OTT व्यासपीठावरील वेब सिरीज हळूहळू व्यसन बनत चालल्या आहेत. इथे व्यसन या शब्दाला थोडीशी सकारात्मक छटा मी देतोय कारण वर्षानुवर्षे मराठीमधील पाणी घातलेले डेली सोप आता डोकं उठवतात.( २-३ सन्माननीय अपवाद ) खुपसा धाडसी कंटेन्ट, नवनवे चेहेरे ,सशक्त आणि म्हटलं तर वेशीबाहेरचं, म्हटलं तर दैनंदिन कथानक आणि एकुणातील परिणाम म्हणजे डोके (चांगल्या अर्थाने) गरगरणे !
” कोटा फॅक्टरी ” ने अभियांत्रिकी शिक्षण /प्रवेश परीक्षा आणि तरुणांचे कोमेजणे दोन सेशन्स मधून प्रभावीपणे मांडले. आता बघितली – “द व्हिसल ब्लोअर ! ”
वैद्यकीय व्यवसायावर प्रवेश प्रक्रियेपासून प्रश्नचिन्ह लावणारी, डॉक्टरांमध्ये परंपरेने “देव ” पाहणाऱ्या आपल्या अंधश्रद्धांची “धज्जिया ” उडवणारी मालिका . आधीच व्यावसायिक अभ्यासक्रम अवघड – सोम्यागोम्या मंडळींना प्रवेशाचे दरवाजे बंद असलेले म्हणून कुप्रसिद्ध ! तेथे प्रवेश दुर्धर आणि ते अभ्यासक्रम पास होणे आणखीच कठीण ! हे “मिथ ” वसंतदादांनी महाराष्ट्रात १९८३ साली अंशतः फुसके ठरविले आणि गल्लीबोळात अभियांत्रिकी महाविद्यालये आणि तंत्रनिकेतने उघडायला परवानगी दिली. त्यांचे “गुणात्मक ” मूल्यांकन हा वेगळा विषय, पण त्यामुळे कोणालाही अभियंता होणे सहजशक्य झाले. वैद्यकीय क्षेत्रातही चोरवाटा शिरल्या पण वैद्यकीय महाविद्यालय काढणे हे बरीक अवघड/खूप खर्चिक म्हणून त्यांची संख्या थोडी मर्यादित !
भोपाळ (मध्यप्रदेशात) मध्ये २०१३ साली झालेल्या व्यापम (मध्य प्रदेश प्रोफेशनल एक्झामिनेशन बोर्ड) घोटाळ्याची पार्श्वभूमी लाभलेल्या या वेबसिरीजने वैद्यकीय प्रवेश परीक्षा, प्रवेश यातील काळ्या छटांवर प्रकाशझोत टाकलाय. प्रवेशपरीक्षांना “डमी ” परीक्षार्थी बसविणे ( त्यालाही “मुन्ना भाईची ” युगत वापरून – डॉक्टर लोकांना डमी बनवून परीक्षा केंद्रात पाठवायचे आणि त्याबदल्यात उकळलेल्या पैशातून या डॉक्टरांना “मेहनताना ” देणे ) आणि या मार्गाने अपात्र विद्यार्थ्यांना त्या प्रवाहात सोडणे. हे भयावह रॅकेट राजकीय व्यक्ती, संस्थाप्रमुख आणि त्यांच्या संघटना, व्यावसायिक, छोटे-मोठे अधिकारी यांच्या सहभागाने आणि संगनमताने चालते.
पेपर “डमी ” परीक्षार्थींनी लिहिण्याबरोबरच हॉल तिकीट मॅनेज करणे, रेडिमेड उत्तरपत्रिका पुरविणे असेही याचे कंगोरे आहेत. वेब सिरीज मध्ये तर खुल्लम खुल्ला पी जी च्या एकेका जागेचा दर ठरवून कोचिंग क्लासेसचा दुरुपयोग करून सगळी यंत्रणाच पद्धतशीर सडविणे हेही अधोरेखित केलेले आहे. “आतल्यांच्या ” मदतीशिवाय हे शक्य नाही. त्यांचेही दर ठरलेले ! एकेकाळचे “पवित्र ” शिक्षणक्षेत्र आता बाजारा सारखे होत चालले आहे. आता त्यांवर पात्र/योग्यता असलेल्या विद्यार्थ्यांचा विश्वास कसा बसणार? पडद्यामागचे हे हिडीस रूप ” कोटा फॅक्टरी ” आणि ” द व्हिसल ब्लोअर ” सारख्या मालिका आपल्या नजरेसमोर आणीत आहे. मप्र मधील घोटाळ्याचा सी बी आय वगैरे तपास होऊन काही अटक केलेल्या लोकांना शिक्षा वगैरे झाल्या आहेत. एस आय टी आणि सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण गेले. पण हे फक्त हिमनगाचे टोक असावे असा सगळ्यांचा दावा आहे. हे पी एम टी परीक्षांचे प्रकरण अपघाताने पृष्ठभागावर आले असले तरी फार पूर्वीपासून छुप्या पद्धतीने सुरु असावे असं मानायला हरकत नाही. ” जगी या गुंडपुंडांचा माजला पसारा सारा” असं दृश्य दिसत असता ५ सप्टेंबरला “कोठे वाकू नमस्कारा ” असा प्रश्न माझ्यासारख्याला विषण्ण करतो. सारेच असे नाहीत,नसतात हे मान्य, पण आजच टीव्ही वर बीड भागात (२०२२ साली) म्हाडा च्या परीक्षेत काही डमी परीक्षार्थ्यांना अटक झाल्याचे वृत्त वाचले. थोडक्यात काय तर व्यापम प्रकरण अजूनही देशभरात सुरु आहे आणि ठिकठिकाणी त्याचे हिमनग दृष्टीस पडताहेत.
संपूर्ण शिक्षण आम्ही “विद्यार्थी केंद्रित ” मानतो,तेव्हा त्यांनीच जागले होऊन या झोपेचे सोंग घेतलेल्या समाजाला हाकारायचे आहे. नाहीतर “द व्हिसल ब्लोअर ” मध्ये विद्यार्थी आत्महत्या दाखविलेल्या आहेतच.
– डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply