नवीन लेखन...

जगाला युद्ध नको बुद्ध हवा…..

बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण व उत्सव आहे. हा सण जगभरात विशेषत: भारतात वैशाख पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्‍ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत. आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतामुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुष व गुरू मानले जाते. संपूर्ण जगाला अहिंसा व सत्याची शिकवण देणारे तथागत गौतम बुद्ध हे महान भारतीय तत्वज्ञ होते. त्यांनीच बौद्ध धर्माची स्थापना केली. शाक्य गणराज्याचे राजे शुद्धोधन व महाराणी महामाया किंवा मायादेवी ह्यांच्या पोटी गौतम बुद्ध ह्यांचा जन्म झाला. त्यांच्या मातापित्यांनी त्यांचे नाव “सिद्धार्थ” असे ठेवले.
परंतु त्यांच्या जन्मानंतर काहीच दिवसात त्यांच्या मातेचे निधन झाले व त्यांचा सांभाळ त्यांच्या मावशीने म्हणजेच महाप्रजापती गौतमी ह्यांनी केला.त्यांच्याच नावावरून गौतम बुद्ध ह्यांना “गौतम” असे नाव मिळाले. गौतम बुद्ध ह्यांचा सांभाळ करणारी त्यांची दुसरी आई म्हणजेच मावशी महाप्रजापती गौतमी ह्या अर्हत पद प्राप्त झालेल्या महान भिक्खुणी होत्या. त्यांना जगातील पहिल्या भिक्खुणी मानले जाते.

पुढे त्यांचा यशोधरा ह्या राजकन्येशी विवाह झाला आणि त्यांना राहुल हा पुत्र झाला. महाज्ञानी गौतम बुद्ध ह्यांना जगातील दु:ख बघून संसारातून विरक्ती आली व त्यांनी सर्व ऐहिक सुखांचा त्याग करून बोधिवृक्षाखाली तपश्चर्या केली.

अविरत तपस्येनंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. आणि त्यांनी बौद्धधर्माची शिकवण देऊन जगाला जीवनाचा खरा मार्ग व उद्देश दाखवला.

“बुद्ध” हे नाव नाही तर ज्ञानाची उपाधी आहे, ‘बुद्ध’ या शब्दाचा अर्थ आहे ‘आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी’ आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्‍नांनी मिळवली आहे.‘संबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त स्वतः वर विजय मिळवलेला आणि स्वतः उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध, आणि ‘संमासंबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त असलेला, स्वतः सोबतच संपूर्ण जगाचा उत्कर्ष उद्धार करू शकणारा महाज्ञानी बुद्ध. बौद्ध अनुयायी लोक शाक्यमूनी गौतम बुद्धांना वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध म्हणजेच ‘संमासंबुद्ध’ मानतात. जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये तथागत बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात. त्यांनी संपूर्ण मानवजातीला सदधम्माचा मार्ग दाखविला .
भगवान बुद्धांनी मोक्ष देण्याचे आश्वासन दिले नाही ते म्हणत मी मार्गदाता आहे ,मोक्षदाता नाही .भगवान बुद्धाचा धम्म हा एक शोध आहे असे म्हणण्याचे कारण हे आहे की, पृथ्वीवरील मानवी जीवनाच्या सखोल अभ्यासातून तो उद्भवलेला आहे आणि ज्या स्वभाविक प्रवृत्तीनुसार मनुष्य जन्म घेतो त्याच्या क्रिया-प्रक्रिया यांना संपूर्णता समजून त्याचेवर विचार केल्याचा तो परिणाम आहे. त्याचप्रमाणे माणसाचा इतिहास व परंपरा यांच्या मुळे त्यांना मिळालेले इष्ट आणि अनिष्ट वळण त्यांच्या संशोधनाचा परिणाम म्हणजे बुद्ध धम्म होय.सर्वच प्रेषितांनी मोक्षाचे आश्वासन दिले आहे मुक्तिदाता असल्याचे सांगितले आहे .मोक्षाचे आश्वासन न देणारे धर्मसंस्थापक केवळ भगवान बुद्ध हेच एकमेव होऊन गेलेले आहेत. त्यांनी मोक्षदाता आणि मार्गदाता आता यामध्ये विभाजक रेषा काढली आहे तर दुसरा केवळ मार्ग दाखवणार आहे. भगवान बुद्ध हे केवळ मार्गदाता होते.मोक्ष हा ज्याचा त्याने त्याने आपल्या श्रमाने मिळवायचा असतो असे त्यांचे सांगणे होते.
संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांनी संपूर्ण मानव जातीला दुःखातून मुक्त होणारा मार्ग दाखविला .भ. बुद्धांनी सामान्य माणसाकरिता आपल्या शरिरावर नियत्रंण ठेवण्यासाठी व शाब्दिक कृती नियंत्रित करण्यासाठी, त्यापासून परावृत्त होण्याकरीता हे पाच गुण सांगितले आहेत. खालिल पाच शीलांची शिकवण तथागत बुद्धांनी आपल्या शिष्यांना दिली होती. सामान्यत: जगातील सर्व मानवजातीने पाच ही शीलाचे पालन करायला हवे .पंचशील ही बौद्ध धम्मातील एक आचरण नियमावली आहे. सामान्यत: पाच तत्त्वांना पंचशील म्हणून संबोधले जाते. पंचशील हे पाच नियम आहेत, पाच गुण आहेत.

पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ: मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.

अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ : मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.

कामेसुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामी’
अर्थ : मी व्याभिचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.

मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ : मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.

सुरा-मेरय-मज्ज पमादठ्ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ : मी मद्य, त्याचप्रमाणे मोहात पडणार्या इत्तर मादक वस्तूच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.

वरील पाच ही गुण महत्त्वाचे आहे. व्यक्तीने मन व शरीरावर संयम ठेवून हे पाचही शील आत्मसात केले तर ती व्यक्ती शीलवान बनते.

भगवान गौतमबुद्धांचे तत्त्वज्ञान सर्वव्यापी आहे. त्यांनी दुःखाचे कारण आणि त्यावरील उपाययोजना सांगितली. जीवन दुःखमय आहे, त्याचे कारण तृष्णा आहे. तृष्णेचा नाश केला तर दुःखातून मुक्ती मिळते. यावर अष्टांगिक मार्ग हा उपाय आहे. दुःख नष्ट करता येते, हा प्रयत्नवाद बुद्धांनी सांगितला.बुद्ध प्रयत्नवादी होते. पूर्वजन्माच्या कर्माचे फलित म्हणजे दुःख, या पारंपरिक अंधश्रद्धेला बुद्धांनी तिलांजली दिली. बुद्ध हे बुद्धिप्रामाण्यवादी होते.

ते अनित्यवादी आणि अनात्मवादी होते. घडणाऱ्या घटनांमागे शास्त्रीय कारण आहे, चमत्कार नाही. निसर्गामध्ये घडणाऱ्या घटनांचे शास्त्रीय विश्‍लेषण करणारे जगातील पहिले शास्त्रज्ञ म्हणजे बुद्ध. बुद्धांचे विचार, तत्त्वज्ञान आणि कार्य हे चमत्कारावर नव्हे, तर ज्ञानावर आधारलेले आहे.नीती व सदाचाराला महत्त्व देऊन मानवाचे जीवन सुखकर होण्यासाठी तसेच निवार्णाच्या समीप पोहोचण्यासाठी हा ‘अष्टांग मार्ग’ किंवा ‘मध्यम मार्ग’ सांगितला. अष्टांग मार्ग हा सदाचाराचा मार्ग होय. याला मध्यम मार्ग सुद्धा म्हणतात. ह्या आठ गोष्टींच्या पालनामुळे मानवाचे जीवन सुखमय होते. त्या गोष्टी अश्या :

सम्यक् दृष्टी :- निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे.

सम्यक् संकल्प :- म्हणजे योग्य निर्धार, विचार.

सम्यक् वाचा :- करुणायुक्त व सत्यपूर्ण वाचा (बोल) ठेवण्याचा प्रयत्‍न करणे.

सम्यक् कर्मान्त :- उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्ये करणे.

सम्यक् आजीविका :- वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता ती सन्मार्गानेच करणे.

सम्यक् व्यायाम :- वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे.

सम्यक् स्मृती :- तात्त्विक गोष्टींचे स्मरण करून चित्तास (मनाला) जागृत ठेवणे.

सम्यक् समाधी :- कोणत्याही वाईट विकारांचा स्पर्श होऊ न देता दुष्ट प्रवृत्तींपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे

आज जगभर हिंसेने थैमान घातले आहे. विचार मान्य नसणाऱ्यांच्या हत्या करणे, प्रतिपक्ष, प्रतिराष्ट्र यांना संपविण्यासाठी जग शस्त्रसज्ज झाले आहे. तेव्हा विनाशाच्या उंबरठ्यावरील जगाला वाचवायचे असेल, तर भगवान बुद्धाच्या अहिंसेची नितांत गरज आहे. राजा प्रसेनजिताला कन्यारत्न झाल्यानंतर तो निराश झाला, तेव्हा बुद्ध त्याला म्हणाले, ‘‘राजा, मुलगी झाली म्हणून दुःख करू नकोस. मुलगीदेखील मुलाप्रमाणेच वंशवर्धक आहे.’’  मुलगीदेखील मुलाप्रमाणेच कर्तृत्ववान आणि वंशवर्धक आहे, असा बुद्ध उपदेश करतात. ते मध्यममार्गी होते.

