माझं बालपण सदाशिव पेठेत गेलं. तेव्हा गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत, मनोरंजनाचे अनेक कार्यक्रम असत. पाचवीत असताना, शिवाजी मंदिरमध्ये मी जादूगार रघुवीर भिकाजी भोपळे यांचे जादूचे प्रयोग पाहिले.
त्या कार्यक्रमात, जादूचा प्रत्येक प्रयोग झाल्यानंतर रघुवीर, गंगेची प्रार्थना म्हणून एका रिकाम्या कळशीतून बादलीमध्ये पाणी ओतायचे.. कार्यक्रम संपेपर्यंत बादली पूर्ण भरुन जात असे.. कळशी मात्र रिकामीच असे.. हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले आहे!
२४ मे १९२४ रोजी रघुवीर यांचा जन्म पुण्याजवळील एका खेड्यात, सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. शिक्षणासाठी ते पुणे विद्यार्थी गृहात, आश्रमवासी म्हणून आले. माधुकरी मागून त्यांनी मॅट्रीकची परीक्षा दिली.
त्याकाळी रस्त्यावर मदारी, हातचलाखीचे प्रयोग करुन प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असत. असाच एका राजस्थानी जादूगाराचा खेळ, रघुवीर यांनी रस्त्यावर पाहिला. त्यांनी त्या ‘राणा’ नावाच्या जादूगाराला, मला जादू शिकवशील का? असे विचारले.. राणा तयार झाला. रघुवीर यांनी त्याच्याकडून जादू शिकल्यानंतर ८० वर्षांपूर्वी, पहिला जादूचा प्रयोग केला.
गानहिरा, हिराबाई बडोदेकर यांनी जादूगार रघुवीर यांचे जादूचे प्रयोग पाहून, त्यांना आपल्या सोबत आफ्रिकेच्या दौऱ्यावर नेले. तिथे त्यांनी जादूचे प्रयोग केले व तिकडील नवीन जादू, आत्मसात केल्या. असेच दौरे त्यांनी रशिया व जपानचेही केले. या परदेशी प्रवासाच्या अनुभवांचे, जादूगार रघुवीर यांनी ‘प्रवासी जादूगार’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला व त्याच्या हजारों प्रतींची विक्रमी विक्री झाली…
जादूगार रघुवीर यांचे व्यक्तिमत्त्व भारदस्त होतं. त्यांची उंची सहा फूट दोन इंच होती. डोळे निळसर रंगाचे होते. प्रथमदर्शनी त्यांची प्रेक्षकांवर छाप पडत असे. त्याकाळी पुण्यातील रस्त्यावरुन ते डोळ्यांवर काळी पट्टी बांधून, मोटर सायकल चालवायचे. वाटेत कुणी त्यांना हार घालण्यासाठी थांबला असेल तर तिथे थांबून त्याच्याकडून गळ्यात हार घालून घ्यायचे. पुलं, राजा गोसावी, बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते. आचार्य अत्रे यांनी, त्यांच्या ‘तो मी नव्हेच’ या नाटकातील राधेश्याम महाराजांची भूमिका करणाऱ्या प्रभाकर पणशीकर यांना जादूगार रघुवीर यांचेकडे जाऊन जादू शिकून घ्यायला पाठवले होते. जेणेकरून त्यांची ‘तोतया राधेश्याम’ची भूमिका सरस होईल..
जादूगार रघुवीर यांनी, त्यांच्या एकूण कारकिर्दीमध्ये ७,०२३ जादूचे कार्यक्रम केल्यानंतर १९७७ साली निवृत्ती स्वीकारली. त्याआधी त्यांनी १९६७ साली, भिकारदास मारुती जवळ ‘जादूची शाळा’ नावाचा, वरती जपानी पॅगोडा असलेला तीन मजली बंगला बांधला. तिथे जादूचे प्रयोग शिकविणारी संस्था सुरु केली. देशातील व परदेशातील कित्येकांनी इथे जादू शिकून घेतली.
२० ऑगस्ट १९८४ साली, भारतातील या पहिल्या व्यावसायिक मराठी जादूगाराचं निधन झालं.. आज त्यांची चौथी पिढी जादूच्या प्रयोगांचा वारसा अविरतपणे चालविते आहे..
मी नशीबवान, की जादूगार रघुवीर यांचे जादूचे प्रयोग अनेकदा पाहू शकलो.. आजही जादूगार रघुवीर हे नाव निघाल्यावर, त्यांचं भारदस्त व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभं राहतं..
त्यांना जाऊन अडतीस वर्ष झाली. त्यांच्यानंतर पी. सी. सरकार यांनी, देशभरातील थिएटरमध्ये जादूचे प्रयोग केले. कोल्हापूर येथील जादूगार भैरव यांनी टिळक स्मारक मंदिरात अनेकदा जादूचे प्रयोग केले. नंतर हळूहळू जादूचे प्रयोगातील ‘जादू’ कमी होऊ लागली. चोवीस तास टीव्ही सुरु झाल्यावर माणसं बाहेर पडेनाशी झाली.. काही परदेशी वाहिनींवर जादूचे प्रयोग घरात बसून पाहाता येऊ लागले..
आता माणूसच ‘जादूगार’ झालेला आहे.. आपल्या जवळच्या माणसांवर, तोच प्रयोग करु लागला आहे.. समाजात, राजकारणात ‘वन टू का फोर करणं’ त्याला सहज जमू लागलंय.. कुठेही जा, प्रत्येकाची ‘जादू’ चालूच आहे.. हातचलाखी पेक्षाही, चतुराईनं बोलण्याचं प्रमाण अधिक आहे..
चार दिवसांपूर्वी जादूगार रघुवीर यांची जयंती होती.. अशी थोर माणसं शतकांतून, क्वचितच जन्माला येतात. सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी अनेक संस्थांसाठी प्रयोग केले. त्यामुळेच आज त्यांना कोणीही विसरु शकत नाही..
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२८-५-२२.
Leave a Reply