रविवार हा ‘सुट्टी’चा दिवस असला तरी त्या दिवशी इस्त्री करण्यापासून माझी ‘सुटका’ नसते. आठवड्यातून एकदा त्यासाठी बसावंच लागतं. मग तो कपड्यांचा ढीग जवळ ठेवायचा व एकेक कपडा घेऊन, इस्त्री करुन सर्व घड्या हॅन्गरला लावायच्या.
पन्नास वर्षांपूर्वी सदाशिव पेठेत असताना घरात ‘इस्त्री’ हा प्रकार नव्हता. फक्त वडिलांचेच कपडे अधूनमधून जवळच्या लाॅन्ड्रीतून इस्त्री करुन आणावे लागत. मी सर्वात लहान असल्याने ते काम माझ्याकडेच असायचे. ती ‘लक्ष्मी लाॅन्ड्री’ होती राऊत नावाच्या माणसाची. त्याचा मुलगा माझ्या वडिलांचा विद्यार्थी. हा राऊत बघावं तेव्हा झोपेतून उठल्यासारखा दिसायचा. त्याच्या डोळ्यांना कायम चिपडं असायची. त्याचं दुकान जुनं पुरानं होतं. कोळशाच्या मोठ्या इस्त्रीनं तो इस्त्री करीत असे. कधीही सांगितल्या वेळी त्याच्याकडून काम झालेलं नसायचं. मी उभा राहूनच ते करुन घेत असे.
काही वर्षांनंतर राऊतच्या ऐवजी मरीआई चौकातील सहस्त्रबुद्धे वाड्याशेजारील बाळकृष्ण लाॅन्ड्रीमधून कपडे इस्त्री करुन आणू लागलो. तो म्हातारा मालक देखील राऊतसारखाच चिपडं न काढलेला असायचा. त्याच्याकडून मात्र कपडे वर्तमानपत्रात व्यवस्थित गुंडाळून मिळायचे.
आम्ही शाळेत कधीच इस्त्रीचे कपडे वापरले नाहीत. १५ आॅगस्ट व २६ जानेवारीला पसरट बुड असलेल्या तांब्यामध्ये गरम पाणी घेऊन शर्ट व हाफ पँटवर फिरवायचो. ती घडी उशाखाली घेऊन झोपायचं व सकाळी लवकर उठून शाळा गाठायची.
मोठ्या भावाचं लग्न झालं तेव्हा त्याला इस्त्री प्रेझेंट मिळाली होती. ती स्टीलची इस्त्री चांगलीच जड होती. मग मी वडिलांचे व अण्णाचे कपडे इस्त्री करु लागलो. पूर्वी मिळणाऱ्या टेरेलिन कापडाच्या शर्टला कधीही इस्त्रीची गरज लागत नसे. ते धुतले की, वापरायला मोकळे! टेरीकाॅटच्या कपड्याला इस्त्री करावीच लागे. काॅटनच्या कपड्यांना पाणी मारल्यानंतरच प्लेन इस्त्री होत असे. जीनच्या पॅन्टला इस्त्री करताना फार वेळ लागे. पावसाळ्यात अंडरवेअर जर वाळलेली नसेल तर सकाळी सकाळी इस्त्री घेऊन बसावंच लागे. काॅलेजला जाऊ लागल्यावर मी स्वतःचे कपडे स्वतः इस्त्री करु लागलो. आईच्या साडीची इस्त्री करणे अवघड असायचं, ती मात्र बाहेरुन करुन आणायचो.
पुढे व्यवसायात पडल्यावर टापटीप रहाणे आवश्यक होतेच. लग्न झाल्यावर काही काळ हे खातं कुटुंबानं सांभाळलं. मुलाची शाळा, काॅलेज झाल्यावर तो नोकरीला लागला. त्यानंतर मी पुन्हा इस्त्री करु लागलो. दरम्यान इस्त्रीमध्ये खूप सुधारणा झाल्या. कोळशाच्या जाऊन इलेक्ट्रीकच्या आल्या. आता तर वाफेच्या, वजनाने हलक्या इस्त्र्या मिळतात. त्यावर तापमान सेटींग करता येतं. त्यामुळे कपडा जळण्याची भीतीही नसते. पूर्वी काॅईलच्या इस्त्रीने माझ्याकडून काही वेळा कपड्यांचं नुकसान झालं होतं, त्याबद्दल बोलणीही खाल्ली होती.
मी राहतो त्या बिल्डींगच्या तळमजल्यावर एक कुटुंब रहात होतं. त्यांच्यातील वयस्कर आजोबा घरखर्चाला मदत करावी म्हणून घरातूनच इस्त्रीची कामं करीत असत. एकदा त्यांना महावितरणचे मोठं बिल आले. ते चार आकडी बिल भरण्याची त्यांची ऐपत नव्हती. त्यांनी महावितरणच्या आॅफिसमध्ये गेल्यावर चक्कर येऊन पडण्याचा अभिनय केला, साहजिकच तेथील अधिकाऱ्यांनी त्यांचं बिल माफ केलं.
इस्त्री केलेले स्वच्छ व सुंदर कपडे घातलेला माणूस कसा टापटीप व छान दिसतो, तसंच आपल्या मनावरील नकारात्मक विचारांच्या सुरकुत्यांवर सकारात्मक विचारांची इस्त्री फिरवून जर त्या नाहीशा केल्या तर आपल्या कपड्यांसारखीच आपल्या मनाचीही समोरच्यावर छाप पडेल, यात शंका नाही…
© सुरेश नावडकर
मोबाईल: ९७३००३४२८४
२४-११-२०.
Leave a Reply