वडिलांचा अेक शुक्राणू आणि आअीची बीजांड पेशी यांचा संयोग झाला म्हणजे मानवाचा गर्भपिंड तयार होतो. त्यात वडिलांकडून आलेली 23 गुणसूत्रं आणि आईकडून आलेली 23 गुणसूत्रं असतात. या 46 गुणसूत्रांचा संच म्हणजे, तुमची ‘जात’. हीच, त्या अपत्याची म्हणजेच त्या व्यक्तीची निसर्गानं लिहीलेली खरी जन्मपत्रिका असते. हा संचच तुमचे सर्व गुणावगुण ठरवितो.
तुमच्या आअीवडिलांकडे ही गुणसूत्रं त्यांच्या आअीवडिलांच्या अनेक पूर्वजांकडून आलेली असतात. तुमच्या वंशवृक्षातूनच हे आनुवंशिक तत्व आलेलं असतं. धर्म मानवनिर्मित आहेत. तुमच्यात आलेल्या आनुवंशिक तत्वात, तुमच्या आअीवडिलांच्या धर्मांचा काहीही संबंध नसतो.
थोडक्यात म्हणजे तुमच्यात आलेले आनुवंशिक तत्व, (गुणसूत्रं आणि जनुकांसह) तुम्हाला जन्मतःच मिळते आणि ते तुमच्या मरणापर्यंत टिकते. जन्मतःच तुम्हाला जे जे मिळतं तेच तुमचं ‘जात’.
सख्या भावंडांची ‘जात’ देखील अलग अलग असते. प्रत्येक व्यक्तीची ‘जात’ वेगवेगळी असते. आअी-वडील, बहीण-भाऊ, मुलगा-मुलगी, या सर्वांचं ‘जात’ थोडेबहुत सारखं असलं तरी वेगवेगळे असतात. म्हणूनच त्यांच्या शारीरिक आणि मानसिक व्यक्तीमत्वात बराच फरक असू शकतो.
जात हा शब्द, संस्कृत जन..जा..म्हणजे जन्म घेणे या क्रियापदापासून आलेला आहे. त्यापासूनच. जन, जनता, जनक, जननी, पूर्वज, वंशज वगैरे शब्द आलेले आहेत.
तुम्हाला मिळालेले ‘जात’ तुमच्या वंशवेलीवरच अवलंबून असते, तुमचा पूर्वजन्म आणि त्याची कर्मे यावर अवलंबून नसते. आत्म्याच्या आनुवंशिक तत्व सिद्धांतानुसार तुम्हाला पूर्वजन्म किंवा पुनर्जन्म नसतो. तुमच्या आअी वडिलांचा जन्म हा, तुमच्या आनुवंशिक तत्वाचा पूर्वजन्म तर तुमच्या अपत्यांचा जन्म हा तुमच्या आनुवंशिक तत्वाचा पुनर्जन्म असतो.
तुमचा हा जन्म, पहिलाच आणि शेवटचाच जन्म असतो.
आपल्या पूर्वज विचारवंतांनी, आपल्या समाजात, चार वर्ण निर्माण केले. त्याचा चांगला परिणाम, शेकडो वर्षे झालाही असेल. पण आता जाणवतं की ती, फार मोठी समाजविघातक, चूक होती. ती आपण आता सुधारायला पाहिजे. आधार कार्डासारखं, प्रत्येक भारतीय व्यक्तीचं, DNA आरेखन करून जनुकीय कार्ड बनविलं तर प्रत्येकाची ‘जात’ कळेल.
मूळ गर्भपेशीपासून दोन पेशी, दोनाच्या चार, चाराच्या आठ अशा रीतीने पेशींच्या संख्येत वाढ होते. ठराविक पेशींपासून ठराविक अवयव निर्माण होतात. सुमारे 37 आठवड्यात हे द्विगुणन 47 वेळा होते आणि मानवाचा गर्भ, जन्म घेण्यास समर्थ होतो. त्याचे सर्व अवयव पूर्णतया निर्माण झालेले असतात. नवजात मानवी बालकात, 1 या आकड्यावर 14 शून्ये मांडून होणाऱ्या संख्येअितक्या पेशी असतात. जेव्हा गर्भाच्या फुफ्फुसांची पूर्ण वाढ होअून, गर्भाशयाबाहेर तो गर्भ श्वासोच्छ्वास करू शकेल अशी खात्री झाल्यावरच आअीच्या मेंदूस संदेश जातो आणि बाळंतपण होण्याच्या कळा सुरू होतात.
प्रत्येक गुणसूत्रावर हजारो जनुकं असतात. गुणसूत्र म्हणजे वेटोळ्यांच्या स्वरूपातील DNA रेणू असतो. जनुक म्हणजे DNA रेणूचा विशिष्ट भाग असतो आणि त्यावर विशिष्ट प्रथीन तयार करण्याच्या आज्ञावल्या असतात. .अशी हजारो जनुकं अेका DNA रेणूवर असतात म्हणजे DNA रेणू किती प्रचंड असतो याची कल्पना येअील.
स्त्री किंवा पुरुष, पूर्ण वाढ झाल्यावर, त्याची शारीरिक आणि मानसिक जडणघडण कशी असेल याचा परिपूर्ण आराखडा या जनुकांमुळे तयार झाला असतो. प्रत्येकाला हा सांकेतिक जनुकीय आराखडा सर्व गुणदोषांसह स्वीकारावाच लागतो. त्यात कोणताही बदल होत नाही.
सुमारे साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी या पृथ्वीतलावर सजीव निर्माण झाले. तेव्हापासून त्यांच्यातील आनुवंशिक तत्वच जन्म घेत घेत लाखो प्रजाती निर्माण झाल्या आणि शेवटी मानव अवतरला. हेच सत्य, 84 लाख योनीतून आत्मा गेला की मानवजन्म मिळतो या स्वरूपात आपल्या पूर्वज विचारचंतांनी सांगितला आहे. योनी म्हणजे प्रजाती आणि आत्मा म्हणजे आनुवंशिक तत्व असा अर्थ घ्यावयाचा आहे. 84 लाखाचं गणित मात्र त्यांनी सांगितलं नाही.
पृथ्वीवर सजीव जगण्याची परिस्थिती जोपर्यंत आहे तो पर्यंत आनुवंशिक तत्व जन्म घेतच राहणार आहे. आणि प्रत्येक सजीवाला ‘जात’ मिळतच राहणार आहे.
— गजानन वामनाचार्य
शनिवार 18 मार्च 2017
शनिवारचा सत्संग : 16
मूळ लेखन : 5 फेब्रुवारी 2012
Leave a Reply