नवीन लेखन...

जगमे रह जायेंगे, प्यारे तेरे बोल!

१९७६ ला मुकेशचे पार दूर देशी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आणि इकडे सोलापूरच्या दयानंदमधील आमच्या गॅदरिंग प्रॅक्टिसला मित्र अनिलला हुंदका आवरेना. तो आरके च्या ताज्या गाण्याची “इक दिन बिक जाएगा, माटी के मोल ” ( धरम -करम ) रिहर्सल करीत होता. त्यादिवशी एकट्या राज कपूरचा “आवाज ” गेला नाही. आम्ही आपोआप श्रद्धांजली मोडवर गेलो.

त्याही आधी ” रोटी कपडा मकान ” च्या ” मैं ना भुलुंगा ” वर माझा मामेभाऊ माझ्याशी भांडायचा. मला ते प्रियकर -प्रेयसीचं स्वप्नगीत वाटायचं ( अजूनही खूप लाडकं आहे माझं ) आणि त्याला ते रटाळ -लांबलचक फालतू वाटायचं.
मग मी मुकेशला तळाशी बंदिस्त करून टाकलं. बालपणापासून आजही तो रफी / किशोर पेक्षा माझा अधिक लाडका गायक आहे. ( भावाचा लाडका – रफी)

खरेतर त्या तीन महानायकांनी आपापले आवाज घट्ट धरून ठेवले होते – दिलीपसाठी शक्यतो रफी, देवसाठी ( आणि नंतर राजेश खन्ना साठी) किशोर, आणि राज ( नंतर मनोज कुमार) साठी मुकेश ! क्वचित एका कॅम्प मधून दुसरीकडे जाणे व्हायचे पण त्यासाठी एस डी सारखा एखादा खमक्या संगीत दिग्दर्शक लागायचा.

दुःख / वेदना हा मुकेशचा फोर्टे ! पण या एकाच भावनेच्या – विषाद, वैफल्य, निराशा, औदासिन्य, एकाकीपण अशा असंख्य छटा या माणसाने आरपार पोहोचविल्या. प्रत्येकवेळी वेगळ्या प्रकारे त्याने ही भावना हाताळली आणि त्यावर मांड ठोकली.

त्याच्यात आणि त्याच्या बहिणीत (लता ) कॉमन धागा म्हणजे – विरह/व्यथा. त्यामुळे ही भावंडं अभिन्न झाली. किशोर धसमुसळ्या /मिश्किल, रफी गंभीर तर मुकेश दर्दभरा !

जगातील सर्वात आदिम आणि चिरंतन भावना म्हणजे दुःख आणि त्यावर आपल्या किंचित ओल्या आवाजाने याने आपली नाममुद्रा कोरली. सुरुवातीला ऍक्टर व्हायला आलेला हा सद्गृहस्थ पण एका अनाहत नादाने त्याची गायक म्हणून निवड केली, आणि त्या एका होकारात त्याची गणितं बदलण्याचे सामर्थ्य होते. या वेगळ्या सर्जनशील वाटेवर त्याला भेटलेल्या भावनांच्या रंगांवर त्याने स्वतःला उधळत आपलं जीवन मात्र उजळवून टाकलं. दिलेल्या आयुष्यात, दिलेल्या गळ्यात आणि दिलेल्या अवकाशात तो समाधानी होता.

देव एखादी व्यक्ती एकदाच निर्माण करतो. त्याला स्वतःलाही ते रिपीट करता येत नाही. अन्यथा नितीन मुकेश (आणि गेला बाजार अमितकुमारही) उंचीला पोहोचला असता. आवाजावर निसर्गदत्त मर्यादा, पण त्याचेच त्याने संधीत रूपांतर केले आणि स्वतःचे अढळ आसन निर्माण केले. मुख्य म्हणजे आपल्या गायकीच्या मर्यादा त्याला माहित होत्या. तरीही ही व्यक्ती स्टुडिओत रेकॉर्डिंग करीत असेल तेव्हा मला वाटते सगळे निःशब्द आणि प्रवाहपतित होत असतील.

” संसार हैं एक नदिया “, ” ओ मेरे सनम, ” ” कई सदियोंसे “, ” आ अब लौट चले “, ” राम करे ऐसा हो जाय ” आणि शिरोमणी ” जाने कहा गयें वो दिन ” या गाण्यांमध्ये त्याच्या जागी कोणीच इमॅजिन करता येत नाहीए.

लता म्हणजे माझ्यासाठी ” ए मेरे वतन के लोगो “, किशोर म्हणजे फक्त ” वो शाम कुछ अजीब थी ” तद्वत मुकेश म्हणजे ” जाने कहाँ …. ! ”
या गीतातला भग्न, प्रयत्न करूनही हाती प्रेम न लागलेला कोरडाठक्क आवाज फक्त मुकेशला शक्य आहे. आपल्या काळजात कालवाकालव , समोर बसलेल्या तिन्ही प्रेयसींचे डोळे अंधारलेले,पण हा विमनस्कपणे रिकाम्या ओंजळी दाखविण्यात मग्न ! खरा राज कपूर आणि खरा मुकेश या गाण्यात भेटतो. कोणीतरी अज्ञातातून हाकारत त्यांच्याकडून हे गाणं करवून घेतलं असावं. इथल्या वेदनांना तोड नाही, किनारा नाही.

या पोस्टसाठी गेले दोन दिवस मी यू -ट्यूबवर असंख्य गायकांच्या आवाजातून मुकेशला शोधलं पण तो नाही भेटला. मुकेशची दर्दभरी उत्कटता फक्त त्याचीच – स्वतःच्या ठराविक चौकटीत आपल्याला जखडणारी I मी त्यातून बाहेर पडू शकत नाही -इच्छित नाही.
अमेरिकेतून परतताना कदाचित त्याच्याही निर्जीव ओठांवर असेल-

” आ अब लौट चले I”

शेवटी “लाख लुभाये महल पराये,अपना घर फिर अपना घर हैं I ” हेच चिरंतन सत्य मागे उरतं !
वेदनेचा शेवटचा सर्ग म्हणजे मुकेश आणि त्याचा आवाज !

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..