नवीन लेखन...

इशारोंको अगर समझो , राज़को राज़ रहने दो

दिल्लीतील बल्लीमारान भाग म्हणजे एक गजबजलेलं उपनगर.तिथे लाला केवलकिशन सिकंद हे एक सिव्हिल इंजिनिअर आपल्या पत्नी रामेश्वरीसह रहात असत.ते मूळचे पंजाबातील होशियारपूरजवळच्या भारोवाल गावचे.सैलाखुर्द स्टेशनवर उतरून ७ किलोमीटर दूरवर हे गाव.सरकारी कंत्राटदार असल्याने व रस्ते व पूल बांधणी ही खासियत असल्याने लालांची सतत बदली होत असे.असेच ते बल्लीमारानला आले तेंव्हा त्यांना प्रमिला , करुणा या मुली , पाठोपाठ प्रेमकिशन हा मुलगा व नंतरची राजिंदर ही मुलगी , मग राजकिशन हा मुलगा अशी ५ अपत्य होती.या ५ अपत्यांनंतर त्यांना १२ फेब्रुवारी १९२० ला एक मुलगा झाला — ज्याचं नांव ठेवण्यात आलं प्राणकिशन ! हाच तो आपल्या लेखमालेचा नायक प्राण आणि याच्या पाठीवर पुढे लालांना अजून एक मुलगा झाला कृपालकिशन.

सततच्या बदल्यांमुळे कपूरथळा, उन्नाव , मिरत , डेहराडून , रामपूर अशा ठिकाणी शाळा बदलत बदलत रामपूर संस्थानातून प्राण मॅट्रिक उत्तीर्ण झाला.पौगंडावस्थेतून तारुण्यात प्रवेश करणर्‍या प्राणला लालांनी त्याची पुढील शिक्षणाबाबत मर्जी विचारली.तेंव्हा *आपल्याला प्रोफेशनल फोटोग्राफर व्हायचं असल्याचं* प्राणनं सांगितलं.लालांच्या मित्राचं दिल्लीतील कॅनाॅट प्लेस भागात *ए.दास अँड कंपनी* नावाचं दुकान होतं.तिथे जाऊन फोटोग्राफी शिकायची इच्छा प्राणनं लालांकडे व्यक्त केली.मित्राकडेच रहायचं असल्याने अर्थातंच फारसे आढेवेढे न घेता लालांनी ते मंजूर केलं व १९३५ च्या आसपास प्राण ए.दास कंपनीत दाखल झाला.

ब्रिटीश राजवट असल्याने उन्हाळ्यात ब्रिटीश सिमल्याला मुक्काम हलवीत व मग दास कंपनीही ग्राहकांच्या शोधात सिमल्याला येई.मग प्राणचीही रवानगी सिमल्याला होई.हळूहळू प्राणनं बर्‍यापैकी फोटोग्राफीचं तंत्र शिकून घेतलं.फावल्या वेळात रामलीलेत प्राण सीतेचं काम करु लागला व रामाचं काम करी मदन पुरी ! पुढील अभिनयक्षेत्रातील पाया प्राणनं *सीता* बनून घातला होता हे एक अविश्वसनीय असं सत्य ! ए.दास कंपनीने लाहोरला आपली एक शाखा उघडली व एका भागिदाराबरोबर प्राणला पण लाहोरला पाठवलं.
भारतातील सिनेनिर्मितीचं लाहोर हे एक मोठं केंद्र होतं ! आणि हळूहळू प्राण लाहोरमधे रुळू लागला.

फाळणीपूर्वीच्या अखंड भारतातील उत्तर पश्चिमेला असलेलं लाहोर शहर आणि तिथला एक रंगेल प्रांत — हिरामंडी ! गझल ठुमरीच्या मैफिलीपासून ते नर्तिकांच्या कोठ्यांवरील गाणी बजावणी व या सगळ्याचे शौकीन , प्रेमिक , आशिक मिजाज लोक यांची कायमची वर्दळ — नाना प्रकाच्या गंधांनी वातावरण भारलेलं — ज्यात अत्तराच्या फायापासून ते मदिरेपर्यंत आणि कबाबपासून ते पार लज्जतदार भारतीय भोजनाच्या विविध व्यंजनांचे घमघमाट ! लज्जतदार खाण्याची रंगत वाढवणारी विड्याची पानं ! खास इथल्या अशा पानांच्या विड्यांची दुकानं कोपर्‍याकोपर्‍यावर ! आणि हे विडे इतके लोकप्रीय की एरवी हिरामंडीत न जाणारे लोकही खास विडे खाण्यासाठी हिरामंडीत येत.

