नवीन लेखन...

जे एस एम अलिबाग

मी फोर्थ इंजिनियर असताना माझे जहाज इस्तंबूल क्रॉस करून युक्रेनच्या दिशेने निघाले होते. सेव्हस्टोपोल नावाच्या पोर्ट मध्ये पोचायला आणखीन दोन दिवस लागणार होते. ब्लॅक सी आणि मेडिटेरेनियन सी या दोघांना जोडणारा इस्तंबूल मधील चॅनल म्हणजेच सामुद्रधुनीतून जहाज चालले होते. माझा रात्री आठ ते बाराचा वॉच संपला आणि थर्ड इंजिनियरला ड्युटी हॅन्डओव्हर करून मी केबिन कडे निघालो होतो. ब्रिजवरून थर्ड मेट खाली मेस रूम मध्ये काहीतरी खायला जाताना स्टेअर केस वर भेटला मला बोलला चार साब चल दहा मिनिटं गप्पा मारायला. त्याने तीन मिनिटाचा मायक्रोवेव्ह टायमर लावून नूडल्स बनवल्या आणि हातावर तीन चार टिशू पेपर घेऊन त्यावर गरम गरम नूडल्सचा बाउल हातात धरला आणि आम्ही दोघे बाहेर खुल्या डेकवर येऊन खाली मांडी मोडून बसलो. निरभ्र आकाशात तारे लुकलुकत होते, इस्तंबूल शहर मागे पडून जहाज दोन्हीही बाजूला असलेल्या मोठं मोठ्या डोंगरांच्या पट्ट्यातून चालले होते. दोन्हीही बाजूला डोंगरांवर असलेले टर्की चे चांद सितारा असलेले लाल झेंडे त्यांच्यावर मारलेल्या प्रकाशझोतात फडफडताना स्पष्ट दिसत होते. गार वाऱ्याची झुळूक ये जा करत होती. थर्ड मेट म्हणाला इस्तंबूल क्रॉस करताना दिवस असो की रात्र इथल्या निसर्ग सौंदर्यामुळे वेळ कसा जातो ते कळतच नाही. राजस्थानच्या जयपूर शहरातून आलेला थर्ड मेट जहाजावर जॉईन होऊन एकच आठवडा झाला होता. नूडल्स खाता खाता त्याने सांगितले अभी घर जाके शादी करनी है, मेरेही कॉलेज की लडकी है, हमारी कॉलेज की लडकीया दुनिया मे सबसे सुंदर होती है. त्याला म्हटलं तेरी लव्ह स्टोरी बाद मे सुना अभी जाके सो जाते है.

केबिन मध्ये आल्यावर मला माझ्या कॉलेजचे दिवस आठवायला लागले. दहावी नेरुळला झाल्यावर आम्ही अलिबागला पहिल्यांदाच राहायला आलो होतो. मांडव्याला मामा आणि अलिबागला मावशी असल्याने अलिबाग शहर अनोळखी नव्हतं पण अलिबाग मध्ये मित्र म्हणून कोणीच ओळखीचं नव्हतं. अलिबागला जगातल्या सुंदर मुलींच्या कॉलेजात ऍडमिशन घेतली तेव्हा मुलींचेच काय पण मुलांचे सुद्धा कधीही न पाहिलेले चेहरे दिसायला लागले. एकतर दहावी पर्यंत मराठी मिडीयम आणि त्यात कोणी ओळखीचे नाही. इंग्रजी मुळे एफ वाय जे सी सायन्सला लेक्चर मध्ये सगळं डोक्यावरून जायला लागलं.

दहावीला सत्तर टक्के मार्क म्हणजे तसं पाहिले तर मी एव्हरेज फर्स्ट क्लास कॅटेगरी मध्ये होतो पण इंग्रजीमुळे एवढं दडपण आले की जगातल्या सुंदर मुलींकडे बघताना कोणाशी नजरानजर सुद्धा व्हायची नाही. त्यातच पहिल्या युनिट टेस्ट मध्ये फिजिक्स मध्ये शून्य मार्क, मॅथ्स, बायोलोजी आणि केमिस्ट्री मध्ये पाचच्या आतच मार्क. डिक्शनरी घेऊन आणि मॅथ्सच्या डेरिव्हेटीव्ह, इंटिग्रेशन आणि ट्रिग्नॉमेट्री मध्ये डोक्याचा भुगा करून घेतला. एफ वाय जे सी च्या फायनल सेमिस्टर पर्यंत अभ्यासाची गाडी रुळावर आली. बारावीला झोपे सरांच्या क्लास मुळे ज्या फिजिक्स मध्ये पहिल्या युनिट टेस्टला शून्य मार्क मिळाले होते त्याच फिजिक्स मध्ये बारावीला मी इतर विषयांपेक्षा जास्त मार्क मिळवले. फिजिक्स मध्ये 83 मार्क मिळाल्याने माझ्या पी सी एम ची टक्केवारी 76 पर्यंत गेली. फर्स्ट क्लास वरून मी डिस्टिंक्शन च्या कॅटेगरीत आलो. पुढे के. जे. सोमय्या मध्ये मेकॅनिकल मधून बी ई करताना पुन्हा एकदा इंग्रजीने आणि त्यातल्या त्यात फिजिक्सनेच छळले. फर्स्ट ईयर च्या इंजिनियरिंग मेकॅनिक्स ह्या विषय चार प्रयत्नात सुटला तर अप्लाईड फिजिक्सला पाचवा प्रयत्नात जेमतेम पासिंग मार्क मिळाले. रिझल्ट लागल्यावर किती विषयात पास झालो त्यापेक्षा किती केट्या लागल्या हे पहिले मोजावे लागायचे.

बी ई करताना अलिबागच्या जे एस एम कॉलेज ची खूप आठवण यायची. डिग्री करताना फर्स्ट ईयर मध्ये प्रत्येक शुक्रवारी शेवटची मालदार नाहीतर अजंता पकडून अलिबागला यायचे आणि सोमवारी पहिली अजंता पुन्हा मुंबईला जायचे. साहजिकच पुढल्या वर्षी ड्रॉप लागण्यासाठी कमीत कमी जेवढ्या केट्या लागतात त्याच्यापेक्षा डबल केट्या लागल्या.

एफ वाय जे सी आणि एस वाय जे सी सायन्सला जे एस एम कॉलेजचे दिवस म्हणजे, वर्गात लेक्चर सुरु असताना समुद्रावरून वाहत येणाऱ्या खाऱ्या वाऱ्यावर धुंद होऊन झोपेत पेंगुळणे. झोप आली नाहीतर,लेक्चरर शिकवत असलेले डोक्यात काही घुसत नाही म्हणून खिडकीबाहेरचा सुरुच्या झाडांपलीकडला अथांग समुद्र बघत बसणं. लेक्चरर ची बडबड ऐकण्यापेक्षा भरती आलेल्या समुद्राच्या लाटांचे संगीत ऐकून मंत्रमुग्ध होत राहणे. लायब्ररी तर एवढी भारदस्त वाटायची की काही न वाचता नुसतंच तिथं बसून वेळ घालवावा. पण कॉलेज सुटल्यावर आणि भरताना जगातल्या सुंदर मुलींच्या घोळक्या मागे निमूटपणे स्वतःच्याच घरचा रस्ता पकडणे यापलीकडे कोणतेही विचार नसायचे.

कॉलेज आणि समुद्राच्या मध्ये असलेल्या सुरुंच्या झाडाखालील वाळूत बोटानी मित्रांसह आयुष्यातील आणि भविष्यात येणाऱ्या महत्वाच्या चर्चा सुरु असताना रेघोट्या मारणे. जगातली अमुक एक सुंदर मुलगी अमक्याला लाईन देते तर तमक्याला गंडवतेय. आमच्या वेळेला तर इलेक्ट्रॉनिक्सची वर्गातच वेगळी बॅच असायची ह्या बॅचमधील दहावीला बोर्डात आलेले आणि बोर्डात न आलेले पण बारावीला सगळेच्या सगळे बोर्डात येतील अशी आमच्या सारख्या ऍव्हरेज मुलांची भाबडी आशा असायची.

राखी पौर्णिमा आली की जगातल्या काही सुंदर मुलींचा कॉलेजात येऊन पण शाळेतल्या मुलींसारखा राखी बांधू त्याला भाऊ बनवू असा चंग बांधलेला दिसायचा. अकरावीला नाही पण बारावीला मलापण एक नवीन बहीण राखी पौर्णिमेला भेटली मला भाऊ बनवल्याचं दुःख कमी पण आख्या कॉलेज मध्ये मलाच एकट्याला का बनवलं याचं दुःख जास्त झाले.

तसं पाहिलं तर माझे रे रोड ला असलेले प्री सी कॉलेज जिथे मी हॉस्टेल मध्ये एक वर्ष काढले ते तर समुद्रात भराव घालून उभं आहे पण तिथं अलिबाग सारखी मजा नाही.

आजही अलिबागला गेल्यावर कॉलेजच्या कॅम्पस मध्ये जाऊन फिरावेसे वाटते. केमिस्ट्री लॅब मधील केमिकल्सचा उग्र वास हुंगावासा वाटतो, समुद्राकडे बघून मावळणाऱ्या सूर्याची वाळूवर पडलेली सोनेरी किरणे पाहावीशी वाटतात. खाऱ्या वाऱ्याला सामोरे जाऊन लाटांचे संगीत ऐकावेसे वाटते.

महिने अन महिने निळ्या समुद्रात राहूनही कॉलेजला असताना जो समुद्र अनुभवला त्याची सर कशालाही नाही म्हणूनच बघितली दुनिया सारी पण जगात जनता शिक्षण मंडळाचे आमचे जे एस एम कॉलेजच भारी.

के. जे. सोमैया मध्ये तर मला शेवटच्या सेमिस्टरला पण एकुलती एक के टी लागली आणि कॉलेजच्या मागील अनेक वर्षांच्या मेकॅनिकल ब्रांचच्या शेवटच्या वर्षात 100% यशस्वी निकालाची परंपरा मोडून टाकली होती. इंजिनियर झाल्यावर ब्लेड कंपनीत नोकरी मिळाली पण जगातल्या सुंदर मुलींच्या कॉलेजात पण नाही आणि सोमैय्या मध्ये पण छोकरी काही मिळाली नव्हती.

कधी विचार सुद्धा केला नव्हता असं वेगळं करियर अचानकपणे समोर आले. ब्लेड कंपनीत रिझाईन करून जहाजावर जाण्यापूर्वी एक वर्षाचा प्री सी कोर्स जॉईन केला. कोर्स करत असतानाच अलिबागच्याच पण जगातील सुंदर मुलींच्या कॉलेजच्या थोडे पुढे असलेल्या जगातील सुंदर डॉक्टरांच्या कॉलेज मधली एक डॉक्टर भेटली.

तिला दचकत दचकत सांगितलं, मी इंजिन आणि मशिनरी चा डॉक्टर होणार आहे तू तर माणसांची डॉक्टर ऑलरेडी झालेली आहेस. पुढे काही विचारायच्या आत तिने स्वतःच सांगितलं,चालेल की मला.

© प्रथम रामदास म्हात्रे.

मरीन इंजिनियर,

B. E. (Mech ), DIM.

कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 186 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..