नवीन लेखन...

इटलीचा हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी

इटलीचा हुकूमशहा बेनिटो मुसोलिनीचा जन्म २९ जुलै १८८३ रोजी झाला.

इटालीवर २० वर्षे राज्य करणारा मुसोलिनी हा सामान्य लोहार कुटुंबातील होता. त्याचे वडील समाजवादी विचारांचे होते. मुसोलिनीही याच विचारांनी भारावून गेला होता. समाजवाद आणि कम्युनिस्ट विचारांचे कौतुक करणारे रकानेच्या रकाने त्याने लिहिले. ‘वर्गयुद्ध’ यावर त्याने वृत्तपत्र सुरू केले. इटाली आणि तुर्कस्तानात युद्ध सुरू झाले तेव्हा तो म्हणायचा की, ‘युद्धापेक्षा इटालीचे प्रश्ना सोडवा, विकास योजना राबवा, शिक्षण सुधारा, दुष्काळावर मात करा.’ त्याच्या लेखणीचा जनतेवर परिणाम होऊ लागला आणि तो प्रसिद्ध झाला. मुसोलिनी सतत युद्धविरोधी लिहीत राहिला. पण जेव्हा पहिले महायुद्ध सुरू झाले तेव्हा तो अचानक पूर्ण 360 अंशाने फिरला. त्याने युद्धाला पाठिंबा दिला. ‘आपण इटालियन आहोत! फक्त इटालियन’ अशा भाषेत राष्ट्रभक्ती आणि समर्पणाचे पोवाडे गाऊ लागला.

पहिल्या महायुद्धात इटाली देश होरपळून निघाला. इटालीच्या हाती काहीही लागले नाही. उलट सात लाख सैनिक ठार झाले होते. त्यानंतर महागाई वाढली, बेकारीने कळस गाठला, अस्वस्थ कामगारांचे संप सुरू झाले. अशा या काळात मुसोलिनीने जाहीर केले की, देशाला वाचविण्यासाठी एका हुकूमशहाची गरज आहे. ही घोषणा केल्यावर तीन महिन्यांत त्याने स्वतःचा राजकीय पक्ष जाहीर केला! हुकूमशाही मानणारी फॅसिस्ट पार्टी आणि त्याचा नेता बेनिटो मुसोलिनी! तो पक्ष स्थापून बसला नाही. त्याने प्रचार सुरू केला. पूर्ण इटालीभर त्याच्या सभा होऊ लागल्या. या सभा कधीही साध्या नसायच्या. सभेचे स्टेज प्रचंड मोठे असायचे, संपूर्ण परिसरात पक्षाचे झेंडे लावले जायचे, डोळे दिपतील अशी प्रकाशयोजना असायची. या सभांना कार्यकर्त्यांची तुफान गर्दी उसळायची. फॅसिस्ट पक्षाचे सर्वच्या सर्व कार्यकर्ते काळ्या रंगाचे शर्ट घालून असायचे. अशी वातावरण निर्मिती झाल्यावर मुसोलिनी व्यासपीठावर यायचा. उंच, गोरापान मुसोलिनी अत्यंत उत्तम वक्ता होता. तो ओघावत्या करारी वाणीत म्हणायचा, आताचे सरकार दुर्बल आहे. हे सरकार काही करत नाही. या सरकारमुळे आपली स्थिती वाईट झाली आहे. आपल्याला कणखर सरकार हवे. इटालीची शान परत आणणारे ताकदवान सरकार हवे. मुसोलिनीच्या भाषणांचा परिणाम होऊ लागला. संकटांनी पिचलेल्या नागरिकांना तो अच्छे दिनची स्वप्न दाखवत होता. एकीकडे त्याच्या सभा सुरू होत्या आणि दुसरीकडे काळे शर्ट घातलेले त्याचे कार्यकर्ते गावागावांत जाऊन राष्ट्रभक्ती जागृत करीत होते. हे कार्यकर्ते गावात जाऊन देशभक्तीची गाणी म्हणायचे. राष्ट्रभक्तीच्या घोषणा द्यायचे. तेव्हा ‘एजा एजा अलाला’ म्हणजे ‘रोमा, रोमा, रोमा’ ही घोषणा फार गाजली. तरुण वर्ग वेगाने पक्षाकडे खेचला गेला.
आणि १९२२ साली मुसोलिनीने लोकप्रियतेचा फायदा घेत अंतिम हातोडा मारला. ‘सरकारने राजीनामा देऊन पायउतार व्हावे नाहीतर आम्ही सत्ता खेचून घेऊ’ अशी त्याने गर्जना करीत आपल्या लाखो कार्यकर्त्यांचा रोम शहरात मोर्चा काढला. काळ्या शर्टांच्या लाटाच्या लाटा रस्त्यांवर उसळल्या आणि शेवटी राजाने फॅसिस्टांपुढे गुडघे टेकून सरकार स्थापनेसाठी बेनिटो मुसोलिनीला आमंत्रित केले. ३१ ऑक्टोबर १९२२ रोजी वयाच्या 39व्या वर्षी मुसोलिनी इटालीचा पंतप्रधान झाला.
मुसोलिनी इटालीचा पंतप्रधान झाला आणि त्याने लगेचच इटालीतील लोकशाही संपविण्याची पावले टाकण्यास सुरुवात केली. त्याने मंत्रिमंडळ जाहीर केले, पण परराष्ट्र, सार्वजनिक बांधकाम, सहकार, संरक्षण, युद्ध अशी जवळजवळ सर्व खाती स्वतःकडे ठेवली. तो सत्तेवर आला तेव्हा त्याच्या फॅसिस्ट पार्टीला इटॅलियन पिपल्स पार्टी, इटॅलियन नॅशनलिस्ट असोसिएशन, इटॅलियन डेमोक्रेटिक पार्टी, इटॅलियन लिबरल पार्टी या पक्षांनी पाठिंबा दिला होता. सत्तेवर आल्यानंतर वर्षभरात त्याने हे सर्व मित्रपक्ष संपवून टाकले. हे पक्ष पुन्हा जीवित होऊ नये म्हणून राजकीय पक्षांची स्थापना बेकायदेशीर ठरविणारा कायदाच त्याने मंजूर केला. तो स्वतः सकाळी 8 वाजताच कार्यालयात यायचा आणि मंंत्र्यापासून नोकरापर्यंत सर्वांनी त्याच्या वेळेत हजर झालेच पाहिजे अशी सक्ती त्याने केली.

