अंधेरीला रहात असतांना आमच्या वाडीच्या समोरच लाँड्री होती. ती लाँड्री त्यावेळी भरभराटीला होती. सुरूवातीला अंधेरीत ती एकच लाँड्री होती. आॕफीसला जाणारे बहुतेक सर्वच जण आपले आॕफीसला जाताना घालायचे कपडे त्या लाँड्रीत धुवायला देत असत. घरात वापरायचे आणि मुलांचे कपडे घरीच धुतले जात. बायका नऊवारी साड्या नेसत. त्या बहुदा घड्याच ठेवलेल्या असत. लाँड्रीत साड्या दिसत नसत. लाँड्रीतून धुवून आणि कडक इस्त्री करून आलेले कपडे बघून छान वाटायचं. पण स्वतःच्या शाळेच्या बिनइस्त्रीच्या कपड्यांची लाज नाही वाटायची. रोजच्या रोज धुवायचे आणि दोरीवर शक्य तितके ताणून वाळत घालायचे. सुकले की घडी करून गादीखाली ठेवायचे की दुसऱ्या दिवशी वापरायला तयार व्हायचे. अगदी एका शर्टावर किंवा पँटवर भागवायला लागत नव्हतं पण दोनापेक्षा जास्त जोड ठेवण्याचीही परिस्थिती बहुतेकांची नसे.
◼
चौथीनंतर कांही मुलं इस्त्रीचे कपडे वापरतात हे दिसू लागलं. शाळेत किंवा इतरत्र समारंभ असला तर आपल्या कपड्याला इस्त्री असावी असं वाटूं लागलं. अंधेरीत तोपर्यंत एक इस्त्रीवाला आला होता. परंतु कपडे त्याच्याकडे इस्त्रीला देणारं परवडणार नव्हतं. तो एक किंवा दोन आणेच घ्यायचा. पण ते भारी वाटत. रोजचे कपडे तर नाहीच पण सणासुदीसाठीही कपडे इस्त्रीला देण्याची ऐपत नव्हती. एखाद्या शेजाऱ्याकडे कोळशाच्या इस्त्र्या आल्या होत्या. आमच्याकडे यायला अवकाश होता. मग आमच्यातला एडीसन जागा होई. सपाट तळाचा पितळेचा मध्यम आकाराचा तांब्या घेतला जाई. आईकडून चुलीतले निखारे घेऊन त्यात घातले जात. मग चांगल्या पक्कडीने तांब्या धरून तो कपड्यावरून फिरवला जाई. जमेल तितकी इस्त्रीची रेघ दिसावी म्हणून प्रयत्न होई. हाताला चटकाही बसे. पण गादीखालच्या कपड्यांपेक्षा प्रगती केल्यासारखे वाटे.
◼
पुढे क्रमाक्रमाने कोळशाची, इलेक्ट्रीक आणि आॕटोमेटीक इस्त्र्या घरी आल्या. पण अगदी आॕटोमेटीक सुध्दा आपोआप इस्त्री थोडीच करणार ? फक्त कपड्याच्या जातीनुसार कमी अधिक गरम होणार एवढेच. बरं घरांत धड टेबल नसल्यामुळे सतरंजी आणि चादर जमिनीवर घालून, बसूनच इस्त्री करावी लागे. नोकरी लागल्यावर घरांत वेळ कमी मिळू लागला आणि थोडे पैसे हातांत आले. मग माझेही कपडे इस्त्रीवाल्याकडे जायला लागले. अंधेरीच्या त्या भागात तरी तो एकच इस्त्रीवाला होता. तोपर्यंत खूप लोक त्याच्याकडे कपडे इस्त्रीला देऊ लागले होते. अगदी साड्या ब्लाऊजही इस्त्रीला येऊ लागले होते. त्यामुळे कपडा नेला की लागलीच मिळाला, ही शक्यता कमी झाली. सकाळी दिलेले कपडे संध्याकाळी मिळू लागले.
