१६ व्या शतकातला मूळ आंध्र प्रदेशातील ब्राह्मण कुटुंबातील जगन्नाथ पंडितरायलू, उत्तरेत पंडितराज जगन्नाथ म्हणून ओळखला जातो. तो संस्कृत विद्वान, कवि व संगीतातील जाणकारही होता. पूर्व गोदावरी जिल्ह्यातील मुनिखंड अग्रहारचा हा पंडित त्याच्या कवित्व व पाण्डित्याला योग्य न्याय न मिळाल्याने जयपूरच्या गेला. नंतर तो काशी येथे रहात असे. मुघल सम्राट जहांगीर व शहाजहान यांच्या दरबारात त्याला स्थान होते. पर्शियन भाषेवरही त्याचे प्रभुत्व होते व त्याने शहाजहानच्या दरबारातील काझीला वादविवादात पराभूत केले होते. त्याबद्दल त्याला ‘पंडितराज’ असा किताबही मिळाला. दाराशुकोहही त्याचा स्नेही होता. शहाजहानची मुलगी लवंगीशी त्याने प्रेमविवाह केला होता. शहाजहानच्या मृत्यूनंतर मात्र औरंगजेबाने त्याची अवहेलना केली.
एका आख्यायिकेनुसार या छळामुळे जगन्नाथ पंडिताने गंगेत आत्मसमर्पण केले. गंगातीरी घाटावर बसून त्याने गंगालहरीचे पठण केले. प्रत्येक श्लोकागणिक गंगेची पातळी एक पायरी चढत गेली व शेवटच्या श्लोकाबरोबर तो गंगेच्या प्रवाहात सामावला गेला.
जगन्नाथ पंडिताने गंगालहरीखेरीज ‘रसगंगाधर‘ व ‘भामिनीविलास‘ या ग्रंथांसह इतरही अनेक, सुमारे १८ रचना केल्या आहेत.
गंगेची स्तुती व माहात्म्य अनेक कवी, विचारवंत, लेखक यांच्या कलाकृतीचा केंद्रबिंदू राहिलेले आहेत. या सर्व रचनांमध्ये जगन्नाथ पंडिताने रचलेले गंगालहरी हे आधुनिक संस्कृत काव्यांमधील मुकुटमणीच म्हटले पाहिजे. गंगेच्या स्तवनपर हे काव्य अत्यंत रसाळ, पदलालित्यपूर्ण व भावपूर्ण आहे. माधुर्य व आर्तता हे त्याचे स्थायीगुण आहेत. त्याच्या आत्मविश्वासाला काही समालोचकांनी अहंकाराचा दर्प असे संबोधून तो त्याला शोभून दिसतो असेही म्हटले आहे. काहींनी ‘जगन्नाथ’ या नामावर केलेल्या श्लेषातून (श्लोक ३६ व ४७) अहंकाराचा तर ‘नृपतिरमणीनां कुचतटी’(श्लोक ७) वर रंगेलपणाचे आरोप केले आहेत. ते दुर्दैवी म्हटले पाहिजेत. अनुप्रासालंकार पदोपदी प्रकट करण्यात त्याचा हात धरणारा क्वचितच ! दुस-या श्लोकातला ‘द’, तिस-यातील ‘अंग’, तर विसाव्यातील ‘ल’ ही याची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. अनुप्रास व ध्वनिपदांची लयबद्धता याबाबतीत तो जयदेवाच्या तोडीस तोड म्हणावयास हरकत नाही. या काव्यातील बहुतेक सर्व श्लोक शिखरिणी वृत्तात रचले आहेत. भक्तिभाव, आर्तता, कारुण्य यांना उठाव देण्यास हे वृत्त खचितच आधारभूत आहे. याखेरीज इंद्रवज्रा, पृथ्वी, शार्दूलविक्रीडित इत्यादी वृत्तांचाही वापर केला आहे.
