हो मी अलिबागवरूनच आलोय.
बाबांची अलिबागला बदली झाल्याने दहावी झाल्यानंतर नेरूळ सोडायला लागले होते. नेरूळच्या सेंट झेवियर्स मराठी शाळेतच फक्त सलग चार वर्ष शिकायला मिळाले होते. गावातली जिल्हा परिषद शाळा, मनमाड, मालेगाव, श्रीवर्धन इथल्या शाळांमध्ये एक एकच किंवा फार फार तर दोन वर्ष शिकायला मिळाले होते. नेरुळच्या शाळेत भरपूर मित्र होते पण दहावी नंतर फेसबुक येईपर्यंत कोण कुठे आहे काही पत्ता नव्हता. अकरावीला सायन्स घेण्याचा निर्णय झाला. जे एस एम कॉलेज मध्ये अकरावी सायन्स ला प्रवेश मिळाला. एफ वाय जे सी सायन्स च्या वर्गात एकही कोणी ओळखीचा नाही की मित्र नाही अशा स्थितीत पहिला दिवशी हजर झालो. तस दहावी पूर्वी चार चार शाळा बदलल्या असल्याने प्रत्येक शाळेत दरवेळी नवीन चेहरे बघायची सवय झाली होती. नवीन चेहरेच काय पण ठाणे जिल्ह्यातून नाशिक जिल्हा, नाशिक जिल्ह्यातून रायगड जिल्हा आणि रायगडाने तून मेट्रोपॉलिटन नवी मुंबईत अशा सगळ्या शाळा फिराव्या लागल्या. भाषा आणि माध्यम मराठीच पण प्रत्येक भागातील चालीरीती आणि भाषेचे हेल आणि समवयस्क मुलांचे चेहऱ्यासह हावभाव, बोलणे आणि वागणे सगळचं नवीन असायचं. जे एस एम कॉलेज समुद्राला लागूनच आहे. कॉलेजच्या बाजूला सुरुची झाडे आणि पलीकडे थेट समुद्र. कॉलेजच्या पाठीमागे कोकण एज्युकेशन सोसायटीच्या जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कूलचे विशाल ग्राउंड त्याच्या पलीकडे प्रसिद्ध कुलाबा वेधशाळा. कॉलेज कॅम्पस मधून समुद्राकडे पाहिले तर समोरच समुद्रात उभा असलेला कुलाबा किल्ला दिसतो. कॉलेज मध्ये प्रत्यक्ष लेक्चर सुरू होण्यापूर्वी सुरवातीला एडमिशन प्रोसिजर सुरू असतानाच कॉलेज परिसर बघून समुद्राच्या भरती प्रमाणे माझ्या आनंदाला सुद्धा उधाण आले होते.
कॉलेज सुरू झाल्यावर हळू हळू ओळखी व्हायला लागल्या. मित्र बनायला लागले नितीन,भूपेश, चेतन आणि मी अशी आमची चौकडी बनली होती. कॉलेज मध्ये गेल्यावर समुद्रावर दिवसातून एक तरी फेरी व्हायचीच. समुद्राचा खारा वारा लाटांचा आवाज यामुळे कॉलेज मध्ये नेहमी जिवंत वातावरण आहे असेच वाटायचं. पावसाळ्यात कॉलेजमधील वातावरण एवढं आल्हाद दायक असायचं की कधी लेक्चर संपतं आणि पावसात भिजत भिजत जाऊन समुद्रावर दाटलेले काळे ढग तासन तास पाहत राहावे. कॉलेज सुटल्यावर किनाऱ्याच्या दगडांवर आम्ही मित्र अस्ताला जाणारा सूर्य आणि त्याच्याकडून होणारी रंगांची उधळण बघत बघत अंधार पडे पर्यंत गप्पा मारत बसायचो. कुलाबा किल्ल्याच्या भक्कम तटबंदी वर उसळणाऱ्या लाटा, फेसाळणारा समुद्र, वाऱ्यावर डोलणारी सुरुची झाडे आणि कुलाबा वेध शाळेतील नारळाच्या भरगच्च झाडीचे एकसुरात हेलकावणे सगळं सगळं एकदम अप्रतिमच.