◼
धोब्यांची जागा, लाँड्रीवाल्यांनी आणि नंतर इस्त्रीवाल्यांनी घेतली. हा प्रवास तसा जलद झाला. लाँड्रीच्या काळांत मधे गार्मेंट आणि बँड बाॕक्सच्या स्टार्च व्हाईट कपड्यांचेही कांही दिवस आले. पण त्यांची सद्दी फार काळ चालली नाही. त्या कंपन्या मशीनच्या मदतीने कपडे धूत. ते सफेद होत असतं. पण कपडे फाटण्याचं प्रमाण जास्त होतं. माझ्या एका मित्राला त्याचा अक्षरशः चिंध्या झालेला शर्ट असाच छान पॕक करून दिला होता. इस्त्रीवाला मात्र टिकून राहिला.साधारणपणे मुंबईमधे इस्त्रीवाला हा भय्याच असे आणि आहे. एखादाच अपवाद. अंधेरीचा इस्त्रीवाला हा भय्याच होता. चणे फुटाणेवाल्या भय्याचा गांववाला किंवा कांही असावा. चणेवाल्याच्या घराच्या आसऱ्याने तो तिथेच बाहेर खाट टाकून झोपू लागला. इस्त्री करायला मात्र मोक्याची, एका केमिस्टच्या दारातली मोकळी मोक्याची जागा मिळवली. दोन किलोमीटर अंतरात तो एकच इस्त्रीवाला होता. अंधेरीची वाढती वस्ती इस्त्रीसाठी त्याच्यावर अवलंबून होती. तो सकाळपासून रात्रीपर्यंत काम करत असे.
◼
खूप काम करूनही काम वाढतच होतं. तसे त्याने गावाहून दुसरे जोडीदार आणायला सुरूवात केली. कामाची विभागणी झाल्यावर पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत इस्त्री करणं चालू राही. कोळशाच्या इस्त्रीची जागा मोठ्या इलेक्ट्रिक इस्त्रीने घेतली होती. आवक वाढली तशी त्याने रहायला जागाही मिळवली. मग त्याचे कुटुंबही आले. त्याचे जोडीदार त्याच्याकडे तीन चार वर्षे काम केल्यावर इस्त्रीच्या धंद्याला कुठे वाव आहे ते शोधून आपलं दुकान टाकू लागले. नव्या नव्या वसाहती होत होत्या. कांही सोसायट्यांच्या गॕरेजमधे इस्त्रीवाले दिसू लागले.
◼
आम्ही अंधेरीहून गोरेगांव आणि तिथून बोरीवलीला गेलो. गोरेगांवला असतांना जगदीश वाॕशिंग मशीन आणलं. त्याला कपडे पिळण्याची सोय होती ती चांगली व्यायाम करायला लावणारी होती. मग आणखी इस्त्री करण्याचा प्रश्नच नव्हता. इस्त्रीवालाही जवळच आणि स्टेशनवर जाण्या-येण्याच्या वाटेवर होता. तोही इस्त्रीवाला अर्थात भय्याच होता. सुरूवातीला अनेक मध्यमवर्गीय स्वावलंबन आणि बचत म्हणून स्वतः घरी इस्त्री करत. शनिवारी बायकोचा धोबीघाट आणि रविवारी त्यांच्या इस्त्रीचा वार अशी बहुदा वाटणी होऊ लागली. बहुसंख्य बायका नोकरी करू लागल्या होत्या. हळूहळू सर्वांच्या लक्षात येऊ लागलं की आपल्याला कपड्यांना इस्त्री करायला बराच वेळ लागतो. इस्त्रीवाल्या भैय्याच्या दुप्पट. मग भैय्याकडचे कपडे वाढू लागले. लाँड्रीमधेही फक्त इस्त्री करायचे पण तिथे दर जास्त होते. बोरीवलीलाही इस्त्रीवाला भय्या गल्लीतच होता. बोरीवलीला मुलांचे कपडेही इस्त्रीवाल्याकडे जाऊ लागले.
◼
इस्त्रीवाला भय्या बहुदा बनियन आणि हाफ पँट किंवा अलिकडे पँट घातलेला दिसतो. सतत धग लागत असल्यामुळे हा वेषच त्याला बरा असतो. डबेवाल्यांच्या व्यवस्थापनाचं ब्रिटीश राजपुत्राने कौतुक केलं. पण इस्त्रीवाला भैय्याही कांही कमी नाही. कुठले कपडे कोणाचे, कोणी किती कपडे दिले होते, हे तो कुठे लिहून ठेवत नाही. पण त्याला ते पाठ असते. तो कपड्यांचं बोचकं घेऊन जातो आणि बरोबर ज्याचं त्याला आणून देतो. अगदी क्वचितच ह्यांत चूक होते. तुम्ही त्याच्याकडे जाऊन कपडे आणत असलात तर तुम्हांला पहातांक्षणीच तो बरोबर तुमच्या कपड्यांची पिशवी किंवा बोचकं कपाटांतून काढतो. ज्याचा इस्त्रीवाला नेहमी घरी येऊन कपडे नेत असेल त्याने सहसा दुकानात जाऊ नये. एकदा माझा मित्र इस्त्रीवाला येण्याआधीच इस्त्रीवाल्याकडून कपडे आणण्यासाठी गेला. तर इस्त्रीवाला माझ्या मित्राचाच शर्ट घालून कुठेतरी बाहेर जायच्या तयारीत दिसला. धोब्याकडून तो अधिकार त्यांच्याकडेही आला असावा.
