नवीन लेखन...

आयटी विश्व मराठीतलं – 1990 ते 2024

कायस्थ विकास दिवाळी 2023 मध्ये प्रकाशित लेख


आपलं प्रत्येकाचं लहानपणी एक स्वप्न असतं. मला व्हायचं होतं आर्किटेक्ट. शाळेत असताना अक्षर छान होतं. ड्रॉइंग चांगलं होतं. आणि सृजनशील निर्मितीची आवड होती. त्यामुळे तेव्हापासूनच काहीतरी नवं नवं बनवायचं याची ओढ होती. पण कदाचित विधिलिखीत वेगळेच होते त्यामुळे इंजिनीअरिंगला गेलो आणि इलेक्ट्रीकल इंजिनिअर म्हणून बाहेर पडलो.

संगणक क्षेत्राशी संबंध अपघातानेच आला. ह्या क्षेत्रात येण्यापूर्वी मी सिस्टिम ऑटोमेशनच्या क्षेत्रात होतो. हे काम करत असताना काही ग्राहकांच्या गरजेमुळे भारतीय भाषा, त्यासाठीचे तंत्रज्ञान आणि पुढे जाऊन भारतीय भाषेतील इंटरनेट तंत्रज्ञान निर्मितीसाठी सर्वप्रथम काम करण्याची संधी मिळाली.

शाळा कॉलेजात असताना चौथीनंतर कधी पहिला नंबर आलेला बघितलाच नव्हता. मात्र या क्षेत्रात आल्यावर सगळे फासे उलटे पडायला लागले आणि जिथे तिथे पहिला म्हणून झेंडा लागला. या पहिलेपणाची मजा सुद्धा वेगळी होती.

१९९५ मध्ये भारतीय भाषांमध्ये तयार झालेली जगातली पहिली वेबसाईट; मराठीसृष्टी हे मराठी भाषेतील जगातले पहिले वेब पोर्टल; अत्यंत सोपे आणि किफायतशीर असलेले मराठीतले पहिले सॉफ्टवेअर म्हणजेच लोकसत्ता फॉन्टफ्रिडम; भारतीय भाषांमध्ये वृत्तपत्रांसाठी सर्वोत्कृष्ट कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम असा मान प्राप्त करणारे आय सी एम एस हे सॉफ्टवेअर; यामुळे सहाजिकच या क्षेत्रात नाव झालं.

लोकमत, लोकसत्ता, केसरी, सकाळ यासारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्रांच्या डिजिटल आवृत्तीच्या निर्मितीमधला सहभाग यामुळे संगणक, प्रकाशन क्षेत्र, मराठी भाषा, साहित्य क्षेत्र, पत्रकारिता यासारख्या विविध विषयांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि त्यामुळेच त्यातील दिगजांचाही सहवास मिळाला. व पु काळे,अरुण साधू, डॉ. बाळ फोंडके, अरुण टिकेकर, विजय दर्डा, कुमार केतकर, अनंत दिक्षित, विजय कुवळेकर, अरविंद गोखले, प्रकाश जावडेकर, प्रभाकर देवधर, नॅसकॉमचे देवांग मेहता अशांबरोबर ऋणानुबंध निर्माण झाले.

भारतीय जनता पक्षासाठी 2004 च्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या व्यवस्थापनासाठी आपल्या देशात पहिल्यांदाच बनवल्या गेलेल्या मीडिया वॉर रूमच्या निर्मितीमध्ये योगदान देण्याची संधीही मिळाली. तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी तसेच प्रमोद महाजन, नितीन गडकरी, वेंकय्या नायडू, अरुण जेटली, सुषमा स्वराज, प्रकाश जावडेकर यांसारख्या नेत्यांसोबत काम करताना त्यांची कार्यपद्धती जवळून अनुभवण्याची संधी मिळाली. दिल्लीतल्या एक वर्षभराच्या वास्तव्यात राजधानीतलं राजकारण तर जवळून बघायला मिळालंच पण दिल्लीतली बाबू संस्कृती, त्या सगळ्या बाबूंची नाटकं, एकमेकांवर होत असलेले शह-काटशहाचे राजकारण हेसुद्धा बघितलं. मराठी माणूस दिल्लीत कितीही मोठ्या पदावर असला तरीही दिल्लीकरांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हा नेहमीच भेदभावयुक्त कसा असतो तेही बघितलं. ल्युटेन्स भागातच अशोका रोड सारख्या ठिकाणच्या बंगल्यात वास्तव्य असल्याने ती उच्चभ्रू ल्युटेन्स संस्कृतीही जवळून बघता आली. या सगळ्यामुळे अर्थातच क्षेत्र विस्तारत गेलं. नव्यानव्या ओळखी होत गेल्या. नवनवे विषय मिळाले. नव्या कल्पनांवर काम करायला मिळालं.

