नवीन लेखन...

जागतिक टपाल दिन

युनिव्हर्सल पोस्टल युनियनची ९ ऑक्टोबर १८७४ रोजी स्थापना झाली होती. १९६९ पासून ९ ऑक्टोबर हा दिवस जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो. पोस्टाच्या कामाची माहिती व्हावी, जनजागृती होवून पोस्टाचे महत्व वाढीस लागावे हा दिन साजरा करण्यामागील हेतू आहे. अनेक देशात यानिमित्ताने पोस्टल विक म्हणूनही पाळला जातो.

भारतामध्ये आधुनिक टपाल यंत्रणेची सुरुवात १ ऑक्टोबर १८५४ रोजी झाली.

भारतात राजे-महाराजांनी संदेश पाठवण्यासाठी कबुतरांचा वापर केला. संस्थानांची स्वतःची अशी संदेश पोहोचवण्याची यंत्रणा होती. भारतामध्ये आधुनिक टपाल यंत्रणेची सुरुवात १ ऑक्टोबर १८५४ रोजी झाली. आज टपाल खाते टपाल सेवे व्यतिरिक्त बँकिंग, विमा, आर्थिक व्यवहारासाठीचे माध्यम झाले आहे.

भारतीय टपाल सेवा ही भारतातील मध्यवर्ती सरकारच्या टपाल खात्यामार्फत (डिपार्टमेंट ऑफ पोस्ट्स ॲन्ड टेलिग्राफ्स) इंडिया पोस्ट या ब्रॅंडनावाने चालविली जाते. देशभर पसरलेल्या एक लाख ५५ हजार ३३३ टपाल कार्यालयामार्फत चालणारा इंडिया पोस्टचा कारभार हे जगातील या स्वरूपाचे सर्वात मोठे जाळे होय. देशाच्या दूरवरच्या आणि पोचायला अत्यंत अवघड भागातही पसरलेल्या या टपालसेवेच्या जाळ्यामार्फत अल्पबचत आणि इतर वित्तीय सेवाही चालविल्या जातात. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रही येथे मिळते.

दरवर्षी ९ ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिन साजरा केला जातो.

हा १६७ वर्षांचा इतिहास आहे. या इतिहासाच्या माध्यमातून अगदी दुर्गम भागातील भारतीय नागरिकाला मुख्य प्रवाहाशी जोडून ठेवण्यात आले आहे. गुणवत्तेबाबत चिडचिड, काही प्रश्न, काही वेळा निर्माण होत असले तरी टपाल सेवेचा कारभार आणि हा कारभार चालवणारी माणसे यांनी देशातील विविध गावखेड्यांपर्यंतचे ताणेबाणे गुंतून सांभाळून ठेवले आहेत, असे सामान्य माणसे आनंदाने मान्य करतात. ई-मेलच्या काळातही टपालसेवेचा वापर होतो. पत्रांमधील जिव्हाळा काही सोशल मीडिया, ई-मेलच्या माध्यमातून व्यक्त होत असला तरी विमा कंपन्यांच्या पावत्यांपासून नोटीसपर्यंत टपालखात्यावरच विसंबून राहावे लागते. स्पीड पोस्ट, वाढत्या ई-कॉमर्सच्या काळात टपाल खात्यानेही भरारी घेतली आहे. खासगी कुरिअर सेवा जिथे नाकारली जाते तिथे टपाल सेवा मदतीला धावून येते. त्यामुळे कधीतरी थोडे अधिक पैसे भरुनही भारतीय नागरिक पार्सल पोहोचवण्यासाठी टपाल खात्यावर भार सोपवून मोकळे होतात.

जगामध्ये पहिल्यांदा टपाल तिकीट सन १८४० मध्ये अस्तित्वात आले. तर भारतात तिकीट सन १८५२ मध्ये अस्तित्वात आले, ते टपालावर एम्बॉसिंग करून वापरले जायचे. ऑक्टोबर १८५४ पर्यंत अशा पद्धतीने तिकीट वापरले गेले, त्यानंतर प्रत्यक्ष कागदी तिकीट अस्तित्वात आले. या सेवेमध्ये आधुनिकता आली. एअर मेल सेवेला २१ फेब्रुवारी १९११ मध्ये सुरुवात झाली. त्यानंतर अनेक सुधारणा होत नाइट एअर मेल सेवा ३० जानेवारी १९४९ मध्ये सुरू झाली. एक पत्र घेऊन जाणारे हरकारे, घोडेस्वार, उंटस्वार त्यानंतर पत्रांची चळत घेऊन जाणाऱ्या बैलगाड्या, जहाजे, रेल्वे असा अत्यंत रोमांचकारी पट या प्रवासामध्ये उलगडतो. टपालसेवकांच्या चामड्याच्या पिशव्या, त्यांचे बिल्ले, लाल-हिरव्या टपालपेट्या असा भावनिक पैलूही भारतीयांच्या लक्षात आहे. नागरिकांच्या दारापर्यंत टपालसेवा पुरवणारी भारतीय टपाल सेवा ही जगभरातील एकमेव सेवा आहे. त्यामुळेच ईमेलच्या काळात आजही पोस्टमन ग्रामीण भागातील नागरिकांना थेट नावाने ओळखतात.

मुंबईच्या जनरल पोस्ट ऑफिसची स्थापना सन १७९४ मध्ये झाली. मुंबई प्रांतासाठी इस्ट इंडिया कंपनीने हे कार्यालय स्थापन केले होते. फ्लोरा फाऊंटन येथील कार्यालयातून हे काम चालायचे. नवीन जीपीओ इमारत सन १९०४ ते सन १९१३ या काळात उभारण्यात आली. ही वारसा श्रीमंती आजही दररोज हजारो नागरिकांचे स्वागत करत दिमाखाने उभी आहे. देश स्तरावर टपाल खात्याच्या व्यापकतेचा आढावा घेतला तर १ लाख ५० हजाराहून अधिक पोस्ट ऑफिस देशभरात कार्यरत आहेत. यापैकी सुमारे १ लाख ३९ हजार पोस्ट ऑफिस ग्रामीण भागात आहेत. देश स्वतंत्र होताना २३ हजार ३४४ पोस्ट ऑफिस प्रामुख्याने शहरी भागांमध्ये होती. स्वातंत्र्यानंतर यामध्ये सुमारे सात पटीने वाढ झाली आहे. साधारणपणे एक पोस्ट ऑफिस २१.५६ चौरस किलोमीटर भागासाठी कार्यरत असते. यामध्ये ७ हजार ७५३ लोकसंख्येला सेवा दिली जाते असे सर्वसाधारण समीकरण असते.

पूर्ण देशामध्ये टपाल खात्याची विभागणी २३ भागांमध्ये करण्यात आली आहे. यात महाराष्ट्र सर्कलचा म्हणजे महाराष्ट्र विभागाचा विचार करताना यामध्ये महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांचा समावेश होतो. महाराष्ट्रात पाच प्रभाग, ४० टपाल शाखा आहेत. तर गोव्यामध्ये १ प्रभाग आणि १ शाखा आहे. टपाल खात्याने महिलांना दिलेल्या समानसंधीचा विचार करता आज महाराष्ट्रात फक्त महिलांच्या माध्यमातून कार्यरत पाच कार्यालये असून मुंबईत टाऊन हॉल येथील कार्यालयाचा कारभार केवळ महिला चालवतात. हा बदल १२ एप्रिल २०१३ पासून अस्तित्वात आला. महाराष्ट्रात सध्या एकूण कर्मचारी संख्या ४ लाख ३० हजारच्या आसपास आहे. यामध्ये ग्रामीण डाकसेवकांचाही समावेश होतो. ग्रामीण डाकसेवक हे सरकारी कर्मचारी या श्रेणीमध्ये मोडत नाहीत. त्यांना पाच तासांची सेवा द्यावी लागते. नवनवीन ठिकाणी लोकसंख्या वाढते त्यानुसार पोस्टाची कार्यालये तिथे स्थापन होतात किंवा जुन्या ठिकाणाहून नवीन ठिकाणी हालवण्यात येतात. डोंगराळ भागात ५०० लोकसंख्येसाठीही पोस्ट ऑफिस उभारले जाते. या भागामध्ये केवळ १०० रुपये गुंतवणुकीला १५ रुपये परताव्याची अपेक्षा ठेवली जाते. त्यामुळे नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज हा बाणा इथे जपला जातो. या सगळ्याला मानवी स्पर्शाची छटा असते. त्यामुळेच विमा योजना, इंडियन पोस्ट पेमेंट बँक, पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक या सुविधांचा फायदा घेणाऱ्या ग्राहकांचाही संख्या वाढत आहे.

इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना घरी बसूनही बँकेच्या सुविधांचा फायदा घेता येतो. आपका बँक, आपके द्वार असे या सेवेचे ब्रीदवाक्य आहे. सध्या महाराष्ट्र सर्कलमध्ये पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँकेचे सुमारे २ कोटी ८२ लाख ग्राहक आहेत, तर सुकन्या समृद्धी योजनेशी ९ लाख ३७ हजार नागरिक आणि प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेशी १ लाख ७१ हजार नागरिक जोडले गेले आहेत. इंडियन पोस्ट पेमेंट बँकेची सुविधा आधारशी जोडली गेल्याने कोणत्याही बँकेममध्ये पैसे असतील, तरी या माध्यमातून संबंधित अकाऊंटमधील पैसे काढणे सोपे जाते. ग्रामीण डाकसेवक घरी जाऊन पैसे देतात. यासाठी इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचे खाते असणे अत्यावश्यक नाही. बिल भरण्यासारख्या गोष्टीही या माध्यममातून ग्राहकांना करता येतात. त्यामुळे टपाल सेवेपलीकडे ही मोठी झेप आहे. टपाल जीवन विमासारख्या सेवेचा लाभ सीए, डॉक्टर, इंजीनिअर असे व्यावसायिकही आता घेत आहेत. यासंदर्भात अधिक जनजागृती करण्याचे कामही सुरू आहे, अशी माहिती अग्रवाल यांनी दिली. एवढेच नाही तर आधार कार्ड काढणे, पासपोर्ट सेवा याच्याशीही टपाल खाते आज जोडले गेले आहे. आधारसाठी नागरी वसाहतींमध्ये रविवारी शिबिरे आयोजित केली जातात. महाराष्ट्राच्या जवळजवळ सर्व जिल्ह्यांमध्ये टपाल विभागामार्फत पासपोर्टसाठी केंद्र आहे, त्यामुळे पासपोर्टसाठीचा त्रास कमी झाला आहे. आधुनिक काळातही लोकांची थेट सेवा आणि विश्वास सांभाळणे हे ब्रीद या माध्यमातून जपण्यात येत आहे. अर्थात हे एका रात्रीत घडलेले नाही. त्यासाठी संकटांशी सामना करत पायी चालणाऱ्या टपालसेवकांपासून आज बाइकवरून पार्सल पोहोचवणाऱ्या टपालसेवकांपर्यंत किंवा अ‍ॅपच्या माध्यमातून हातात पैसे पोहोचवणाऱ्या बँक सेवेपर्यंत सर्वाचाच महत्त्वाचा वाटा आहे.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..