आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिक्षणतज्ज्ञ जे पी नाईक यांचा जन्म ५ सप्टेंबर १९०७ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथे झाला.
जे पी नाईक यांनी वंचितांच्या शिक्षणाच्या समस्यांसाठी त्यांनी आपले आयुष्य खर्च केले. जे पी नाईक यांचे पूर्ण नाव ‘विठ्ठल हरि घोटगे! असहकार चळवळीत १९३० मध्ये भूमिगत असताना त्यांनी आपले नाव बदलले व ते जयंत पांडुरंग नाईक झाले. पुढे त्याच नावाने ते ओळखले जाऊ लागले. जे पी नाईक यांनी महात्मा फुलेंची परंपरा पुढे चालवून वंचितांच्या शिक्षणाच्या समस्यांसाठी आयुष्य खर्च केले.
प्राथमिक व माध्यमिक शिक्षण, मौनी विद्यापीठाचा ग्रामीण शिक्षणाचा प्रयोग, शिक्षण प्रशासन, अनौपचारिक शिक्षण, शैक्षणिक अर्थशास्त्र, शिक्षण संशोधन, आयसीएसएसआर, सामाजिक शास्त्रांचे संशोधन, अप्रगत व प्रगतीशील नवस्वतंत्र देशांच्या शैक्षणिक समस्या, आरोग्य, नगररचना इ. विविध समस्यांचे नाईक साहेबांनी चिंतन व लेखन केले. अनेक सरकारी अहवालांचे त्यांनी लिखाण केले. महात्मा फुले- महात्मा गांधी व मार्क्स यांच्या विचारांचा एकत्रित प्रभाव त्यांच्या शैक्षणिक चिंतनावर झालेला दिसून येतो. त्यांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाचे सार ‘भारतीय जनतेचे शिक्षण’ (१९७८) व ‘शिक्षण आयोग आणि तद्नंतर’ (१९७९) या दोन पुस्तकांत प्रतिबिंबित झाले आहे.
१९७५-७७ या आणीबाणीच्या काळातील जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण क्रांतीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशातील ४० शिक्षणतज्ज्ञांचा अभ्यासगट नेमला होता. जे. पी. नाईक यांनी ‘भारतीय जनतेचे शिक्षण’ हा ७५ पानांचा अहवाल प्रसिद्ध केला होता. त्याला ‘जेपीं’नी समर्पक प्रस्तावना लिहिली आहे. ‘शिक्षण आयोग व तद्नंतर’ हे नाईकसाहेबांचे मृत्युपूर्वीचे शेवटचे पुस्तक! या पुस्तकातील ‘भविष्यासाठी धडे’ हे प्रकरण नाईकसाहेबांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाचा गाभा आहे.
डॉ. नाईक यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेली पुण्यात कोथरूड येथे ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन’नावाची संस्था आहे. जे. पी. नाईक ’नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’चे संस्थापक, भारतामध्ये प्रथमच स्थापन केल्या गेलेल्या शैक्षणिक आयोगाचे सभासद सचिव होते. युनेस्कोच्या ‘थिंकर्स ऑन एज्युकेशन’च्या (१९९७) चार खंडांत जगातील १०० शिक्षणतज्ज्ञांची माहिती प्रसिद्ध झाली आहे. या यादीत भारतातील तीन व्यक्तींचा समावेश आहे. त्या व्यक्ती आहेत, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर व जे. पी. नाईक!
जे. पी. नाईक यांचे ३० ऑगस्ट १९८१ रोजी निधन झाले. शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक यांचे त्यांच्या जन्मगावी बहिरेवाडी (ता. आजरा) येथे स्मारक बांधण्यात आले आहे.
-संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply