पावसाळ्यातल्या एका संध्याकाळी तो निवांत बाल्कनीतल्या खुर्चीत बसला होता.. पाऊसही सगळ्या परिसीमा ओलांडून बरसत होता.. अगदी त्या रात्री सारखाच !!…त्यामुळे तो जुना प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर उभा राहणं सहाजिकंच होतं …
काही वर्षांपूर्वीची ती रात्र .. तेव्हासुद्धा बाहेर असाच मुसळधार पाऊस कोसळत होता पण घरात मात्र त्या दोघांच्या भांडणाचा गडगडाट आणि वीजेवत शब्दांचा कडकडाट … शब्दाला शब्द वाढतच होता …
“आता बाssssस …. उद्याच्या उद्या आपण वकिलांना भेटतोय … आणि लवकरात लवकर वेगळं व्हायचं .. विषय संपला .!!.”… ती गरजली.
“अगं … घटस्फोट हा काय पर्याय आहे का ??? … पण ठीक आहे …हे sss असं रोज रोज होण्यापेक्षा वेगळं होणच बरं !!”
“नाहीतर सकाळी मी माहेरीच निघून जाते .. इथे राहायचंच नाही मला .. तू बघ काय ते वकिलाचं … मी येऊन करते सह्या !!!”..
लग्नानंतर ३ वर्षातच गोष्टी इतक्या विकोपाला गेल्या होत्या . सकाळ झाली , तिनी बॅग भरायला घेतली आणि माहेरी जायला निघाली ….. पाऊस पडतंच होता म्हणून तिला सोडण्यासाठी त्यानीच गाडी काढली …. एक “अबोल प्रवास” सुरू झाला .. यावेळेस मात्र दोघंही इरेला पेटले होते …. घटस्फोटाचा निर्णय ठाम होता … आधीच मन सैरभैर त्यात रात्री डोळ्याला डोळा नाही .. इतक्यात हायवेवर समोरच्या ट्रक ड्रायव्हरनी अचानक ट्रकचा वेग कमी केला म्हणून यानी एकदम जोरात ब्रेक दाबला … यांच्या गाडीची डावी बाजू ट्रकच्या मागे आपटली … काच फुटली …. त्याला फार काही झालं नाही पण तिला मात्र २-३ ठिकाणी खरचटलं आणि मुका मार लागला …काच फुटल्यामुळे वायपर बंद झाले …. त्यांनी गाडी कशीबशी एका बाजूला लावली … जवळच्या हॉस्पिटलमध्ये थोडं ड्रेसिंग केलं , प्रथमोपचार घेतले आणि पर्यायी गाडीची व्यवस्था करून तिच्या माहेरी न जाता पुन्हा आपल्या घरी आले .. आल्याआल्या नेहमीच्या फॅमिली डॉक्टरांना दाखवून उपचार सुरू केले … काही जखमा भरायला आणि सारं पूर्ववत व्हायला दोनेक महीने जाणार होते ….
शारीरिक दुखण्यासोबतच हा अपघात म्हणजे दोघांसाठीही खूप मोठा मानसिक आघात सुद्धा होता..तेही आधल्या रात्रीच्या भांडणाच्या पार्श्वभूमीवर जरा जास्तच मोठा धक्का…..त्यातून सावरायला अवधी तर हवाच होता ,म्हणूनच त्यांच्या कालच्या कटू निर्णयाबद्दल दोघांच्याही घरी सध्या काहीही न सांगता थोडे दिवस ढकलायचे आणि पूर्ण बरं झाल्यावर घटस्फोटाची प्रक्रिया सुरू करायची असं त्यांनी ठरवलं ..