या सगळ्यात करिअरला एक नवा टर्न मिळाला याचं कारण म्हणजे भारतात होत असलेली डिजिटल क्रांती. अर्थात तेव्हा मोदीयुग गुजरातपुरतं सिमीत होतं. कोणी कितीही म्हणो, पण भारतात संगणक आणि टेलिकॉम क्षेत्रातल्या क्रांतीची मुळं रोवली ती राजीव गांधी यांनी. त्यांना भक्कम साथ दिली ती त्यांचे मित्र सॅम पित्रोदा आणि ॲपलॅबचे प्रभाकर देवधर यांनी. अनेक घटकांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी या संगणक क्रांतीची पायाभरणी केली. पुढच्या काळात प्रमोद महाजन, चंद्राबाबू नायडू, नॅसकॉमचे देवांग मेहता वगैरेंनी तिला देशभरात रुजवलं.

९० च्या दशकाच्या शेवटच्या काही वर्षात वृत्तपत्र आणि प्रकाशन क्षेत्रातही एक क्रांती सुरु झाली होती. अनेक वृत्तपत्रांनी त्यांच्या इंटरनेट आवृत्ती बनवायला सुरुवात केली. अनेक वृत्तपत्रं, आणि काही संस्थांनीही त्यांच्या वेबसाटस बनवायला सुरुवात केली. मराठीसृष्टीच्या यशस्वी पदार्पणामुळे तंत्रज्ञान तर उपलब्ध होतंच, पण व्यावसायिक संधीही चालून आली. भारतीय भाषांसाठी इंटरनेटवर प्रकाशन तंत्रज्ञानाच्या पहिल्या यशस्वी प्रयोगानंतर केसरीने त्यावर चक्क अग्रलेख लिहिला होता. त्यानंतर तेच तंत्रज्ञान वापरुन इंटरनेटवर येणारं पहिलं मराठी वृत्तपत्र म्हणून त्यांनी मान मिळवला. मात्र व्यवस्थापनाच्या धोरणामुळे ही इंटरनेट आवृत्ती अवघ्या 2 महिन्यात बंद पडली. त्यानंतर लोकमतने इंटरनेट आवृत्ती सुरु केली. २०१४ पर्यंत ती इंटरनेट आवृत्ती तंत्रज्ञानापासून ते रेवेन्यू मॅनेजमेंटपर्यंत सर्व अंगांनी चालवण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे इतरही अनेक वृत्तपत्रांच्या आवृत्ती सुरु करण्याची आणि चालवण्याची संधी मिळाली. मराठीसृष्टीच्या वाढत्या व्यापामुळे या दैनंदिन जबाबदारीतून मोकळा झालो. .

याच सुमारास वेगवेगळ्या विषयांवर वेबसाईटस सुरु होत होत्या. मात्र त्यातील भारतीय भाषांमध्ये फारच मोजक्या होत्या. त्यामुळे भारतातल्या आणि काही परदेशातल्या इंग्रजी वेबसाईटचं भारतीय भाषांत रुपांतर करण्याची कामं मिळाली. तिथूनच सुरुवात झाली मराठीतल्या डिजिटल कंटेंट जनरेशनची.

याचवेळी अमॅझॉनसारख्या पुस्तकांच्या वेबसाईटसनी मोठ्या प्रमाणात इ-कॉमर्स मंच सुरु केले होते. मात्र त्यातही छापील पुस्तकांच्या विक्रीचं प्रमाण जास्त असायचं. इ-पुस्तक ही संकल्पनाच त्यावेळी प्रकाशक आणि लेखकांच्या पचनी पडणं अवघड होतं. त्यांची एकच भीती होती, ती म्हणजे इ-पुस्तके बनवल्यावर छापील पुस्तके विकत घेणार कोण? त्याचं कारणही तसंच होतं. PDF स्वरुपातल्या इ-पुस्तकांची मोठ्या प्रमाणात कॉपी होते कारण ती रोखण्यासाठी काहीच यंत्रणा उपलब्ध नाही. मग माझ्या कामाचा पुढचा टप्पा सुरु झाला.