पी सी एम बी म्हणजेच फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि बायोलोजी या सगळ्या विषयांनी डोक्याचा पार भुगा करत घेतला होता. दहावी पर्यंत मराठी मिडीयम आणि अकरावी ला संपूर्ण इंग्रजीत हे भुगा करणारे विषय आल्याने एफ वाय जे सी ला डिक्शनरी घेऊन अभ्यास करायला लागला. पण फिजिक्स साठी झोपे सर बायोलाजी साठी फुलारी सर यांच्यामुळे पीसीएम आणि पी सीबी दोन्ही ग्रुप मध्ये जवळपास सारखेच मार्क मिळाले. पीसीएम मध्ये अठ्यात्तर टक्के मिळाल्यामुळे के जे सोमैय्या मध्ये बी ई मेकॅनिकलला एडमिशन मिळाली. अलिबागला दोन वर्षात झालेल्या सगळ्या ओळखी आणि मित्र सोडून डिग्री साठी पुन्हा एकदा मुंबईत नवीन चेहरे आणि मित्र मिळवायला जावे लागणार होते. जे एस एम कॉलेज च्या गेट बाहेर कॉलेज भरताना आणि सुटताना मुलामुलींच्या रंगीबेरंगी कपड्यांनी फुललेला रस्ता. कॉलेज मध्ये कॅन्टीन असून सुद्धा गेट बाहेरील मयुर बेकरीचे पदार्थ आणि येता जाताना दरवळणारा सुगंध अजूनही कॉलेजच्या आठवणी ताज्या करत असतात. आमची केमिस्ट्री लॅब कॉलेजच्या कौलारू चाळीवजा खोल्यांमध्ये असायची. या लॅब मध्ये घडलेले प्रसंग आठवले की आज हसायला येते. केमिस्ट्री लॅब मध्ये केमिस्ट्री काही जमली नाही पण एकूणच ती केमिस्ट्री लॅब अजूनही काहीशी गूढ आहे असेच वाटते.
अकरावीला असताना बाबांनी त्यांच्यासाठी नवीन बुलेट घेतली होती पण आठ आठ दिवस त्यांना चालवायला वेळ मिळत नसे त्यामुळे बंद राहू लागल्यावर मला चालू करण्याच्या निमित्ताने अकरावीत असतानाच संपूर्ण अलिबाग भर बुलेट वर हुंदडायला मिळू लागले होते. हल्ली समुद्र किनाऱ्यावर बाइक्स चालवू देत नाहीत पण अलिबाग आणि वरसोली बीच वर शंभर आणि एकशेवीस चा स्पीड मिळेपर्यंत फुल्ल अॅक्सीलरेटर पिरगळून बुलेट दामटली तरी कोणी काही बोलायला किंवा विचारायला येत नसे. इंजिनियरिंग करताना व्हायवा मध्ये उत्तरे देता न आल्याने शेवटी परीक्षकांनी कंटाळून विचारले की ज्युनियर कॉलेज कुठून केले?? उत्तरे देता न आल्याने ताण वाढला होता पण जुनियर कॉलेज बद्दल विचारल्यावर लगेच जे एस एम कॉलेज डोळ्यासमोर उभं राहीले. मग त्यांना मोठ्या अभिमानाने सांगितले अलिबाग हून केले आहे. बाबांची पुन्हा बदली झाल्यावर अलिबाग सोडावे लागले पण अलिबागकर पणा आजही तसाच टिकून आहे.
आजही सांगताना तोच आणि तेवढाच अभिमान असतो की, हो मी अलिबाग हून आलोय.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
B.E. (mech), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply