दुसऱ्या महायुद्धाची झळ लाखों कुटुंबांना लागली. त्यातून सहा वर्षांची, वडील गमावलेली एक सडपातळ मुलगी आपली बहिण, भाऊ व आईसोबत निर्वासित म्हणून आसाम, कलकत्ता मार्गे मुंबईत येऊन पोहोचली.
कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तिच्या आईने नर्सची नोकरी स्विकारली. हिंदी चित्रपट सृष्टीतील नर्तिका, कूक्कू या अभिनेत्रीशी संपर्क झाल्यावर, तिच्या शिफारशीने वयाच्या तेराव्या वर्षी एका गाण्यातील समूहनृत्यात तिला पहिलं काम मिळाले.. तो चित्रपट होता.. ‘आवारा’!!
त्यानंतरही तिने काही चित्रपट केले, मात्र ती नावारूपाला आली ‘हावडा ब्रिज’ चित्रपटातील ‘मेऽर्रा नाम चिं चिं चू…’ या गीतादत्तच्या सुमधुर गाण्यातील पडद्यावरील नृत्याद्वारे… त्यानंतर तिने तब्बल पन्नास वर्षे आपल्या नृत्याने सिनेरसिकांना मंत्रमुग्ध केले…
तिचं नाव.. हेलन!
माझ्या जन्माच्या आधीपासूनच ती चित्रपटात कामं करते आहे.. पन्नासच्या दशकापासून, सर्व हिंदी चित्रपटात गाणी आणि नृत्य हा एक अविभाज्य घटक होता.. नायक, नायिका, खलनायक, खलनायिका, विनोदी कलाकार व त्याची मैत्रीण हे प्रत्येक चित्रपटात असायचेच.. यामधील खलनायकाला साथ देणारी, किंवा हाॅटेलमध्ये कॅब्रे करणारी हेलन शेकडो चित्रपटांतून रसिकांनी पाहिलेली आहे.
मेहमूद, राजेंद्रनाथ, असित सेन, धुमाळ, जाॅनी वाॅकर, जगदीप, इ. सोबत तिने धमाल काॅमेडीही केली आहे..
बहुतेक चित्रपटातून सहनायिका किंवा नृत्यांगना याच भूमिका तिने आजवर निभावल्या.. दारासिंग सोबत काही चित्रपटांतून ती नायिका झालीही मात्र ते चित्रपट बी ग्रेड मधील होते..
तिला स्पर्धक म्हणून बिंदू, जयश्री टी, पद्मा खन्ना, फरियाल, लक्ष्मीछाया, बेला बोस, मधुमती, कल्पना अय्यर, प्रेमा नारायण, कुमकुम, इत्यादी अनेक जणी आल्या व गेल्यादेखील!! हेलनची जादू कायमच अबाधित राहिली…
१९६५ मधील ‘गुमनाम’ चित्रपटातील तिच्या सहनायिकेच्या भूमिकेबद्दल तिला पहिलं फिल्मफेअर मिळालं! ‘तिसरी मंझील’ चित्रपटातील ‘ओ हसीना जुल्फोंवाली..’ या गाण्यातील रूबीच्या उर्फ हेलनला कुणीतरी विसरणं शक्य आहे का?
‘कारवाॅं’ चित्रपटातील ‘मोनिकाऽ, ओ माय डार्लिंगऽ..’ या राहुल देव बर्मनच्या हाकेनंतर त्याला ‘ओ’ देणारी हेलन, अविस्मरणीय अशीच आहे.. ‘ज्वेल थीफ’ मध्ये ती पाच नायिकांपैकी एक होती.. ‘इन्तकाम’ मधील तिचं वेगळ्या धर्तीचं गाणं फार गाजलं होतं…
‘शोले’ चित्रपटानं इतिहास रचला.. त्यातील ‘मेहबुबा, मेहबुबाऽ..’ हे नृत्यगीत खास आकर्षण होतं.. ‘इन्कार’ चित्रपटातील ‘तु मुंगळाऽ..’ या देशी बारमधील गाण्याने सार्वजनिक गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीत कहर केला…
‘डाॅन’ चित्रपटातील ‘येऽ मेरा दिल..’ या गाण्याचेवेळी तिने डोळ्यांना हिरव्या रंगाच्या लेन्सेस लावून ‘बीग बी’लाच नव्हे तर तमाम रसिकांना घायाळ केले आहे… तिची ‘ती इमेज’ करिनाच काय, कोणीही बदलू शकत नाही..
‘लहू के दो रंग’ चित्रपटात तिने पहिल्यांदा आईची भूमिका केली. त्यातील ‘माथे की बिंदिया बोले..’ हे गाणं अप्रतिम आहे.. या भूमिकेसाठी तिला दुसऱ्यांदा सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला..
हेलनला तिच्या चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल फिल्मफेअरचा जीवनगौरव पुरस्कार १९९८ साली देण्यात आला..
२००९ साली भारत सरकारने तिला ‘पद्मश्री’ किताब देऊन गौरविले..
जीवनात अनेक चढउतार आले, ती खंबीर राहिली.. आधी एका सुप्रसिद्ध निर्मात्याबरोबर ती रिलेशनशिप मध्ये होती..
१९८० साली सलीम खानशी तिने विवाह केला. एक मुलगी दत्तक घेतली. तिघेही लग्न झाले.. आता ती आजी झाली आहे..
भारतीय चित्रपटसृष्टीच्या शंभर वर्षातील सर्वोत्तम ‘सुवर्णकाळ’ तिने अनुभवलेला आहे.. या अनुभवातूनच ती सर्वांना सांगते आहे..
‘इस दुनिया में जीना है तो, सुन लो मेरी बात… गम छोड के मनाओ रंगरली.. और मान लो जो कहे, किटी केली…
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२१-११-२१.
Leave a Reply