खरंतर प्रकाशन व्यवसायात मोठ्या प्रमाणात बोकाळलेल्या काही अपप्रवृत्तींमुळे लेखकांना आर्थिक न्याय मिळत नाही. रॉयल्टीचे अत्यल्प प्रमाण, तीही वेळच्यावेळी न मिळणे, कोणत्याही प्रकारची पारदर्शकता नसणे वगैरे कारणांमुळे अनेक लेखकांचे प्रकाशकांबरोबर खटके उडायला सुरुवात झाली होती. अफाट महासागरासारख्या पसरलेल्या पुस्तकांच्या बाजारपेठेत मराठी पुस्तकांच्या पहिल्या आवृत्तीची झेप केवळ हजार – दोन हजार प्रतींची हे अजबच होतं. मराठीसृष्टीसोबत तोपर्यंत जवळपास साडेचार लाख मराठी वाचक जोडले गेले होते. परदेशस्थ वाचकांना छापील पुस्तकांऐवजी इ-पुस्तकांमध्ये जास्त रस होता.. कारण ती पाठवण्याचा वेळ आणि खर्च हे दोन्ही शून्य होतं.

इ-पुस्तकांसाठी असलेली ही मोठी बाजारपेठ होती. मात्र त्यात यशस्वी होण्यासाठी एका अशा मंचाची गरज होती जिथे ही इ-पुस्तके सहजपणे बनवता येतील, वाचकांपर्यंत पोहोचवता येतील आणि सुरक्षितही ठेवता येतील.. म्हणजेच ती कॉपी करता येणार नाहीत. असा मंच मराठीसृष्टीद्वारे आकाराला आणला आणि आजघडीला त्यावर शेकडो मराठी इ-पुस्तके उपलब्ध आहेत. इ-पुस्तके, त्यांची विक्री, सुरक्षितता हे फार मोठे विषय आहेत. ते समजण्यासाठी एखादा छोटा लेख पुरेसा नाही. त्यामुळे त्याच विषयावर सध्या एक पुस्तक मी स्वत:च लिहित आहे.

पुस्तकांच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाचं निरीक्षण झालं. मराठीत दरवर्षी हजारो पुस्तके प्रकाशित होतात. दुसऱ्या बाजूला शेकडो पुस्तके आऊट ऑफ प्रिंट सुद्धा होतात. अशी आऊट ऑफ प्रिंट झालेली पुस्तके काळाच्या पडद्याआड लुप्त होतात. त्यातले विषयही सुंदर असतात. लेखक सुद्धा नावाजलेले असतात. मात्र प्रकाशक ही पुस्तके पुन्हा छापण्याच्या फंदात पडत नाही. अशा प्रकारे काळाच्या पडद्याआड गेलेली चांगली पुस्तके लेखकांच्या आणि प्रकाशकांच्या संमतीने पुन्हा बाजारात आणण्यासाठी मराठीसृष्टीने आता पुस्तक पुनरुज्जीवन प्रकल्प हातात घेतला आहे. पहिल्या टप्प्यात एका वर्षात सुमारे १००० आऊट ऑफ प्रिंट पुस्तकांना प्रकाशित करण्याचा मानस आहे.

अब्जावधी पानांची माहिती आपल्या पोटात सामावून घेणाऱ्या या माहितीच्या महाजालामध्ये मराठीतल्या माहितीची पाने अक्षरशः अत्यल्प प्रमाणात आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या विषयावरील विविध प्रकारची माहिती मराठीमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी मराठीसृष्टीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी विषय विविध विषयातील तज्ज्ञ मंडळी काम करत आहेत. २०२४ पर्यंत दहा लाख मराठी पाने इंटरनेटवर उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. आपल्यातही कोणी विषय तज्ज्ञ असतील तर जरूर या प्रकल्पामध्ये साथ द्या.

मराठी भाषा जगते की मरते यावर मराठी भाषा दिवसांनिमित्त केवळ कोरड्या चर्चा करण्यापेक्षा काहीतरी ठोस करूया. त्याने मराठी समाजाचे आणि मराठी साहित्याचे भले होईल.

निनाद अरविंद प्रधान
98203 10830
pradhan2000@gmail.com

निनाद प्रधान
About निनाद प्रधान 97 Articles
मराठीसृष्टीचे व्यवस्थापकीय संपादक. मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती. १९९६ साली मराठी भाषेतील पहिल्या वेबसाईटच्या निर्मितीमध्ये सहभाग. त्यानंतर अनेक मराठी आणि आणि भारतीय भाषिक वेबसाईटस बनविण्यात सहभाग. वृत्तपत्र आणि मिडियासाठी विविध सॉफ्टवेअरची निर्मिती. लोकसत्ता फॉन्टफ्रीडम आणि फॉन्टसुविधा या देवनागरीसाठीच्या अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती. अनेक वेबसाईटच्या निर्मितीत सहभाग. याच विषयावर विपुल लेखन. मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार.

1 Comment on आयटी विश्व मराठीतलं – 1990 ते 2024

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..