प्रशंसा, प्रार्थना, याचना, आर्तता, कारुण्य, लडिवाळपणा(श्लोक २४,३१,४६), असे अनेक भाव या काव्यात प्रकर्षाने आढळतात. काव्याची सुरुवात गंगास्तुतीपर श्लोकाने झाली आहे. शंकराच्या मस्तकी आरूढ झाल्याने पार्वतीच्या मनातील गंगेबद्दलचा सवतीमत्सर, तसेच शंकर पार्वतीचा सारीपाट व शंकराची हार ही कवींची आवडती कल्पना येथेही ३,१२,४०,५१ या श्लोकांमधून दिसून येते. ४९ व्या श्लोकात गंगेला शंतनूची भार्या असे संबोधले आहे. परंतु ते मुख्यतः ‘शं तनोः’ या शब्दांशी साधर्म्य साधण्यासाठी असावे असे वाटते. भौतिक आयुष्यात कराव्या लागणा-या तडजोडी व त्यातून जगन्नाथ पंडिताला आलेली उद्विग्नता १९,३१,३७,४६ या श्लोकांमधे अगदी स्पष्ट दिसते.
गंगालहरी- गद्य व पद्य स्वैर भावानुवाद
१. समृद्धं सौभाग्यं सकलवसुधायाः किमपि तन्
महैश्वर्यं लीलाजनितजगतः खण्डपरशोः ।
श्रुतीनां सर्वस्वं सुकृतमथ मूर्तं सुमनसां
सुधासोदर्यं ते सलिलमशिवं नः शमयतु ॥ ०१
मराठी – (हे गंगे), सर्व जगाचे जणू महासौभाग्य असलेले, सहजगत्या जगताची निर्मिती करणा-या महादेवाला भूषणास्पद असणारे, वेदादि पवित्र ग्रंथांचे सारच असलेले, सज्जनांच्या पुण्याईचे रूप साकार करणारे आणि अमृताशी बंधुभाव सांगणारे हे तुझे जल आमच्या पापाचे शांतवन करो.
जगाचे जे येथे सकल शुभ सौभाग्य विलसे
महेशाच्या लीलेतुनि जगति ऐश्वर्य विकसे ।
श्रुतींचे साकल्य, सुजन सुकृती जेवि प्रकटे
जलें शांती होवो, अमृतसम जे, पातक फिटे ॥ ०१
२. दरिद्राणां दैन्यं दुरितमथ दुर्वासनहृदां
द्रुतं दूरीकुर्वन् सकृदपि गतो दृष्टिसरणीम् ।
अपि द्रागाविद्याद्रुमदलनदीक्षागुरुरिह
प्रवाहस्ते वारां श्रियमयमपारां दिशतु नः ॥ ०२
मराठी – एकदाच नजरेला पडल्यावर जो दीनांची दयनीय अवस्था, तसेच दुष्टांचे पाप तातडीने दूर करतो, गुरुप्रमाणे अज्ञानवृक्षाचा नाश करण्यास शिकवितो, तो तुझा जलप्रवाह आमचा अपार उत्कर्ष घडवून आणो.
विपन्नांच्या व्याधी, मलिन कलुषा कृष्णहृदयी
पडे दृष्टीलागी, हरण करिसी स्वल्प समयी ।
गुरू हा तोडाया शिकवि जणु अज्ञानतरुला
अशा धारा आम्हा अमित धन देवोत सकला ॥ ०२
३. उदञ्चन्मार्तंडस्फुटकपटहेरम्बजननी-
कटाक्षव्याक्षेपक्षणजनितसंक्षोभनिवहाः ।
भवन्तु त्वङ्गन्तो हरशिरसि गङ्गातनुभुव-
स्तरङ्गाः प्रोत्तुङ्गा दुरितभयभङ्गाय भवताम् ॥ ०३
मराठी – पार्वतीच्या, उगवत्या सूर्यासारख्या लाल, संतप्त नजरेने जेथे अधिकच खळबळ उडते, अशा महेशाच्या मस्तकावरील गंगेच्या प्रवाहाच्या उंच उंच लाटा तुमचे कुकर्मांचे भय नष्ट करण्यास कारणीभूत होवोत.
पहाटेच्या बिंबासम नगसुताक्रोध नजरे
झणी लोळाने त्या खळबळ प्रवाहात उभरे ।
महेशाच्या माथा उठति बहु लाटा खळखळा
करू दे पापांचे भयहरण तुम्हास सकळा ॥ ०३
४. तवालम्बादम्ब स्फुरदलघुगर्वेण सहसा
मया सर्वेऽवज्ञासरणिमथ नीताः सुरगणाः ।
इदानीमौदास्यं भजसि यदि भागीरथि ! तदा
निराधारो ! हा रोदिमि कथय केषामिह पुरः ॥ ०४
मराठी – हे भागीरथी, तुझ्यावर विसंबून मी अत्यंत घमेंडीने फुगून गेलो आणि अविचाराने सर्व देवांना अवमानपूर्वक बाहेरचा रस्ता दाखवला. आता जर तू (माझ्याबाबतीत) अनास्था दाखवलीस, तर पोरका झालेला मी इथे कोणासमोर रडू (हात पसरू) ? सांग !
