उंच उंच आभाळात
सरळसोट
चढत गेलेला खांब;
ढगांना फाडून
वरती गेलेला,
जादूचा,
अर्ध्या रात्रीत
उभा झालेला.
खांबावर जॅक
सरसर चढतो,
ढगांच्याही वर,
काचेच्या पेंटहाऊसपर्यंत.
मऊ मऊ गालिचावर
पावलें वाजतच नाहींत,
दाणदाण काय,
अजिबातच नाहींत.
गरम गरम अन्न पुढे येतं,
पण जॅकला गिळतच नाहीं.
जॅक तसाच उठतो,
आणि कुरवाळत बसतो
सोन्याचं अंडं देणारी कोंबडी.
कोंबडीला कुरवाळून,
सुरक्षित दडवून,
जॅक मखमली पलंगावर पहुडतो,
पण त्याला झोप येत नाहीं.
घोरणं दूरच राहिलं,
साऽरखं कुशी बदलणंच चालू रहातं.
कुणी अचानक येऊन
कोंबडीला पळवून नेईल की काय,
हाच धसका
सारखा मनात दडलेला असतो.
बरोबरच आहे.
कोंबडी नसली, तर,
या जॅकमधे, आणि
दूरवर खाली
झोपड्यांच्या कळपात
अंगाची जुडी करून दाटीवाटीनं झोपलेल्या
जगू, जखू अन् जनूमधे
फरक तो काय ?
काल इथे,
या महालात,
एक राक्षस रहात होता म्हणे.
आज हा पठ्ठ्या रहातो –
हा जॅक.
जॅक ! कोंबडी सांभाळ !
सांभाळ कोंबडी !!
नाहींतर, उद्या
तुझ्या जागेवर कब्जा करेल
असाच कुणीतरी
दुसरा एखादा नवीन जॅक !
— सुभाष स. नाईक. मुंबई.
M- 9869002126.
Leave a Reply