शहरातील गेल्या रविवारचीच घटना आहे. उच्चभ्रू सोसायटीतील एक बंगला. बंगल्यात तिघेचजण रहाणारे. ऐंशीच्या घरातील पती-पत्नी व त्यांचा केअरटेकर. रात्री साडेआठची वेळ. तीन चोर बंगल्याजवळ येऊन कानोसा घेऊ लागले. त्या केअरटेकरने किचनच्या खिडकीतून त्यांना हटकले. तरीदेखील त्यांनी आत प्रवेश केलाच. तिघांनीही प्रत्येकाच्या गळ्याशी चाकू लावून पैशांची मागणी केली. पत्नीने आपल्या पतीच्या गळ्याला लावलेला चाकू पाहून, ‘त्यांना मारु नका, पाहिजे ते घेऊन जा.’ अशी कपाट उघडून त्यांना विनंती केली. त्या तिघांनी या तिघांना बाथरुममध्ये कोंडले. कोंडताना भिंतीवरील घड्याळ काढून त्यांच्या हातात दिले व म्हणाले, ‘मोजून दहा मिनिटे अजिबात बाहेर यायचं नाही. आलात तर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही.’ सुमारे वीस मिनिटांनी हे तिघे बाथरुममधून बाहेर आले. तोपर्यंत त्या तीन चोरांनी हिरे, सोने, खडे असलेल्या बारा अंगठ्या, कानातील रिंग, हिऱ्याची रिंग, मोत्यांचा चोकर, दोन हार, सोनसाखळी, मंगळसूत्र, दोन ब्रेसलेट, ५ लेडिज घड्याळे, ५ चांदीची कॉईन, रोख ७० हजार रुपये व एक हजार युएस डॉलर असा एकूण १५ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.
बाथरूममधून बाहेर आल्यावर त्या दाम्पत्याने आपल्या मुलाशी संपर्क साधून घडलेला प्रसंग त्याला सांगितला. पत्नीने पोलीसांकडे फिर्याद दिल्यानंतर त्या चोरांचा तपास सुरु झाला आहे.
ही शहरातील एक प्रातिनिधीक घटना आहे. शहरातील गर्दीपासून दूर रहाण्यासाठी अशा अनेक सोसायट्यांमधून माणसं माणसांपासून ‘अलिप्त’ राहू लागली. बंगला मोठा, रहाणारे दोघं तिघंच. बहुतेक दोघेही पती-पत्नी वयस्कर. कामाला एखादा नोकर किंवा स्वयंपाक करणारी बाई. मुलं परदेशात स्थायिक झालेली. त्यांचा व्हिडिओ काॅलवरुनच संपर्क. प्रत्यक्ष गाठभेट वर्षा दोन वर्षांनी एकदाच, तीही धावती. अशी अनेक वृद्ध जोडपी प्रभात रोड, सिंध सोसायटी, कोथरूड, बावधन, कल्याणीनगर, वारजे, धायरी, उंड्री, कोरेगाव पार्क परिसरात रहात आहेत.
उच्च मध्यमवर्गीय पती-पत्नी पन्नाशी गाठेपर्यंत स्वतंत्र बंगल्याचं स्वप्न साकारतात. एव्हाना त्यांची मुलं शिक्षण पूर्ण करुन परदेशात काही वर्षांसाठी शिकायला जातात, तिथेच त्यांना चांगली नोकरी मिळते. आई-वडिलांना मुलाच्या लग्नाचे वेध लागतात. ऑनलाईन लग्नाचं स्थळ शोधून एकदाचं घाईघाईत, भारतात लग्न उरकून दोघेही परदेशात जातात. त्यांच्या आई-बाबा होण्याच्या वेळी हे दोघे त्यांच्याकडे सहा महिन्यांसाठी जातात. आजोबा आजी होऊन, पुन्हा भारतात परततात. नातवंडांना मांडीवर खेळवण्याऐवजी, मोबाईलवरून त्यांच्याशी बोलत राहतात.
