काॅलेजच्या दिवसात पाहिलेले चित्रपट, सहसा कुणी विसरु शकत नाही. माझ्या काॅलेजच्या दिवसांत मी ‘गरीबों का अमिताभ उर्फ खडकी दापोडी’ मिथुन चक्रवर्तीचे, अनेक चित्रपट पाहिलेले आहेत. त्याची जोडी जमली ती अभिनेत्री, रंजिता बरोबर! त्या दोघांचे अनेक चित्रपट रौप्यमहोत्सवी झालेले आहेत. ‘सुरक्षा’, ‘तराना’, ‘सितारा’, ‘हम पाॅंच’, ‘शौकीन’, ‘वारदात’, इ. चित्रपट पहात पहात, माझं काॅलेज पूर्ण झालं. नंतर ‘हमसे बढकर कौन’, ‘स्वामी दादा’, ‘डिस्को डान्सर’, ‘घर एक मंदिर’, ‘प्यार झुकता नहीं’, ‘अग्निपथ’, इ. चित्रपट पहात मी व्यवसायात रमलो.
नंतर त्याच्या ‘दलाल’, ‘उस्तादों के उस्ताद’, ‘लकी’, ‘ओम शांती ओम’, इ. चित्रपटांबद्दल कधी वाचलं किंवा ऐकलं तर कधी त्याला टीव्हीवर पाहिलं. काही वर्षांनंतर, तो रिॲलिटी शोमधून दिसू लागला. ‘डान्स इंडिया डान्स’ या शो मध्ये, जजच्या खुर्चीत बसलेलं, त्याला मी अनेकदा पाहिलं.
१६ जून १९५० साली बांगला देशातील, बारिसाल येथे त्याचा जन्म झाला. रसायन शास्त्राची पदवी घेतल्यानंतर तो पुण्यात आला. एफटीआयआय मध्ये अभिनयाचं शिक्षण घेऊन, १९७६ साली ‘मृगया’ चित्रपटातून त्यानं रुपेरी कारकिर्दीला सुरुवात केली. सडपातळ, सावळ्या रंगाचा व घोगरा आवाज असलेला मिथुन पहिल्या चित्रपटालाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला व त्याची घोडदौड सुरू झाली. ‘सुरक्षा’ व ‘तराना’ मध्ये तो रंजितासोबत, बेलबाॅटममध्ये दिसला. या दोन्ही चित्रपटांमधील, सर्वच गाणी उत्तम होती. इथूनच त्याची ‘टिपिकल’ नाचण्याची स्टाईल, लोकप्रिय झाली. ‘हम पाॅंच’ मध्ये तो पाचांत उठून दिसला. ‘शौकीन’ म्हाताऱ्यांच्या चित्रपटात रती अग्निहोत्रीसोबत, धमाल रमला. ‘हमसे बढकर कौन’ च्या गर्दीत इतरांपेक्षा, वेगळा वाटला. ‘स्वामी दादा’ मध्ये देत आनंद सोबत शोभला. ‘डिस्को डान्सर’ मधून शिखरावर पोहोचला. ‘प्यार झुकता नहीं’ ने ‘न भुतो न भविष्यती’ व्यवसाय केला. ‘अग्निपथ’ मधील कृष्णन अय्यर, भुलाये न भूला.
मिथुनचे १९८९, या एकाच वर्षात १९ चित्रपट प्रदर्शित होऊन त्याची ‘गिनीज’ मध्ये नोंद झालेली आहे. त्या उलट ९३ ते ९८ या कालखंडात त्याचे ३३ चित्रपट फ्लाॅप झालेले आहेत. मिथुनच्या यशात संगीतकार बप्पी लहरीचा, सिंहाचा वाटा आहे.
किशोर कुमारनं आयुष्यात चार लग्नं केली. त्यातील तिसरं लग्न हे १९७६ साली, गीता बालीची भाची, योगिता बालीशी केलं. दुर्दैवाने हे लग्न फार काळ टिकलं नाही. ७८ साली त्यांच्यात घटस्फोट झाला व लागलीच ७९ साली योगितानं, मिथुनशी लग्न केलं. मिथुनला ती ‘लकी’ ठरली. ती जीवनात आल्यापासून, मिथुनची भरभराट झाली. आज त्या दोघांना, तीन मुले व एक मुलगी आहे.
१९९० नंतर त्याने उटी येथे बस्तान बसवलं. तेथे त्यानं हाॅटेल व्यवसाय सुरु केला. आतापर्यंत त्याने हिंदी, बंगाली, ओडिया, भोजपुरी अशा भाषेतील ३५० हून अधिक चित्रपटात काम केलेले आहे. वयाच्या एकाहत्तरीनंतरही तो रिॲलिटी शो मधून, दिसतोच आहे.
जसा ‘अग्निपथ’मधील ‘विजय दीनानाथ चौहान’ वयाच्या ७९व्या वयातही काम करतो आहे, तसाच ‘गरीबों का अमिताभ’ तगडा, कृष्णन अय्यरही मागे राहिलेला नाहीये.
आज मिथुन बरोबरच्या अनेक नायिका एकतर हे जग सोडून गेलेल्या आहेत किंवा आपल्या संसारात रमलेल्या आहेत. हा मात्र अजूनही, नाचतोच आहे.
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१७-६-२२.
Leave a Reply