विसंबोनी ठायी तव, मम मनी गर्व उसळे
अवज्ञेच्या मार्गी ढकलुनि दिले देव सगळे ।
जरी आता गंगे फिरवुनि मुखा दूर बघसी
पुढे कोणा गाळू नयन, नच आधार मजसी ॥ ०४
५. स्मृतिं याता पुंसामकृतसुकृतानामपि च या
हरत्यन्तस्तन्द्रां तिमिरमिव चन्द्रांशुसरणिः ।
इयं सा ते मूर्तिः सकलसुरसंसेव्यसलिला
ममान्तःसन्तापं त्रिविधमथ पापं च हरतु ॥ ०५
मराठी – जसा चंद्रकिरणांचा झोत अंधाराचा नाश करतो, त्याप्रमाणे ज्याचे (नुसते) स्मरण, पुण्यकर्मे न करणा-या जनांच्या मानसिक ग्लानीचा नाश करते, ते हे तुझे प्रवाहरूप, ज्याचे जल सर्व देव आवडीने प्राशन करतात, माझ्या अंतरीचा दाह आणि तिन्ही प्रकारची पापे नष्ट करो.
जसे इंदूरश्मी तिमिर, स्मरणे नष्ट करिते
विषादा लोकांच्या सुकृत कधि हाती न घडते ।
तुझी धारामूर्ती, सुरगण मुदे सेविति जला
तिन्ही पापे माझी हरुनि मिळु दे शांति मजला ॥ ०५
६. अपि प्राज्यं राज्यं तृणमिव परित्यज्य सहसा
विलोलद्वानीरं तव जननि तीरं श्रितवताम् ।
सुधातः स्वादीयः सलिलभरमातृप्ति पिबतां
जनानामानन्दः परिहसति निर्वाणपदवीम् ॥ ०६
मराठी – हे आई, जे राजे आपली महान साम्राज्ये कस्पटाप्रमाणे मानून सोडतात, (आणि) जेथे वेतांची वने डुलत आहेत अशा तुझ्या काठी आसरा घेतात, तुझे अमृताहून अधिक गोड पाणी पोटभर पिऊन तृप्त होतात, त्या लोकांचा आनंद मोक्षाचाही उपहास करतो.
महासाम्राज्येही तृण समजुनी त्याग करुनी
तुझ्या तीरी वेळू विपिनि झुलत्या वास करुनी ।
सुधेहूनी गोडी अधिक जल प्राशून मिळते
भरे तृप्तीने मानस, चिरसुखा तुच्छ गणते ॥ ६
७. प्रभाते स्नान्तीनां नृपतिरमणीनां कुचतटी-
गतो यावन्मातर्मिलति तव तोयैर्मृगमदः ।
मृगास्तावन्वैमानिकशतसहस्रैः परिवृता
विशन्ति स्वच्छन्दं विमलवपुषो नन्दनवनम् ॥ ०७
मराठी- हे आई, सकाळी स्नान करणा-या राण्यांच्या स्तनांवर लावलेली कस्तूरी ज्याक्षणी तुझ्या प्रवाहात मिसळते, त्याच क्षणी (ज्यांच्या नाभीपासून कस्तूरी निघाली) ते शरीर पवित्र झालेले मृग, देवादिकांच्या घोळक्यातून अत्यानंदाने नंदनवनात प्रवेश करतात.
सकाळी स्नानाला जंव उतरती राजवनिता
उटीची कस्तूरी तव जलप्रवाही मिसळता ।
मृगांनाही वेढी सुरगण जथा फेर धरुनी
झळाळोनी कांती मुदित शिरति नंदनवनी ॥ ०७
******************
— धनंजय बोरकर (९८३३०७७०९१)
I like the 4th Lahari and the 6th Lahari translation as well as original. It is easy for a layman to read Marathi. The marathi गद्य interpretation is equally interesting to read.
Simply great. Atyuchcha koti che Marathi kavya je geya (gata yete) ahe.