दोघांनाही निवृत्त झाल्यानंतर, मोठ्या बंगल्यातील रिकाम्या खोल्या खायला उठतात. ज्यांच्यासाठी बंगला बांधला, त्यांच्याशिवाय येणारा एकेक दिवस ढकलतात. आयुष्यभर एकेका वस्तूंची केलेली खरेदी, काही स्वप्नं उराशी बाळगून केलेली असते. भरजरी साड्यांनी भरलेले कपाट असते. कधी सूनबाई त्यातील एखादी साडी हौसेने नेसेल असं वाटत असतं, तर तिला साडीपेक्षा जीन्सवर टी शर्ट सोयीस्कर वाटत असतो.
जमेल तेव्हा गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर दागिन्यांची खरेदी करुन कपाटातील लॉकर भरलेला असतो. कधी सणासुदीला दागिने घालून मिरवायची स्वप्नं अधुरीच राहतात. वयोमानानुसार शुगर व बीपीने दोघांनाही गाठलेले असते. गोळ्या, औषधं, टेस्ट, चेकअप महिन्याला होत असतो. असं सुरळीत चालू असताना, एखादे दिवशी चोरी होते आणि घरातल्या मौल्यवान चीजवस्तू जातात. हातात काहीही न राहता फक्त जीव वाचल्याचे समाधान रहाते.
परवा व्हॉटसअपवर सुवर्णा निंबाळकर यांनी पाठवलेला ‘गरज’ नावाचा लेख, माझ्या वाचनात आला, तो आजच्या पिढीला विचार करायला लावणारा आहे. त्यात लिहिलं होतं की, एकाच्या आईचं ९५ व्या वर्षी निधन झालं. वडील आधीच गेले होते. ६५ वर्षांच्या त्यांच्या सहजीवनाचा विस्तार म्हणजे तीन मुली व दोन मुलं. आठ-दहा खोल्यांचा प्रशस्त बंगला, प्रत्येकाच्या स्वतंत्र बेडरुम, कपाटे, भरपूर कपडे. एखाद्या कार्यप्रसंगी शंभर माणसं जेवतील एवढी भांडी. हौसेने तीर्थयात्रा, पर्यटनाच्या वेळी आठवण म्हणून खरेदी केलेल्या शोभेच्या वस्तू. शिवाय आधीच्या पिढ्यांचे ऐवज, सामान व वस्तू.
आताच्या घडीला मुलं, मुली त्यांच्या संसारात मग्न. आईपश्चात रिकामे, प्रचंड घर आवरायला कुठून सुरुवात करावी हा त्यांच्यापुढे यक्षप्रश्न!
कपाटातील पांचशेंच्या वर साड्या आता कोणी स्विकारायला तयार नाही. शंभर माणसांच्या स्वयंपाकाची उस्तवार आता कोणी करणार नाही. जुनं अवाढव्य फर्निचर कुणाच्याही घरात मावणार नाही. किंमती शोभेच्या वस्तूंची काळजी घेणारं कोणीही नाही. मोठाले दागिने घालून मिरवणे, सांभाळणे आता सुरक्षित राहिले नाही. अडगळी साफ करायला तेवढी शारिरीक क्षमता नाही. असे अनेक नकार व फुल्या मारल्यावर जेवढे चांगले, ते गरजू संसारांना व सेवाभावी संस्थांना देण्यात आले. आठवण म्हणून आईची एक साडी घेण्यात आली. असे करता करता त्या संसाराची सात दशकांची घडी मिटवण्यात आली.
या उस्तवारीत प्रचंड मनस्ताप, कठोर निर्णय, नकार, शारीरिक व मानसिक कष्ट तसेच थकवा व ताण मुलांना सहन करावा लागला. ज्या पिढीने हे सगळं जमविण्याचा अट्टाहास करण्यासाठी कष्ट झेलले, ती पिढी काळाच्या पडद्याआड गेली. त्यानंतर हे सांभाळण्याची जबाबदारी कोणीही घेत नाही. तेव्हा आता यापुढे तरी, लागेल तेवढेच खरेदी करावे. आपल्यानंतर उपयोगी पडेल म्हणून जादा खरेदी करु नये. संसार सुटसुटीत करावा.
‘किमान गरजांची जीवनशैली’ ही काळानुसार अत्यावश्यक गरज आहे.
© सुरेश नावडकर
मोबाईल ९७३००३४२८४
२८-४-२१.
Leave a Reply