२३ फेब्रुवारी आज २००८ मधील मुंबई वरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले आय पी एस अशोक कामटे यांचा यांचा जन्म दि. २३ फेब्रुवारी १९६५रोजी झाला.
अशोक कामटे यांचे नाव ऐकताच भल्याभल्या गुन्हेगारांना घाम फुटायचा. पैलवानांना ते फडात चित करायचे. कामटे हे पुण्यातल्या जांभळीचे. त्यांचे शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेजमध्ये झाले. पुढे पाच वर्षांसाठी ते कोडाई कॅनाल आंतराष्ट्रीय प्रशालेत होते. त्यांना कॅम्प रायझिंग सनमधून आंतराष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली. त्यांनी १९८५ मध्ये सेंट झेवियर महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. तर पदव्युत्तर शिक्षण सेंट स्टिफन्स कॉलेजमधून १९८७ मध्ये पूर्ण केले. १९८९ च्या बॅचमध्ये ते आय पी एस अधिकारी होते.
कामटे यांना पहिली पोस्टिंग भंडारा येथे १९८९ मध्ये मिळाली. ते या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक होते. त्यानंतर कोल्हापूर, ठाणे येथे त्यांनी काम केले. शांतीदूत म्हणून त्यांनी बोस्निया येथे देशाचे दीड वर्ष प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर मुंबईतील दशहतवाद आणि नक्षलवादविरोधी पथकात काम सुरू केले. २००७ मध्ये ते सोलापूरचे पोलीस आयुक्त होते. इथे त्यांची कारकीर्द चांगलीच गाजली.
कर्नाटकातल्या ईंडीचे तत्कालीन आमदार रविकांत पाटील यांनी त्यांचा वाढदिवस सोलापूरमध्ये जंगी वाजत-गाजत साजरा केलेला. खरे तर त्यावेळेस रात्री 10 नंतर फटाके वाजवण्यास बंदी होती. मात्र, आमदारांच्या कार्यकर्त्यांनी तो नियम पाळला नाही. पोलिसांनी सांगितले, तर त्यांचे ऐकले नाही. त्यांचा अपमान केला. हे अशोक कामटेंना कळाले. त्यांनी तातडीने रविकांत पाटलांचे घर गाठले. तिथे त्यांनाही अपमानास्पद वागणूक मिळाली. आमदारांनी कामटेंशी वाद घातला. प्रकरण झटापटीपर्यंत गेले. कामटेंच्या छातीवरील बॅज खाली पडला. तेव्हा त्यांच्या रागाचा पारा चढला. त्यांनी आमदार रविकांत पाटील यांना कॉलर धरून फरफटत जीपमध्ये आणून टाकले. त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगलाच चोप दिला. त्यामुळे सोलापूरकर त्यांचे नाव घेतले की चळाचळा कापायचे.
कामटे यांची वेगळी ओळख म्हणजे ओलीस ठेवलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी दशहतवाद्यांशी संवाद साधण्याचे त्यांनी विशेष प्रशिक्षण घेतले होते. त्यामुळेच मुंबई हल्ला झाला तेव्हा त्यांना या मोहिमेवर पाठवण्यात आले. मात्र, कामा हॉस्पिटलजवळ दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात कामटे शहीद झाले. कामटे यांना बॉडी बिल्डिंग म्हणजे शरीरसौष्ठवाची कॉलेजपासून आवड होती. त्यांनी कुस्तीचा फड आणि जीम दोन्ही गाजवली. शरीरसौष्ठवात त्यांनी अनेक स्पर्धा जिंकल्या. पोलीस पदकापासून ते यूएन पदकांपर्यंतची बक्षीसे मिळवली. ते कुस्तीच्या फडात उतरायचे तेव्हा भल्याभल्यांची भीतीने गाळण उडायची. त्यांनी मी-मी म्हणणाऱ्या पैलवानांना अस्मान दाखवले. त्यांनी पेरू मध्ये झालेल्या Junior Power Lifting Championship मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.त्यांच्या जीवन कार्याचा प्रवास त्यांची पत्नी विनीता यांनी ‘टू द लास्ट बुलेट’ या पुस्तकातून मांडला आहे. त्यांना शहीद झाल्यानंतर सरकारने अशोक चक्र देऊन त्यांचा गौरव केला.
संकलन.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply