महान आयरिश नाटककार, समीक्षक आणि विचारवंत जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा जन्म २६ जुलै १८५६ रोजी आयर्लंडची राजधानी डब्लिन येथे झाला.
जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचं बालपण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेलं होतं. पुढे तो डब्लिनहून लंडनला स्थायिक झाला. ब्रिटिश म्युझियमच्या लायब्ररीत बसून त्याचं वाचन आणि लेखन चाले. त्याच्या सुरुवातीच्या चारही कादंबऱ्या प्रकाशकांनी नाकारल्या होत्या. वर्तमानपत्रासाठी पाठवलेले लेखही साभार परत आले; पण त्याने लिहिणं सुरूच ठेवलं.
दरम्यान, लंडनमध्ये ‘फेबियन सोसायटी’ची स्थापना झाली होती. ‘क्रांतीपेक्षा उत्क्रांत होत जाणारा समाजवाद’ हे त्यांचं ध्येय होतं. शॉ त्यांच्या विचारांकडे ओढला गेला आणि आपल्या प्रभावी वक्तृत्वाने त्याचा हिरीरीने प्रचार करू लागला. शॉला संगीताची आवड होती आणि त्याच्याकडे नाटकांच्या समीक्षेचं कामही आलं. तो स्वतःची नाटकंही लिहू लागला.
१८९० ते १९५० अशा साठेक वर्षांत त्याने तब्बल २९ पूर्ण लांबीची नाटकं आणि २२ छोट्या प्रवेशांची नाटकं अशी भरघोस साहित्यनिर्मिती केली. ‘आर्म्स अँड दी मॅन’, ‘मिसेस वॉरेन्स प्रोफेशन’, ‘सेंट जोन’, ‘सीझर अँड क्लिओपात्रा’, ‘हार्टब्रेक हाउस’, ‘मेजर बार्बरा’, ‘मॅन अँड सुपरमॅन’, ‘दी डॉक्टर्स डिलेमा’, ‘अँड्रोक्लस अँड दी लायन’ अशी त्याची नाटकं गाजली. पण त्याचं सर्वांत गाजलेलं आणि अजरामर नाटक म्हणजे ‘पिग्मॅलिअन!’ या नाटकानं इतिहास घडवला. त्या नाटकावर हॉलिवूडमध्ये ‘माय फेअर लेडी’ हा नितांतसुंदर सिनेमा बनला, ज्यात ऑड्री हेपबर्न आणि रेक्स हॅरिसन यांनी काम केलं होतं आणि त्याला आठ ऑस्कर मिळाले. याच कथेवर आधारित ‘पुलं’नी ‘ती फुलराणी’ हे अप्रतिम नाटक लिहिलं आहे.
एक गंमतीदार किस्सा. असं म्हणतात, की इसाडोरा डंकन या सुप्रसिद्ध अमेरिकन नृत्यांगनेनं बर्नार्ड शॉच्या विद्वत्तेवर भाळून त्याला म्हटलं, ‘कल्पना कर मला तुझ्यापासून मूल झालंय, तर ते किती छान होईल, त्याला माझं सौंदर्य आणि तुझी बुद्धिमत्ता लाभेल!’ हजरजबाबी शॉ त्यावर लगेच उत्तरला, ‘ते ठीक आहे; पण समजा त्यानं तुझी बुद्धी आणि माझं रूप घेतलं तर..?’
जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचे निधन २ नोव्हेंबर १९५० रोजी झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply