![ithun ishta](https://www.marathisrushti.com/articles/wp-content/uploads/sites/3/2023/03/ithun-ishta.jpg)
‘एकटी’ हा सुलोचना दीदीचा मला सर्वात अधिक आवडलेला कृष्णधवल चित्रपट आहे. त्यातील मोंटाजमधील हे गीत चित्रपटाचा गाभा आहे. तिचा चित्रपटातील मुलगा, काशिनाथ घाणेकर हा अगदी लहान असल्यापासून मोठा होईपर्यंत या गीतातून दाखविला आहे. ती काबाडकष्ट करुन मुलाला वाढवते, शिकवते. तोच एकमेव आधार असल्यामुळे त्याला कुणाचीही दृष्ट लागू नये म्हणून तो तिच्यापासून लांब असताना देखील गदिमांच्या शब्दांतून ‘लिंबलोण उतरू कशी, असशी दूर लांब तू.. इथून दृष्ट काढिते, निमिष एक थांब तू…’ असं म्हणते आहे…
कोणत्याही आईला आपलं मूल हे गोरं किंवा काळंबेद्रं असलं तरी ते सर्वांत प्रिय असतं. मग तो मुलगा असो वा मुलगी. खेड्यातील असो वा शहरातील. तिची मानसिकता एकच असते, आपल्या मुलाला कुणाच्याही वाईट ‘नजरे’ची दृष्ट लागू नये. दृष्ट लागणे, ही गोष्ट आजच्या पिढीला अंधश्रद्धा वाटू शकते. मात्र आमच्या पिढीने हा अनुभव घेतलेला आहे. माझं बालपण खेड्यात गेलं. दिवाळी सुट्टीत गावी गेल्यावर अशा गोष्टी मी पाहिलेल्या आहेत.
खेड्यात दृष्ट काढली जाते ती, लाल मिरच्या व मीठ घेऊन. किरकिरणाऱ्या बाळावरुन ते तीन वेळा उतरवताना ‘आल्या गेल्याची, नात्या गोत्र यांची, भूतान गेल्याची दृष्ट लागली असेल तर ती जळून जावो’ असं म्हणत चुलीवरच्या तव्यात किंवा पेटलेल्या निखाऱ्यावर टाकलं जायचं. खरंच दृष्ट लागली असेल तर मिरचीच्या धुराचा ठसका लागत नसे. एरवी मिरचीचा धूर सहन करणे फार कठीण जात असे.
माझी आई आम्हा भावंडांना उजव्या हाताच्या मनगटावर काळा दोरा बांधीत असे. आम्ही देखणे तर मुळीच नव्हतो, मात्र तिच्या समाधानासाठी आम्ही तयार व्हायचो. त्या दोऱ्याला चार पाच गाठी मारलेल्या असून देखील कधी कधी तो काळा दोरा एखाद्या दिवशी निसटून जात असे. ही अंधश्रद्धा तर नक्कीच नव्हती.
गावातील कुणाला ‘बाधा’ झाली असेल तर देवऋषीकडे किंवा गुरवाकडे जाऊन त्याचा सल्ला घेतला जात असे. मग त्याने सांगितलेला उतारा केला जात असे. रात्री उशीरा दही, भात, लिंबू हे त्याने सांगितल्यानुसार त्या व्यक्तीवरुन तीन वेळा उतरवून निर्जन ठिकाणी जिथे दोन रस्ते फुटलेले असतील तिथे उतारा नेऊन ठेवायचा व जवळच्या तांब्यातील पाणी ओतायचे. ते झाल्यावर मागे वळून न पाहता सरळ घरी यायचं व पाय धुवूनच घरात प्रवेश करायचा. अशा उताऱ्याने फरक पडतो अशी आजही कित्येकांची ठाम समजूत आहे.
लहान बाळाची आंघोळ झाल्यावर त्याला पावडर लावल्यानंतर आई त्यांच्या डोक्यावर, कानामागे, तळहातावर, पावलाच्या तळव्यावर काजळाची तीट लावते, ते सुद्धा दृष्ट लागू नये म्हणूनच. आता काळ बदलून गेला आहे. आता बाळाच्या डोळ्यांत कुणी काजळ घालत तर नाहीच आणि गालावर तीटही लावत नाही. मला मात्र पाच वर्षांचा होईपर्यंत काजळ-पावडरचा मेकअप चालू होता.
आताची पिढी बाळाला काही त्रास होऊ लागला की, डाॅक्टरकडे धाव घेते. घरात कुणी म्हातारं माणूस असेल तर त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्याची शक्यता कमीच.
आजही एखाद्या समारंभाला नटून थटून गेलेल्या मुलीचं सर्वांनीच कौतुक केल्यावर तिची आई दृष्ट काढतेच, त्या मागे असतं लेकीबद्दलचं अपार प्रेम आणि काळजी.
आताच्या जमान्यात या गोष्टींपासून आपण दूर जाऊ लागलो आहोत. आपण जर असे प्रकार केले तर लोकं आपल्याला गावंढळ, अडाणी समजतील अशी भीती वाटू लागली आहे. किंवा असंही होऊ शकतं की, आईची खूप इच्छा आहे मात्र मुलीचा त्यावर विश्वास नाही.
काहीही असो, जोपर्यंत एखाद्याला दृष्ट लागण्याचा अनुभव येत नाही तोपर्यंत त्याचा त्यावर विश्वास बसणे, शक्य नाही. जुनी माणसं अशी म्हणायची की, एखाद्याची नजर इतकी तीव्र असते की, दगडावर नजर गेली तर तो दगडही फुटायचा.
आता खेड्यात देवऋषी, गुरव राहिले नाहीत. शहरात असे तोडगे सांगणारं कोणी नाही. क्वचित पुस्तकांतून ही माहिती मिळू शकते, पण वाचणार कोण? गुगलवर ही माहिती उपलब्ध आहे, आत्ताच्या पिढीचा विश्वास हा बुजुर्गांपेक्षा ‘गुगल’वर अधिक आहे.
तरीदेखील एखादी ‘सुलोचना’ जेव्हा कधी आपल्या मुलाची ‘दृष्ट’ काढताना मला दिसते, तेव्हा मला माझा भूतकाळ पुन्हा आठवतो…
‘लिंबलोण उतरू कशी….’
© – सुरेश नावडकर १३-२-२१
मोबाईल ९७३००३४२८४
या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहे
aamhi dekhil anubhawale aahe.