आज संपूर्ण जग कोरोना नावाच्या भयंकर युद्धाच्या दुःखामध्ये ओढलेलंआहे.जो तो आज आपले प्राण वाचवण्यासाठी आपला आप्तस्वकीयांच्या प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहे .पणे सगळेच सर्व चालू असताना कोणतीही गोष्ट नेहमीसाठी राहत नाही ती काही काही काळापुरती राहते हा निसर्गाचा नियम आहे त्यामुळे कोरोना नावाचा व्हायरस सुद्धा या जगातून लवकरच समूळ नष्ट होईल पण हे सर्व झाल्यानंतर माणसाला एक मोठा शिकवणीचा धडा मिळेल आणि जर त्याने धडा घेतला त्याला आत्मसात केला तरच पुढे माणूस हा चांगल्या पद्धतीने सन्मार्गावर जगू शकतो. कारण कोरोनाव्हायरस यायच्या आधी माणुस मोठ्या प्रगतीपथावर होतात सगळ्याच गोष्टी त्याच्या हातामध्ये होत्या पण हे सर्व असताना त्याने काय केले हे आत्मपरीक्षण करणे खूप मोठे गरजेचे आहे कारण माणूस हा मोठा प्रगतीच्या पथावर असतांना त्याने इतरांना काय दिले जगाच्या कल्याणासाठी काय दिले तो दुःखातून मुक्त होण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले तो कोणाकोणाच्या दुःखाचे कारण बनला त्यांनी स्वतः च्या स्वार्था पलीकडे जगाच्या कल्याणासाठी काहीतरी कार्य केले का या सगळ्या प्रश्नांचा विचार करावा आणि जेव्हा कोरोना नावाचे युद्ध आपण माणूस जिंकू तेव्हा या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी सगळेच प्रयत्न करूया कारण माणूस हा माणसासाठी आहे माणसाने चांगले कर्म करावे जे पेराल तेच उगवेल हा सृष्टीचा नियम आहे .त्यामुळे भगवान बुद्धाने सांगितलेला दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग मानव कल्याणासाठी कल्याणकारक मार्ग पंचशीलाचे पालन करणे , आर्यअष्टांगिक मार्ग समजून त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करने भगवान बुद्धांनी सांगितलेला मार्ग हा केवळ एका जातीधर्माचा नसून संपूर्ण मानवजातीच्या कल्याणार्थ आहे. ज्यामधून प्रत्येक मानवाला आपल्या जीवन सुखकर करण्याचा मार्ग मिळू शकते. आजच्या जीवनात भगवान बुद्धाचा धम्म हा सगळ्यांना सन्मार्ग दाखवत आहे .संपूर्ण जगामध्ये वाढणारी हिंसा, क्रूर प्रवृत्ती, असमाधान माणसांच्या दिवसेंदिवस वाढणार्या इच्छा , सगळ्या गोष्टी विनाशाकडे घेऊन जाणारे आहेत ज्यामुळे माणसाला सगळंच मिळत तर आहे पण त्याचे स्वार्थी प्रवृत्तीने त्याचे समाधान मात्र कुठेच होताना दिसत नाहीये.बघता बघता प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये आज क्रूरता आणि हिंसक वृत्तीचे दर्शन घडताना दिसत आहे त्यामुळे हे सगळे प्रवृत्ती माणसाने स्वतःच्या स्वार्थाचा पलीकडे गेल्यामुळे निर्माण झालेली आहे. माणसाला सगळंच मिळत आहे पण माणसे समाधान मात्र त्यांना कुठेतरी हरवलेला आहे माणसाची इच्छा इतक्या वाढत आहे दिवसेंदिवस त्याच्यावर त्याचे स्वतःचे तरी नियंत्रण आहे का? हा विचार त्याने करावा जेव्हा माणसाची इच्छा त्याच्या नियंत्रणात येतात माणूस सुखी राहतो.”बौद्ध धर्म तीन सिध्दांताची दिक्षा देतो; प्रज्ञा, करुणा आणि समता. बौद्ध धर्म जगातील शोषण थांबवू शकतो माझा असा विश्वास आहे की एक दिवस मानवतेच्या संरक्षणासाठी केवळ भारतच नव्हे तर सार्वजनिक बौद्ध धर्माचा स्वीकार करेल “.असे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जगातील सध्याची संपूर्ण परिस्थिती लक्षात घेता बौद्ध धम्म जगाला युद्ध पातळीवरून वाचवू शकते कारण कोरोणा नंतर कुठेतरी भयंकर युद्धाची लहर ऐकायला येईल या सगळ्या गोष्टी विश्वाच्या शांतीकडुन युद्धकडे नेणार्या आहेत विश्वाला युद्ध करणार्या मार्गाच्या आहेत आणि जगाला बुद्ध हवा युद्ध नको हे तत्वज्ञान समजणे संपूर्ण जगाला खूप महत्त्वाचे आहे.आणि तेव्हाच हे जग सावरू शकेल.

अॅड विशाखा समाधान बोरकर
रा.पातुर जि.अकोला

Avatar
About Adv Vishakha Samadhan Borkar 18 Articles
सामाजिक विषयावर लिखाण,कविता,कादंबरी,ललित लेखन करायला आवडत.
Contact: Facebook

1 Comment on जगाला युद्ध नको बुद्ध हवा…..

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..