त्यानंतर त्याने धडाधड कायदे बदलण्यास सुरुवात केली. उद्योगपतींना सोयीचे होईल असे कायदे त्याने आणले. सर्व कारखाने सरकारच्या मुठीत घेतले. कामगार संघटना बेकायदेशीर ठरवून टाकल्या. बंद पडलेले कारखाने त्याने सुरू केले. त्यामुळे सामान्य कामगार खूष होता. मुसोलिनी नेमके काय करीत होता हे कामगाराला बिचाऱ्याला समजत नव्हते आणि समजणारही नव्हते. कारण मुसोलिनीने धाक दाखवून, लाच देऊन, गोड बोलून सर्वच्या सर्व प्रसारमाध्यमांवर मूठ आवळली होती. सर्व वर्तमानपत्रे फक्त त्याचे गोडवे गायची. त्या काळात रेडिओचे तंत्रज्ञान नवीन आले होते. मुसोलिनीने त्याचा पुरेपूर वापर सुरू केला. तो सतत रेडिओवर भाषणे द्यायचा. राष्ट्रभक्तीने नागरिकांचे उर फाटेल असे आव्हान करायचा. आपण एक शक्ति शाली राष्ट्र निर्माण करीत आहोत असा भास निर्माण होत होता. त्याच्यावर चित्रपट निघू लागले. कुणी त्याच्या विरोधात सूर काढला तर काळ्या शर्टवाले कार्यकर्ते त्यांच्या अंगावर धावून जायचे. त्याचवेळी त्याने युवकांसाठी वेगवेगळे कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. युवकांना सभासद बनविण्याची मोहीमच उघडली.

