आज दिनांक १६ सप्टेंबर. आजच्या दिवसाला आजकालच्या दिवसांमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. आज जगभरात ओझोन दिन साजरा केला जातो. आज आपल्याला वेगळं सांगायला नको की , सध्या ओझोन वायूची किती आवश्यकता आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ओझोनची पातळी झपाट्याने कमी होत असल्याचं लक्षात आलं आणि आपल्याला खाड्कन झोपेतून जाग आली. जोरदार प्रयत्न करण्यात आले ,पण हवी तशी प्रगती करता आली नाही आणि परिस्थिती आणखीनच गंभीर झाली.
ओझोन वायू आणि त्याचं आपल्या पृथ्वीसभोवती असणारं आवरण याचं काय महत्व आहे , हे आपल्याला चांगलंच ठाऊक आहे. सगळ्यांनी त्याचा शालेय जीवनात त्याचा अभ्यास केलाच आहे पण अखेरीस गाढवासमोर वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता या वाक् प्रचाराप्रमाणे आपण तो अभ्यास शाळेपुरता मर्यादित ठेवला. आता फक्त आपण ,आपला स्वार्थ साधत आहोत. अन्न , वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजा पूर्ण करण्याच्या नावाखाली आपण संपूर्ण निसर्गाची हानी करीत आलो.
भारत देश लोकसंख्येच्या क्रमवारीत दुसर्या क्रमांकावर येत असल्याने इतक्या लोकांची निवार्याची सोय करावीच लागणार. निवार्याच्या नावाखाली आपण आपल्या देशातल्या विपुल वनसंपदेवर कुर्हाड चालवली आणि टोलेजंग इमारती बांधायला सुरुवात केली. परिणामी नैसर्गिक चक्रात व्यत्यय निर्माण होऊन जागतिक तापमानात विलक्षण वाढ झाली. त्याचे दुष्परिणाम काय आहेत याचा अनुभव आता आपण फारच जवळून घेत आहोत. हे दुष्परिणाम वाढले तर जगाचा विनाश व्हायला जास्तकाळ लागणार नाही. म्हणूनच पुन्हा एकदा आपल्याला काळाची पाऊलं ओळखत वाटचाल करायची आहे. पुन्हा नव्याने ओझोनचं महत्व जाणून घेऊ.
ओझोनच्या आवरणामुळे सूर्याप्रकाशापासून निर्माण होणारे हानीकारक अल्ट्राव्हायलेट किरणं शोषली जातात आणि त्यामुळे मानव , जीवसृष्टी , वनस्पती इत्यादींची हानी टळू शकते. सध्याच्या घडीला ह्या थराला होणार्या औद्योगिकीकरणामुळे भोकं पडायला सुरुवात झालेली आहे आणि ह्या वायूचा थरही पातळ होऊ लागला आहे. जर सूर्यप्रकाशातली अल्ट्राव्हायलेट किरणं थेट पृथ्वीवर पोहोचू लागली तर सृष्टीचा विनाश निश्चीत आहे. म्हणूनच बर्याच संस्था हा थर कमी न होऊन देण्यासाठी कार्यरत आहेत.
चला मग आपलीही काहीतरी जबाबदारी आहे. आजच्या दिवसाचे औचित्य साधत आपणही त्या गोष्टींचा वापर टाळू ज्या गोष्टींमुळे ओझोनच्या थराला धोका निर्माण होतो. सगळ्यांना वैश्विक ओझोन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
– आदित्य दि. संभूस.
#International Ozone Day #16th September
Leave a Reply