हा कमीतकमी खर्चाचा असतो. म्हणून जगातील प्रबळ देश जलमार्गांचाच सर्वाधिक वापर करतात. त्यासाठी त्यांना सुरक्षित जलमार्ग आवश्यक असतात, ते पुरविण्याचे म्हणजे जलसुरक्षेचे काम त्या त्या देशाच्या नौदलांचे असते.

विमानवाहू युद्धनौका एक फ्लोटिला

एखादी विमानवाहू युद्धनौका जेव्हा मार्गक्रमणा करीत असते, तेव्हा ती फ्लोटिला म्हणजेच संपूर्ण ताफ्यानिशी समुद्र-रणांगणावर उतरलेली असते. कारण विमानवाहू युद्धनौकेवर स्वतःचा क्षेपणास्त्र, पाणतीर आदी शस्त्रास्त्रांचा जामानिमा तसा मर्यादित असतो. परंतु तिच्यावरील विमानं, हेलिकॉप्टर ही युद्धाचा पल्ला वाढवत असतात. आताच आलेल्या गाझी ऍटॅक चित्रपटात आयएनएस विक्रांतला लक्ष्य करण्याच्या पाकिस्तानच्या कटाचा जो संदर्भ आला आहे, त्यावरून विमानवाहू युद्धनौका हे शत्रूचं कायमच लक्ष्य असतं, हे समजून येईल. परंतु त्यासाठीच तिला एकटं सोडलं जात नाही. तिच्या संरक्षणार्थ पाणबुडी तैनात असते, तिच्या अवतीभोवती क्षेपणास्त्रसुसज्ज फ्रिगेट किंवा विनाशिका असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिला समुद्रातल्या समुद्रात इंधन-रसदपुरवठा करणारी टँकरनौकाही जवळ बाळगावी लागते.

विराट आणि नौदलातील हवाई उड्डाणाची परंपरा

भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस विक्रमादित्य ही रशियन बनावटीची विमानवाहू युद्धनौका २००८-०९ मध्ये दाखल होणं अपेक्षित होतं. मात्र नेहमीप्रमाणेच मोठ्या व्यवहारांना लागलेल्या ग्रहणात ऍडमिरल गॉर्शकॉव्ह म्हणजेच ४४ हजार टनांच्या विक्रमादित्याचं आगमन लांबलं. हा सगळा काळ भरून काढण्याचं काम विराटने केलं आणि विक्रमादित्यवर जाणार्‍या नौदलाच्या लढाऊ विमानांच्या वैमानिकांची एक मोठी फळी आधीपासून तयार करून ठेवण्याचं कामही विराटने केलं. कॅरीअर ऑपरेशन्स हे नौदलातलं एक विशेष प्रावीण्याचं क्षेत्र आहे आणि तरंगत्या प्लॅटफॉर्मवरून विमानांचं उड्डाण किंवा त्यांचं लँडिंग यात वैमानिकापाशी कमालीची अचूकता असावी लागते. विक्रमादित्य आली, तेव्हा तिच्यावर आणखी वेगवान सुपरसॉनिक प्रकारातली मिग २९ के विमानं अवतरली. विराटने नौदलातील हवाई उड्डाणाची परंपरा जिवंत ठेवली नसती, तर हे स्थित्यंतर कठीण गेलं असतं.

विक्रांत आणि विराट नौसेनेतून निवृत्त

काळ बदलला, तसे युद्धशास्त्रही बदलले आणि युद्धनीतीही. त्यातून नव्या गरजा निर्माण झाल्या आणि परंपरांचे ओझे डोईजडही होऊ लागले. विक्रांत आणि विराट या दोन्ही युद्धनौकांबाबत नेमके हेच घडले. विशिष्ट काळानंतर त्यांची निगराणी करत राहाणे अवघड होऊ लागले आणि त्यांना नौसेनेतून निवृत्त करण्यावाचून पर्याय उरला नाही.

नौदलाच्या ताफ्यात असलेल्या या ब्रिटिशकालीन नौकेवर तरंगते हॉटेल होणार की तिचे विच्छेदन करून तिच्या सुट्या भागांची विक्री होणार हे साफ नाही. या नौकेवर संग्रहालय उभारण्याची इच्छा व्यक्त करणारा केवळ एकच प्रस्ताव आंध्र प्रदेश शासनाचा. पण या नौकेवर हॉटेलही असावे, असे त्या शासनाचे म्हणणे. पुढील पिढ्यांसाठी तो इतिहास जपून ठेवावा आणि त्यासाठी संग्रहालय उभारावे, ही कल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी आवश्यक असणारे बजेट सरकारकडे नाही.

महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची दुर्दशा आपल्याला पाहावी लागते आणि अनेक संग्रहालयांची अवस्था केविलवाणी असल्याचे लक्षात येते. विमानवाहू युद्धनौकाच का जपायची? अशा नौकेवर प्रचंड जागा असते आणि त्यातून नौदलाचं विविधांगी कार्य दाखविण्याची आयती संधी असते. विक्रांत एक स्मृतिस्तंभ म्हणून जतन करावी, याला तिच्या भारत-पाक युद्धातील सहभागाचं कारण जोडलेलं होतं. विराटचा थेट युद्धातला सहभाग नाही.