अशा विचित्र मानसिक अवस्थेतून हे जोडपं जात होतं … एकीकडे मनानी दुभंगलेले असले तरी तो तिची सूश्रूषा , वेळोवेळी ड्रेसिंग आत्मियतेने करायचा .. तीही त्याची व्यवस्थित काळजी घ्यायची … पण या सगळ्यात , बरेच दिवस न घडलेली एक अगदी अनपेक्षित गोष्ट घडली …. काहीच दिवसात दोघांच्याही आई बाबांना ते आता “आजी-आजोबा” होणार असल्याची “गोड बातमी” मिळाली …. तात्पुरतं का होईना पण दोघं करत असलेल्या सकारात्मक विचारांचा परिणाम असेल कदाचित…. आता घरातलं सगळं वातावरणच बदलून गेलं … कळत-नकळत घटस्फोटाचा विषय एकदम मागेच पडला ….सगळ्यांच्या विचारांचा आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू होता तो ईवलासा जीव……सगळं व्यवस्थित पार पडलं …मुलगी झाली…..अगदी आठवणही नकोशी वाटणारी “ती पावसाळी रात्र” लेकीच्या आनंदाच्या पुरात केव्हाच वाहून गेली होती …. त्यानंतर सुद्धा अनेकदा भांड्याला भांडं लागलं … पण त्या निरागस चिमुकलीकडे बघत घटस्फोटाचा विचारही केला नाही कधी ….. “काच फुटली की अरिष्ट टळलं” असं म्हणतात .. अंधश्रद्धा असली तरीही त्या गाडीच्या फुटलेल्या काचेनी , त्या अपघाताने त्यांच्या दोघांच्याही पुढच्या आयुष्याची होणारी वाताहात टळली होती .. ते अपघातरूपी “अरिष्ट” काहीतरी “इष्ट” घेऊन आलं होतं त्यांच्या आयुष्यात ..त्यानंतर त्यांचा सुरळीत संसार सुरू झाला तो अगदी आजतागायत.. हा असा बाल्कनीत निवांत बसून पाऊस बघेपर्यंत …..
या भूतकाळातल्या घटनेच्या विचारात असतानाच ती मस्त वाफळलेल्या कॉफीचे कप घेऊन आली ..
“काय जबरदस्त पाऊस पडतोय ना आज ?? काय रेss ??.. कुठे तंद्री लागलीये ???… हां sss आलं लक्षात ….. का जुन्या नको त्या आठवणी काढतोस ?? … वाईट स्वप्न होतं ते !!”
“अगं अगदीच वाईट असं नाही म्हणता येणार त्या घटनेला !!”
“वाईट नाही तर काय ?? काळा दिवस म्हणायचा तो आपल्या आयुष्यातला !!”
“नाही नाही ss असं नाही !!…. बरं ss कन्यका कुठे आहेत ??.. आवाज येत नाही तो ?”
“अरे ss … ऑनलाईन शाळा संपली आणि तशीच लॅपटॉप बंद करून झोपली … कंटाळते रे ss ..बघ नाss सगळंच बदलून गेलंय आता…. विचित्र झालंय …पण निदान या ऑनलाईन प्रकरणामुळे थोडाफार का होईना अभ्यास सुरू आहे हेच काय ते भलं !!”..
“अगं हेच तर मी म्हणतोय !! जगभर हे जे काही भयंकर सुरू आहे त्या “वाईटातून काहीतरी चांगलं” निर्माण होवो ……म्हणजे तसंच काहीतरी शोधायला पाहिजे आता आपण !! …… म्हणून मगाशी मी म्हणत होतो की आपल्या त्या घटनेला काळा दिवस म्हणू नकोस !.. मान्य आहे की त्या अपघाताने आपल्याला, आपल्या घरच्यांना जबर मानसिक धक्का बसला , गाडीचं नुकसान झालं , आपले पुढचे २-३ महीने त्रासात गेले पण ते “अरिष्ट” घडलं म्हणूनच आज आपण एका गोड मुलीचे आई-बाप आहोत , ते “अरिष्ट” घडलं म्हणूनच आज आपण असे छान गप्पा मारत कॉफी पितोssय .. ही त्या “अरिष्टाची इष्ट बाजू” आहे हे नाकारूच शकत नाही आपण …. हां s आता ज्यांना आपल्या घटस्फोटाबद्दल काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी हे अरिष्ट असेल पण आपल्यासाठी इष्टापत्तीसारखं ध्यानीमनी नसतानाही ते “अरिष्ट” पुढे किती “इष्ट” ठरलं ना ?? ….
“हो रे sss ….ते मात्र अगदी खरं आहे तुझं !!! ….. आपल्याच काय प्रत्येकाच्या आयुष्यात अशा छोट्या मोठ्या घटना घडत असतात ज्या सुरवातीला त्रासदायक वाटतात पण नंतर “जे झालं ते चांगल्यासाठीच” असं वाटतं …. अगदी साधी गोष्ट ..मागे एकदा शेजारच्या आजोबांना नाटकाचं तिकीट मिळालं नाही म्हणून खूप वाईट वाटलं होतं पण प्रयोगाच्या दिवशी हा असा आजच्यासारखा तूफान पाऊस पडत होता की त्यांना जाणंच शक्य नसतं झालं … तेव्हा मात्र त्यांना तिकीट न मिळाल्याचा आनंदच झाला !!”..
