नवीन लेखन...

जगन्नाथपंडितकृत गंगालहरी – स्वैर मराठी भावानुवाद भाग ३

२१

समुत्पत्तिः पद्मारमणपदपद्मामलनखात्-
निवासः कन्दर्पप्रतिभटजटाजूटभवने ।
अथायं व्यासङ्गो हतपतितनिस्तारणविधौ
न कस्मादुत्कर्षस्तव जननि जागर्तु जगति ॥ २१

मराठी– हे माते, तुझा उगम रमापति श्रीविष्णूच्या चरणकमलाच्या शुभ्र नखापासून (झाला आहे), तर तुझी वस्ती मदनाचा विरोधक असलेल्या (शंकराच्या मस्तकावरील) जटांच्या बंधनात आहे. मग (असे असूनही) ही तुझी दीन पातकी लोकांची मुक्तता करण्याच्या कार्याची तळमळ जगात सदैव का जागृत रहाणार नाही?

तुझी उत्पत्ती श्रीपतिपदनखातून, वसती
महेशाच्या माथा नित कचजटाबंद अससी ।
परी पापी लोकां तळमळ बहू मुक्त करण्या
न का कीर्ती राहे जननि जगती नित्य स्मरणा ? ॥ २१

२२.
नगेभ्यो यान्तीनां कथय तटिनीनां कतमया
पुराणां संहर्तुः सुरधुनि कपर्दो॓ऽधिरुरहे  ।
कया वा श्रीभर्तुः पदकमलमक्षालि सलिलै-
स्तुलालेशो यस्यां तव जननि दीयेत कविभिः  ॥२२

मराठी– हे स्वर्गंगे, सांग बरे, पर्वतातून वाहणा-या नद्यांपैकी कोणत्या (दुस-या) नदीने (त्रि)पुरांचा नाश करणा-याच्या बांधलेल्या जटांवर आरोहण केले आहे किंवा कोणी श्रीहरीचे चरणकमल (आपल्या) पाण्याने प्रक्षालन केले आहेत ? हे माते, तुझ्याशी जिची किंचितही तुलना करावी असे कवींना काहीही दिसत नाही.

नगामाजी जाती बहुत सरिता, कोण दुसरी
जटाबंधामाजी चढुनि परि बैसे हरशिरी ।
असे अन्या कोणी हरिचरण प्रक्षालन करी
कवींना काही ना उमज तुलना किंचित तरी ॥ २२

२३.

विधत्तां निःशंकं निरवधिसमाधिं विधिरहो
सुखं शेते शेतां हरिरविरतं नृत्यतु हरः ।
कृतं प्रायश्चित्तैरलमथ तपोदानयजनैः
सवित्री कामानां यदि जगति जागर्ति जननी ॥ २३

मराठी–  खरोखर, जर या जगात गंगामैय्या जागृत असेल तर, जगन्निर्मात्याने निर्धास्तपणे अखंड समाधी लावावी, श्रीविष्णूने सुखाने शेषावर आराम करावा, (आणि) महादेवाने सदैव नर्तन करावे. खरं तर, (या तिघांचीही कामे गंगाच करीत असल्याने),प्रायश्चित्ते,तप,दान किंवा यज्ञयाग करणे (आता) पुरे !

नको शिक्षा दाने तपहि, जगती जागृत जरी
असे गंगामैय्या, अविचल समाधी दृढ खरी ।
विधी लावो, विष्णू भुजगशयनी सौख्य मिळवो
महादेवा, माते, अविरत गती नृत्य सुखवो ॥ २३

२४.