असाच एक मायसलोर रोडवरील एक पानाचा ठेला आणि हिवाळ्यातील एक संध्याकाळ आणि भोजनोत्तर विड्याची लज्जत चाखण्यासाठी त्या ठेल्यावर आलेले चार पाच तरुण.यांपैकी एक होता एका फोटोग्राफरचा तरतरीत तरुण सहाय्यक — जो आपल्या कुटुंबापासून दूर रहात असे व भरपूर कमाईमुळे बरेच मित्र जमेला असलेला….. हा तरुण म्हणजेच आपल्या या लेखमालेचा नायक *प्राण*
रामभुलायाकडून पानाच्या आॅर्डरची पूर्तता झालेली , पान चघळत सगळे उभे होते.एवढ्यात यथेच्छ दारू झोकलेला एक इसम तिथे आला व त्याने प्राणला नखशिखान्त न्याहाळत विचारलं , *तुझं नांव काय?*
मुळात त्या माणसाच्या अवतारावरून प्राणची त्याच्याशी बोलण्याची इच्छाच होईना ! तरीही थोड्याशा तिरस्कारानेच तो उत्तरला , *नसत्या चांभारचौकशा कशाला?*
तेंव्हा त्या इसमाने स्वत:ची ओळख करुन देत सांगितलं की त्याचं नांव वली मोहम्मद वली होतं आणि तो सिनेमाचा कथालेखक होता.निर्माते दलसुख पांचोली यांच्यासाठी त्याने एक कथा लिहिलेली व त्यावर सिनेमाही निघाल्याचं त्यानं सांगितलं व हेही सांगितलं की पांचोलींसाठीच तो पंजाबीतील *यमला जाट* सिनेमासाठी त्याने कथा लिहिली असून त्यातील एका पात्राशी प्राणचं त्याला साम्य वाटलं होतं.त्यामुळे त्यानं प्राणला *सिनेमात काम करायला आवडेल का?* असं विचारलं.

त्याचा एकंदरीत अवतार पाहता प्राणनं नकार दिला.तरीही त्याने स्वत:चं व्हिजिटिंग कार्ड प्राणला देत पांचोली आर्ट स्टुडिओत दीदुसर्‍या दिवशी दहा वाजता येण्याची प्राणला गळ घातली व तो निघून गेला.

दारुच्या नशेत बरळलेल्या वाक्यांना तितकीच किंमत द्यायची असते हे मनाशी पक्कं ठरवलेल्या प्राणनं दुसर्‍या दिवशी अर्थातंच त्या संपूर्ण संवादाकडे दुर्लक्ष करत आपल्या फोटोग्राफीच्या कामांवर आपलं सगळं लक्ष केंद्रित केलं !

नियतीनं येऊन खुलं केलेलं सुवर्णसंधीचं दार प्राणनं आपल्याच हातानं बंद करून टाकलं होतं ! त्यामुळे *प्राणच्या जीवनाचा प्राण* कसा व कुठे तग धरील हे ठरवण्यात नियती गुंग होती आणि इकडे प्राण आपल्या फोटोग्राफीच्या कामामधे *चांगल्या नियतीनं काम करण्याचं ठरवून* मशगूल झाला होता …..

मग *असं काय घडलं की कॅमेर्‍याच्या मागून इतरांचे फोटो काढणारा प्राण कॅमेर्‍याच्या समोर अभिनेता म्हणून आला?* — हे बघूया पुढच्या भागात!

कळावे,
आपला विनम्र,

उदय गंगाधर – ठाणे
E-mail : sudayan2003@yahoo.com

सेल फोन : +९१९००४४१७२०५

(संध्या. ५.३० ते ६.३० या वेळेतच कृपया संपर्क करावा ही विनंती ! )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..