भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) स्वदेशी अग्निबाण विकसित करण्याच्या योजनेवर काम करत आहे. या अग्निबाणाद्वारे भविष्यात अंतराळातील मानव मोहीम राबविणे इस्रोला शक्य होणार आहे.
इस्रो जगाच्या अवजड आणि अब्जावधी डॉलर्सच्या प्रक्षेपण बाजाराच्या नव्या जगात पाऊल ठेवण्याची तयारी करत आहे. यासाठी आंध्रप्रदेशच्या श्रीहरिकोटामध्ये अग्निबाण प्रक्षेपण केंद्रात भूस्थैतिक उपग्रह प्रक्षेपण यान एमके-3 विकसित केले जात आहे. हा अग्निबाण आतापर्यंतच्या सर्वात अवजड उपग्रहांना वाहून नेण्यास सक्षम असेल असे सांगण्यात आले.
पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा अग्निबाण आपल्या पहिल्याच प्रक्षेपणात यशस्वी व्हावा यासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करत आहोत असे इस्रोचे अध्यक्ष किरण कुमार यांनी म्हटले. हा अग्निबाण पृथ्वीच्या कनिष्ठ कक्षेपर्यंत 8 टन वजन वाहून नेण्यास सक्षम आहे. जर सरकारने 3-4 अब्ज डॉलर्सचा निधी मंजूर केला तर अंतराळात 2-3 सदस्यीय चालक दल पाठविण्याची योजना इस्रोने आखली आहे. जर असे झाले तर रशिया, अमेरिका आणि चीननंतर भारत असा चौथा देश ठरेल, ज्याची अंतराळासाठीची स्वतःची मानवी मोहीम असेल.
जीएसएलव्ही एमके-3 एक असा अग्निबाण आहे, ज्याची रचना आणि विकास भारतानेच केली आहे. यामुळे त्याचा पहिला प्रयत्न यशस्वी ठरावा असे इस्रोच्या अभियंत्यांना वाटते असे कुमार यांनी म्हटले. भारताजवळ दोन अग्निबाण कार्यरत आहेत, यातील पीएसएलव्ही 1.5 टन वजनी उपग्रहांना अंतराळात नेण्यास सक्षम आहे. भारताच्या चंद्र आणि मंगळ मोहिमेकरता यालाच प्राधान्य देण्यात आले. दुसरा अग्निबाण जीएसएलव्ही एमके-2 दोन टन वर्गातील उपग्रहांना प्रक्षेपित करू शकतो. पुन्हापुन्हा येणाऱया अपयशामुळे याला इस्रोचा ‘खोडकर मुलगा’ संबोधिले जाते.
अस्तित्व अकॅडमी
— “अखंड महाराष्ट्र चळवळ” या WhatsApp ग्रुपवरुन