इतिहास म्हणजे काय? तर पूर्वी घडून गेलेल्या चांगल्या वाईट गोष्टी, ज्यांचा तेव्हाच्या समाजमनावर परिणाम झाला होता. घडून गेलेल्या अनेक ऐतिहासिक घटनांना आज आपण आपल्या वैयक्तिक, राजकीय स्वार्थासाठी वेगवेगळे आयाम देऊन उगाळत बसतो. इतिहासातील अनेक महत्वाच्या घटना, विचार, वस्तुस्थिती याकडे दुर्लक्ष करून, नको त्या क्षुल्लक घटनांना आपण विराट स्वरूप देऊन त्यांना जनतेसमोर आणतो. आज आपलं जीवनच गोंधळाने भरलेलं झालंय. त्यामध्ये आणखी एक इतिहासाची भर. रयतेला नेहमीच गोंधळल्या स्थितीत ठेवण्यासाठी या गोष्टींचा वापर केलं जातो.
आज आपण शिवाजी महाराजांच्या नावाने जयघोष अगदी बेंबीच्या देठापासून करतो. त्यांच्या नावाचा अगदी चुकूनही कुणी एकेरी उल्लेख केलेला आम्हाला चालत नाही. त्या व्यक्तीला समजमाध्यवरून, फोनवरून अत्यंत वाईट शब्दात सुनावलं जातं, धमाकावलं जातं. आता हे सगळं करणाऱ्या किती जणांनी महाराजांचा इतिहास, त्यांचे आचार विचार, त्यांची जीवनशैली, स्त्रिशक्तीकडे पाहाण्याची त्यांची दृष्टी, आपल्या रयतेबद्दल त्यांच्या काळजात असलेली माया, जातीभेदाला स्वराज्यात स्थान न देता स्वराज्यावरील निष्ठा पारखण्याची वृत्ती, चुकलेल्या व्यक्तीला मोठ्या मनाने जवळ करण्याची तयारी, राज्याकर्ता हा राज्याचा मालक नसून प्रतिपाळ करणारा असतो हा मनात असलेला ठाम विचार, राजद्रोहाला शासन करताना किंचितही आपपर भाव मनात न आणण्याची मानसिकता या सगळ्या गोष्टींना स्वतः जाणून घेतलेलं असतं ? वाचन केलेलं असतं ? हा प्रश्न महत्वाचा आहे. महाराजांचा जयजयकार करत कुणालाही शासन करण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून जायचं याला काय अर्थ आहे?
नाना फडणवीस सारखा राज्यकर्ता जो पेशव्यांचा मुख्य कारभारी असेपर्यंत इंग्रजांची हिंमत झाली नाही व्यापाराशिवाय लपूनछपून इतर गोष्टी करण्याची. अशा व्यक्तीच्या मुत्सद्दीपणाला समाजासमोर न आणता त्यांच्या नको त्या गोष्टींवर लेखन केलं जातं. बाजीरावाचं प्रचंड शौर्य आम्हाला दिसत नाही तर दिसतें ती मस्तानी.
आज मी इतिहासाकडे कसा पहातो, कोणत्या नजरेने पहातो आणि त्याला पूर्णपणे जाणून घेतल्यावरच माझी मतं देतो का? हा महत्वाचा प्रश्न आहे. शिवाजी महाराजांनी किंवा अगदी पेशवाईमध्ये त्रिंबकजी डेंगळेनी सामाजिक घडी उत्तम बसण्यासाठी त्या काळात ज्या उपाययोजना केल्या त्या आम्ही आजही समजून घेत नाही आहोत किंवा आम्हाला त्या समजून घ्यायच्याच नाही आहेत. शिवाजी महाराजांनी वकूब पाहून किंवा एखाद्या क्षेत्रातील एखाद्या व्यक्तीची जाणकारी, आवड पाहून ते क्षेत्र त्याकडे सोपवलं. आज आपण काय पहातो ? तर त्या क्षेत्राशी संबंध नसलेल्या, कुवत नसलेल्या, जाणकारी नसलेल्या व्यक्तीला वैयक्तिक स्वार्थासाठी त्या जागेवर स्थानापन्न केलं जातं.
गड, किल्ले बांधताना त्या काळी राज्यकर्त्यांना जाणवलेल्या सुविधा आणि त्या प्रत्यक्षात आणणारे डिग्री न घेतलेले चाणाक्ष अभियंते आणि कारागीर. त्यांच्या बुद्धीला खरच प्रणाम. आज शास्त्र एव्हढं विकसित झालंय, सोयी सुविधानी अद्ययावत झालंय तरी आपण अपयशी का ठरतो किंवा दर्जा का घसरतो. कारण स्वार्थी मानसिकता. राज्यकर्ता जेव्हा प्रामाणिकपणे रायतेचा सांभाळ करतो, त्यांच्या अडचणी समजून घेतो, त्या निवारण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो तेव्हा जनता राज्यकर्त्याच्या मागे सर्वशक्तींनीशी उभी रहाते ही वस्तुस्थिती आहे.
इतिहासातून मला काही शिकण्यासारखं आहे का? कारण आज प्रत्येकजण स्वतःला शहाणा समजू लागलाय. मला काही शिकवायचं नाही. आमच्या चुका दाखवायच्या नाहीत. मी /आम्ही perfect आहे /आहोत. मी मात्र दुसऱ्यांना शिकवणार. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांमध्ये सगळ्याच गोष्टी चांगल्या होत्या का? नाही सांगता येणार. परंतु ध्येय मात्र सगळ्यांचं एकच होतं. त्यामध्ये कोणतंही स्वार्थ नव्हता. मार्ग, विचार निराळे, कुणाचे जहाल, कुणाचे मवाळ. वाटा निरनिराळ्या पण लक्ष्य एकच. एकमेकांच्या विद्वत्तेबद्दल मनात आदर होता. वादविवाद होत होते, पण त्यामध्ये दिखाऊपणा नव्हता. कळकळ होती, कणभरही दांभिकता नव्हती. वृत्ती निस्पृह होती. आपल्या घरादाराचा त्याग करून स्वातंत्र्यासाठी लढणारी ही थोर माणसं तुमच्या आमच्यासारखीच सामान्य घरातली होती. यातून मला काय मिळेल हा आज प्रत्येकाच्या मनात असलेला भाव ठेवून राहिली असती तर हे स्वातंत्र्य मिळालंच नसतं.
स्वातंत्र्य मिळालं आणि सगळंच सोपं झालं. ती स्वातंत्र्यासाठी लढलेली कित्येक माणसं देशासाठी शहिद झाली किंवा कुठे हरवली गेली कळलंही नाही. आपल्या त्यागाचा त्यांनी जराही डंका पिटला नाही. त्यांचे संसार वाऱ्यावर उधळून गेले. त्यांच्या कुटुंबाने ज्या यातना दुःख भोगली त्यांचा आपण विचारही करू शकत नाही.
खरंच काही न करता आयतं काही मिळालं नां की त्याची किंमत रहात नाही माणसाला. स्वातंत्र्याचंही तसंच झालंय. आम्ही इतिहासात डोकावून पाहायला तयार नाही आणि त्यातून शिकायला तर नाहीच नाही. कारण आजच्या राज्यकर्त्याजवळ या जिवंत इतिहासाकडे निस्वार्थ भावनेने पाहायला वेळ नाही. मग आपल्या इतिहासाची नाळ आजच्या जीवनाशी जुळायची कशी? एव्हढाच प्रश्न आहे.
प्रासादिक म्हणे,
— प्रसाद कुळकर्णी.
Leave a Reply