बेनिटो मुसोलिनीने आपण हुकूमशहा नाही हे दाखवण्यासाठी ‘ग्रँड कौन्सिल ऑफ फॅसिस्ट’ ही समिती स्थापन केली. या समितीवर वरिष्ठ अधिकारी नियुक्त केले. मात्र या अधिकार्यांपनी फक्त मुसोलिनीच्या प्रस्तावांना मंजुरी द्यायचे काम करायचे होते. त्यांना मत द्यायला परवानगी नव्हती. सुरुवातीला मुसोलिनीने समितीच्या बैठका घेतल्या. मात्र त्यानंतर एकही बैठक घेतली नाही. हे सर्व करताना लोकांच्या डोळ्यासमोर येतील अशी सार्वजनिक कामे मुसोलिनीने सुरू केली. 400 पूल बांधले,४ हजार मैल रस्ते बांधले, क्रीडा भवने उभारली आणि ठिकठिकाणी पक्षाची विशाल कार्यालये बांधली. यातून त्याने लोकांना प्रगतीची स्वप्ने पाहत ठेवले.

मुसोलिनीने विरोधकांना सोडले नाही. त्याने विरोधी पक्ष बरखास्त केले. त्यांच्या कार्यालयांना कुलूप ठोकले. त्यांचा इतका छळ केला की अनेक जण देश सोडून पळून गेले. एखाद्या विरोधकाला पकडले तर त्याला स्वतःचा बचाव करण्याचा, अपील करण्याचा हक्क देणारे कायदेच बदलून टाकले. कुणीही विरोधात बोलले की, मुसोलिनी ‘राष्ट्रवाद’चा मुद्दा सांगायचा. त्याने विरोधी पक्षाला तर संपवलेच, पण स्वतःच्या फॅसिस्ट पक्षातील त्याच्या विरोधकांच्या तोंडालाही कुलूप लावले. त्याच्या पक्षातील मातब्बर नेता दीनो ग्रांदीला राजदूत म्हणून लंडनला पाठविले, लिआंद्रो अर्पिनाती याला लिपारी बेटावर धाडले, सोफानी याला मंत्रिमंडळात स्थानही दिले नाही. अशा तऱ्हेने मुसोलिनीची कार्यपद्धती सुरू होती.
मात्र त्यानंतर दुसरे महायुद्ध सुरू झाले. जर्मनीचा हिटलर आक्रमण करीत विजयी होत चालला आहे हे मुसोलिनीच्या अहंकाराला टोचत होते. म्हणूनच तयारी नसताना त्याने इटालीला युद्धात उतरवले. इटाली ही महाताकद आहे असे चित्र त्याने निर्माण केले होते. पण युद्धात उतरल्यावर इटालीची खरी स्थिती उघड झाली. काही तयारी नसताना स्वतःच्या अहंकारापोटी इटाली युद्धात उतरली हे लक्षात आल्यावर नागरिकांत संताप पसरू लागला. शेवटी व्हायचे तेच झाले. इटाली जर्मनीसह फरफटत गेला आणि इटालीचा पराभव झाला.

१९४५ साली ब्रिटन व फ्रान्सचे सैन्य उत्तर इटालीत घुसले तेव्हा मुसोलिनी व त्याची प्रेयसी क्लाटरा यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण कम्युनिस्टांनी त्यांना घेरले आणि गोळ्या घातल्या. यातच बेनिटो मुसोलिनीचे २८ एप्रिल १९४५ रोजी निधन झाले.

त्यांचे मृतदेह मिलानच्या रस्त्यावर फेकले. लोकांना ते मृतदेह दिसले तेव्हा त्यांनी ते मृतदेह झाडावर उलटे टांगले. येता जाता लोकांनी त्यांना चपला मारल्या, त्यांच्यावर थुंकले. स्वतःला ‘नेता’ अर्थात ड्युस म्हणवणारा अहंकारी, फसवा, संशयी हुकूमशहाचा अपेक्षित शेवट झाला.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..