पुराणातील कथांमध्ये राक्षस तपश्र्चर्या करुन देवांकडून अमर राहण्याचं वरदान मागून घ्यायचे. भोळे शंकर त्याला ‘तथास्तु’ म्हणून मोठी ‘चूक’ करायचे. एकदा का अमरत्वाचा वर मिळाला की, तो राक्षस उच्छाद मांडायचा…
अगदी तसंच सध्या चीनने केलंय. कोरोना नावाच्या राक्षसाला निर्माण करुन चीनने पृथ्वीवर हाहाःकार माजवला आहे आणि हा भयंकर राक्षस हजारों पटींमध्ये पुनर्जिवीत होऊन पहिल्या लाटेनंतरच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचे बळी घेत, सुसाट सुटला आहे. ज्यांनी त्याला तयार केला, ते त्याच्या संकटातून बाहेर पडले, मात्र भारतात कोरोनाराक्षसाने अजूनही थैमान मांडले आहे…
इतर देशांनी कोरोनातून बाहेर पडण्यासाठी योग्य ती दक्षता घेऊन सर्व व्यवहार चालू ठेवले. मात्र भारतात माणसांना त्याचं गांभीर्य नसल्याने काळजी न घेता ते रस्त्यावर गर्दी करु लागले. परिणामी सरकारला लाॅकडाऊन जाहीर करावे लागले.
लाॅकडाऊन सुरु झाल्यापासून माणसातील छुप्या ‘सैताना’ने त्याच्या चांगुलपणावर कुरघोडी केली व तो ‘सैतानीवृत्ती’ने वागू लागला…गेल्या दोन महिन्यांत वर्तमानपत्रातील आलेल्या बातम्यांवरुन तयार केलेल्या या पूर्णपणे काल्पनिक पाच अति लघु कथा…
१. ललिता नर्स म्हणून हाॅस्पिटलमध्ये लागून दहा वर्षे झाली होती. ती सिनीयर असल्यामुळें कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी तिने अहोरात्र केलेल्या कामाबद्दल तिचा कोरोनायोद्धा म्हणून गौरव करण्यात आला होता.
दुसऱ्या लाटेच्या वेळी रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा झाल्यामुळे पेशंटचे नातेवाईक त्या इंजेक्शन साठी वाट्टेल तेवढे पैसे देण्याची तयारी दाखवू लागले. ललिताला पैशाची हाव सुटली.. पेशंटसाठी नातेवाईकांनी आणून दिलेले इंजेक्शन पेशंटला न देता ती बाहेर काळ्या बाजारात ते विकू लागली. रोज अशा लुटीने तिची पर्स भरत होती.. काही दिवसांत तिचीच आई पाॅझिटीव्ह झाल्यानंतर तिने त्याच इंजेक्शनसाठी आकाश पाताळ एक केले, मात्र स्वतःच्या आईला ती वाचवू शकली नाही. या धक्क्यातून अजूनही सावरु न शकल्याने सध्या ती घरीच शून्यात नजर लावून बसली आहे…
२. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परप्रांतातून आलेले कामगार पुन्हा आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर गर्दी करु लागले. त्या हद्दीतील नुकताच नोकरीला लागलेला पोलीस, जनार्दन स्टेशनवरील कामगारांना बाजूला घेऊन दमदाटी करुन त्यांच्याकडून पैसे उकळू लागला. कामगारांची परिस्थिती आधीच वाईट झालेली, त्यात ही पिळवणूक.. काही समाजसेवकांनी ही गोष्ट रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांनी देखील त्वरीत कारवाई न करता वेषांतर करुन या घटनेची खातरजमा करुन घेतली व नंतर त्या जनार्दनला निलंबित केले. जनार्दन त्या क्षणिक सुखासाठी, सध्या पश्चातापाच्या आगीत होरपळतो आहे…
३. नगरपालिकेच्या कंत्राटदारांचा मोबाईलवर एक ग्रुप होता. शहरात कोरोनाचे लाॅकडाऊन असले तरी त्यांची रोजची संध्याकाळ ‘उत्सवा’ची होती. त्यातील एका अधिकाऱ्याने रिसाॅर्टवर खास पार्टीचे आयोजन केले. दुसऱ्याने मुंबईहून बारबाला आणण्याची जबाबदारी घेतली. ठरलेल्या दिवशी पार्टी रंगात आलेली असताना, पोलीसांनी धाड टाकली. अवैध मार्गाने कमावलेला पैसा लाभला तर नाहीच शिवाय संबंधित अधिकाऱ्याची नोकरीही गेली. एक दिन का सुलतान, उम्रभर का फकीर हो गया…
४. दामिनीचं लग्न या कोरोना काळातच ठरलं. सरकारी नोकरीतला चेतन तिचा जीवनसाथी होणार होता. मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत साखरपुड्याचा कार्यक्रम उरकून घेतला होता. लाॅकडाऊन सुरु झालं आणि सरकारने ज्यांचे या काळात उपजिविकेसाठी हाल होतात, त्या वेश्यांसाठी आर्थिक मदत जाहीर केली. कोणत्याही अटी शिवाय प्रत्येकीला ठराविक रक्कम देण्याचे आदेश काढले.
दोन दिवसांनी वर्तमानपत्रात सदर रक्कम गरजवंतांपर्यंत पोहोचताना ती कापून घेतल्याची बातमी झळकली. दामिनीने केतनला ठरलेले लग्न मोडल्याचे फोनवरून सांगितले..कारण त्या रकमेचे वाटप करण्याचे काम केतनकडेच होते…
५. सातारा मधील सिव्हील हॉस्पिटलमध्ये कोरोना पेशंटने सर्व वाॅर्ड भरलेले होते. रोज अनेक पेशंट मृत्यूमुखी पडत होते.. तिथल्या एका वाॅर्डबाॅयने मृतांच्या नातेवाईकांना त्या मृतदेहाचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी पाचशे रुपये मागितले. त्या नातेवाईकांनी, सर्वांचे खिसे खाली करुन साडे चारशे रुपये त्याच्या हातावर टेकवले… जेव्हा तो ड्युटीवरुन घरी पोहोचला, त्याचे वडील तापाने फणफणले होते…
© – सुरेश नावडकर १३-५-२१
मोबाईल ९७३००३४२८४
Leave a Reply