आयएनएस विक्रमादित्य: विमानवाहू युद्धनौका

सध्या आयएनएस विक्रमादित्य ही एकमेव विमानवाहू युद्धनौका आपल्याकडे आणि तिचे बलाबल आजवर जोखलेले नाही. विमानवाहू युद्धनौका असणे व चालविणे यासाठी विशिष्ट कौशल्याची गरज लागते. ते कौशल्य भारतीय नौदलाकडे आहे. पण कौशल्य सातत्याने परजावेही लागते. ते परजण्यासाठी सध्या आपल्याकडे केवळ एकमेव पर्याय उपलब्ध आहे तो आयएनएस विक्रमादित्यचा. विराटच्या निवृत्तीच्या वेळेस विमानवाहू युद्धनौका असलेली नवीन विक्रांत नौदलात २०१८ किंवा २०१९ दाखल होणार आहे.आपल्या नौदलातील अधिकार्‍यांच्या कौशल्याबद्दल मात्र शंका घेण्याचे कारण नाही. मात्र, कौशल्येदेखील सतत परजावी लागतात. विराटवरील प्रशिक्षित अधिकार्‍यांची कौशल्ये नवीन विक्रांत दाखल होईपर्यंत कायम राखण्याचे आव्हानही असेल.

चीनच्या युद्धनौकेचे बांधकाम वेगात सुरू

विमानवाहू युद्धनौका गरजेच्या आहेत, याची जाणीव झाल्यानंतर चीनच्या नौदलाने प्रथम विमानवाहू युद्धनौका बांधण्यास घेतली. तिचे काम वेळेत पूर्णही केले. ती लिओनिंग आता चीनच्या नौदलात दाखलही झाली आहे. दुसर्‍या विमानवाहू युद्धनौकेचे बांधकाम वेगात सुरू आहे. तोपर्यंत त्यावर असलेल्या नौसैनिकांना प्रशिक्षण मिळावे यासाठी रशियाशी उत्तम संबंध प्रस्थापित करून एक विमानवाहू युद्धनौका भाड्यावर घेतली आहे. महत्त्वाचे म्हणजे आता युद्धनौकांच्या बांधकामात व त्यावर वापरल्या जाणार्‍या तंत्रज्ञानातही वेगात बदल होत आहेत. हे बदलही चीनचे नौदल वेगात आत्मसात करते आहे.

दुर्घटनांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढ

मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय नौदलामध्ये होणार्‍या दुर्घटनांमध्ये, अपघातांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. ‘आयएनएस बेतवा’ हे त्याचे सर्वात अलीकडचे उदाहरण आहे. बेतवा पुन्हा एकदा तरंगण्याच्या स्थितीत आल्यानंतर भारतीय नौदलाने प्रसिद्धीपत्रकही जारी केले. पण आता तिच्या डागडुजीवर शेकडो कोटी विनाकारण खर्च होणार आहेत. मुळात अपघात सातत्याने होणे ही नामुष्की आहे.

पाणबुड्यांच्या बाबतीत तर भारतीय नौदलाची अवस्था हलाखीची आहे. कारण सुमारे ७५ टक्के पाणबुड्यांचे आयुष्यमान संपलेले आहे. साधारणपणे एका पाणबुडीचे आयुष्यमान १५ वर्षांचे असते ते वाढवून आपण त्यांच्या वापर करत आहोत. सिंधुरक्षकमधील स्फोट व त्यानंतरची जलसमाधी त्यानंतरही पाणबुड्यांवरील अपघात झाले.

आता संरक्षणमंत्र्यांच्या प्रयत्नांनंतर स्कॉर्पिन पाणबुड्यांपैकी दोघांचे जलावतरण करण्यात आपल्याला यश आले. अद्याप त्यावर शस्त्रसंभार बसवून त्यांच्या सर्व प्रकारच्या चाचण्यांतून बाहेर पडण्यास त्यांना किमान दोन वर्षांचा वेळ लागणे अपेक्षित आहे. सागरी युद्धात व पहार्‍यामध्ये पाणबुडीला अनन्यसाधारण महत्त्व असते. आता एकच विमानवाहू युद्धनौका आणि क्षीण असलेले पाणबुडीदळ अशी भारतीय नौदलाची अवस्था आहे.

युद्धनौका, पाणबुड्यांच्या बांधणीच्या वेळा

पाणबुडयांच्या संदर्भात तर महत्त्वपूर्ण निर्णय वेगाने घेत काम करावे लागणार आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात काळानुसार बदलण्याचा आपला वेगही राखावा लागणार आहे. युद्धनौका किंवा पाणबुड्यांच्या बांधणीच्या संदर्भात ठरलेल्या वेळा काटेकोरपणे पाळल्या जातील हे पाहावेच लागेल. आता संपूर्ण भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका विक्रांत २ या नावाने कोचीन शिपयार्डमध्ये आकाराला येत आहे. ती पुढील दोन वर्षांत नौदलात सामील होईल. तोपर्यंत नौदलाची भिस्त विक्रमादित्यवरच असणार आहे.

ब्रिगेडियर हेमंत महाजन
९०९६७०१२५३

19 March 2017

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..