◼
इस्त्रीवाला सहसा चूक करत नाही पण कपडे गहाळ झाल्याचे प्रकार होतात. एकदा माझ्या पत्नीची साडी गहाळ झाली. प्रथम तो मान्यच करेना. तिने त्या साडीचा रंग, काठ, इ.खाणाखुणा सांगून त्याला आठवण करून दिली. त्याला ती साडी कुठे गेली ते आठवेना. दुसऱ्या दिवशी एक दुसऱ्या बाई ती साडी त्याच्याकडे घेऊन आल्या. त्यांच्या कपड्यांत ती साडी गेली होती. इस्त्रीवाल्याने कपडा गहाळ केला तर त्याची वसुली कशी करायची हा प्रश्नच असतो. पैसे वसुल करायला आपल्याला बरं वाटत नाही. कारण आपल्या दृष्टीने तो गरीब असतो. (खरं तर त्याची कमाई आपल्यापेक्षा जास्त असते.) शिवाय वापरलेल्या कपड्याची किंमत ठरवायची कशी ? माझ्या एका मित्राचा नवा महाग शर्ट हरवला तेव्हां मात्र मित्राने पूर्ण पैसे वसूल केले. त्याला संशय होता की शर्ट गहाळ झाला नव्हता, गायब केला गेला होता.
◼
मी कफ परेडला राह्यला गेलो, तिथे उंच इमारती होत्या.प्रत्येक इमारतीच्या खालच्या एखाद्या गॕरेजमधे एक इस्त्रीवाला होता. इस्त्रीवाल्याने इतकं आपलं स्थान गरीब-श्रीमंत सर्वांच्यात पक्क केलेलं आहे. इलेक्ट्राॕनिक वाॕशिंग मशीन्स आली. घरी कपडे धुणं सोप झालं. तसं इस्त्रीवाल्याचं स्थान आणखी बळकट झालं. मुंबईतल्या एक कोटीहून अधिक लोकांची ही गरज पुरवायला युपीमधून हजारो लोक आले. कांहींच्या मनात परत जायचं असतं. तर बरेचजण इथे राहून प्रथम दुसऱ्याकडे काम करून स्वतंत्र धंदा सुरू करायचं स्वप्न पहात असतात. इथे असले तरी युपीच्या मुंबईत असणाऱ्या इतर अनेकांप्रमाणे बहुतेकांना युपीच्या राजकारणांत रस असतो. युपीतल्या गावाची ओढ असते. कुटुंब इथेच राह्यला आल्यामुळे हळूहळू युपीच्या वाऱ्या कमी होत जातात. तो मुंबईकर होतो. हिंदीमधे स्त्री शब्दाचा उच्चार “इस्त्री” असा करतात. इस्त्री गरम करण्यावरून मराठीत १९७०-८०च्या दरम्यान विनोद, व्यंगचित्रे वाचल्याचे/पाहिल्याचे आठवते. उदाहरणांची कल्पना तुमच्यावरच सोडतो.
◼
आता इस्त्रीवालेही मोठे झालेत. एखाद्या मोठ्या खोलीत, एखाद्या मोठ्या दुकानांत आतां दोन ते तीन टेबलांवर इस्त्री चालू असते. बरेच इस्त्रीवाले आता बरोबरीने लाँड्री चालवतात. लाँड्रीचा धंदा कमी झाला तरी त्याची गरज आहेच. हा धंदा हळूहळू इस्त्रीवाले ताब्यात घेतायत. वूलन कपडे, सिल्कचे कपडे इ. चे ड्राय क्लिनींग असते. डिझायनर ड्रेससारखे कपडेही साफ करायला येतात. मुंबईत तरी इस्त्रीवाल्यांनी बहुसंख्यांचे कपड्यांची जबाबदारी आपल्यावर घेतली आहे. महाराष्ट्रातल्या इतर शहरांत काय परिस्थिती आहे मला माहित नाही. पण आता इथेच थांबतो. कारण आज गुरूवार. कपडे आताच इस्त्रीला दिले पाहिजेत. उद्या इस्त्रीवाल्याची सुट्टी. आज इस्त्री केलेले कपडे देण्यासाठी उद्या बारा वाजेपर्यंत तो असतो, तोपर्यंत कपडे परतही आणले पाहिजेत. नाही तर उद्या संध्याकाळी माझाच बुशशर्ट घातलेला मला कुठेतरी भेटायचा.
— अरविंद खानोलकर.
Leave a Reply