“एकदम करेक्ट !! अगं ss .. गेले अनेक महीने सगळी परिस्थिती इतकी भीषण आहे की प्रत्येकाचं काही ना काही नुकसान झालेलंच आहे ….प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी वाईट घडलेलंच आहे … हां sss त्याची “तीव्रता कमी-जास्त” आणि “प्रकार वेगवेगळे” असतील … कुणाच्या नोकऱ्या गेल्या , काहींची जवळची माणसं दगावली ,कुणाला दोन वेळचं जेवण सुद्धा नाही , कुणाचं खूप आर्थिक नुकसान , कुणाचं मानसिक स्वास्थ्य बिघडलं , कुठे गृहकलह , कुठे वेगवेगळ्या वयातल्या मुलांचे प्रॉब्लेम .. एक ना अनेक .! .. आपल्याही कंपनीचा बराच तोटा झालाच आहे की ss !!… जे झालंय ते आपण कुणीच बदलू शकत नाही … पण आता त्यातून “इष्ट” काय होईल हा विचार करायला हवा आपण सगळ्यांनीच …. अर्थात हे सगळं “बोलणं फार सोपं आहे” हे कळतंय मला …विशेषतः ज्यांनी हे सगळं भोगलंय किंवा भोगत आहेत त्यांना तर नक्कीच असं वाटू शकतं आणि त्यांच्या दृष्टीने विचार केला तर त्यात काही चुकीचंही नाहीये …… पण तरीही sss ………!!!!”
“तू म्हणतोस ते खरं असलं तरी अनेक कारणांमुळे कित्येक घरांची पार वाताहात झालीये …. त्यां सगळ्यांना , नोकरी नसलेल्या अनेक तरुणांना , परीक्षा न होणाऱ्या मुलांना असं नैराश्य , वैफल्य येणं अगदीच स्वाभाविक आहे रे !!!… “
“हो गं ss .. १०० टक्के पटतंय मला हे तुझं …. मला अगदीच कल्पना आहे की हे असं नुसते “सकारात्मकतेचे डोस पाजणं” म्हणजे आपण “किनाऱ्यावर बसून समोर बुडणाऱ्या माणसाला उपदेश देण्यासारखं” आहे ……. मुळात हे सगळं काही अजून संपलेलं नाहीये ….आपण सगळे काळजी घेऊन कोणालाच काही होऊ नये यासाठी प्रयत्न करतोच आहोत पण तरीही उद्या काही होणार नाही अशी शाश्वतीही नाहीये … होवू नयेच ss पण उद्या आपल्यालाच काही झालं तर कदाचित आपल्यालाही नैराश्य येऊ शकतं. शेवटी “ज्याचं जळतं त्यालाच कळतं” हे निर्विवाद सत्य आहेच !!…. त्यामुळे कुणीच कसलीच टिमकी वाजवू शकत नाही ……पण पण पण …वास्तव हेच आहे की यातून जर लवकरात लवकर बाहेर पडायचं असेल तर आता अशा “वाईटातल्या चांगल्याचा” विचार करण्यावाचून “गत्यंतरच” नाहीये …या “अरिष्टातून काही तरी नक्कीच इष्ट” घडेल हा विश्वास ठेवला तर आणि तरंच आपले पुढचे दिवस सुकर होणार आहेत असं मला वाटतं !!” …
“होय महाराजा ss !!….. तू म्हणतोस तसंच होऊ दे बाबा sss .. हे अरिष्ट लवकरात लवकर संपू देत… ज्यांनी आपली माणसं गमावली ती परत तर नाही येऊ शकणार. निर्माण झालेली पोकळी , झालेलं नुकसान नाही भरून येणार पण निदान पुढे जाऊन त्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न होईल …. जगावर , माणसावर आलेलं हे मोठं “अरिष्ट” सुद्धा आपल्या त्या “गाडीच्या अपघातासारखं” भविष्यात काहीतरी “इष्ट” घेऊन येईल अशीच सदिच्छा……..
होणाssर…असंच होणाssर…. खरंच हे “अरिष्ट”सुद्धा नक्कीच “इष्ट-अरिष्ट” ठरणार !!! “…
— क्षितिज दाते.
ठाणे.
इष्ट अरिष्ट लेख वाचून आपल्या अवतीभवती घडणाऱ्या अनेक गोष्टी डोळ्यासमोरून झरझर तरळून गेल्या.
लिहीत जावे ,शुभेच्छा