अनाथः स्नेहार्द्रां विगलितगतिः पुण्यगतिदां
पतन्विश्वोद्धर्त्रीं गदविगलितः सिद्धभिषजम् ।
सुधासिन्धुं तृष्णाकुलितहृदयो मातरमयं
शिशुः संप्राप्तस्त्वामहमिह विदध्याः समुचितम् ॥ २४

मराठी– हे आई, मी अनाथ, तू दयाळू; मी गति खुंटलेला, तू पुण्यप्रद गति देणारी; मी अधःपात होत असलेला, तू सकल जगताचा उद्धार करणारी; मी रोगग्रस्त, तू विख्यात चिकित्सक; माझे मन तहानेने व्याकुळ झाले आहे तर तू अमृताचा सागर. मी हा बालक तुझ्यापाशी आलो आहे. (आता) जे योग्य वाटेल ते कर.

अनाथा तू वाली, मज अगतिका मार्ग शुभ दे
पडे त्या उद्धारी, विकृति हरिसी तज्ञ भिषजे ।     (विकृति- रोगभिषज- वैद्य)
तृषेने मी चित्ती जननि बहु व्याकूळ असता
सुधेचा सिंधू हो, तुजसि करि वाटेल उचिता ॥ २४

२५.

विलीनो वै वैवस्वतनगरकोलाहलभरो
गता दूता दूरं क्वचिदपि परेतान्मृगयितुम् ।
विमानानां व्रातो विदलयति वीथीर्दिविषदां
कथा ते कल्याणी यदवधि महीमण्डलमगात् ॥ २५

मराठी– ज्या वेळपासून तुझी शुभप्रद कथा पृथ्वीवर अवतरली आहे, तेव्हापासून (तू सर्वांना मुक्ती दिल्यामुळे) यमाच्या नगरीतील गडबडगोंधळ थांबला आहे, मृतदेह मिळविण्यासाठी यमदूत काही वेळा दूरवर गेले आहेत. विमानांचा घोळका स्वर्गात येण्याचा देवांचा रस्ता बंद करीत आहे.

कथा जेवी आली शुभप्रद तुझी भूमिवरती
तसा थांबे कोलाहल यमपुरी आणि भवती ।
यमाच्या दूतांची फरपट बहू प्रेत न मिळे
विमानांची गर्दी पथ सुरपुरी बंद सगळे ॥ २५

२६.

स्फुरत्कामक्रोधप्रबलतरसंजातजटिल-
ज्वरज्वालाजालज्वलितवपुषां नः प्रतिदिनम् ।
हरन्तां सन्तापं कमपि मरुदुल्लासलहरि-
च्छटाचञ्चत्पाथः कणसरणयो दिव्यसरितः ॥ २६

मराठी– कामक्रोधादि (विकार मनात) अत्यंत उफाळल्याने त्यांच्या बिकट ज्वाळा भडकून त्यांच्या जाळ्यात अडकल्याने ज्यांच्या शरीराचा प्रत्यही दाह होत आहे अशा आमचा ताप, वा-याच्या खेळामुळे तुझ्या जलातून जे तुषारांचे फवारे उधळतात, ते शांत करोत.

मनी कामक्रोधानल उसळुनी उंच भडके
तया जाळामाजी बिकट मम कायाहि अडके ।
फवारे वा-याने फुलति जलबिंदूहि उडती
तयाने दाहाचे शमन करु दे शांत तनु ती  ॥ २६

२७.

इदं हि ब्रह्माण्डं सकलभुवनाभोगभवनं
तरङ्गैर्यस्यान्तर्लुठति परितस्तिंदुकमिव ।
स एष श्रीकण्ठप्रविततजटाजूटजटिलो
जलानां संघातस्तव जननि तापं हरतु नः ॥ २७

मराठी– तिन्ही जगतांचा विस्तार ज्याच्या अंतरी सामावलेला आहे, ते हे ब्रह्मांड तुझ्या पाण्यात एखाद्या टेंबुर्णीच्या फळाप्रमाणे हेलकावते. हे माते, तुझा तो, श्रीशंकराच्या अत्यंत विस्तीर्ण पसरलेल्या केशपाशात अडकणारा, साठा (प्रवाह) आमचा ताप हरण करो.

समावोनी पोटी सकल जगता डोलत जले
जणू टेंबुर्णीच्या फलसमचि ब्रह्मांड दिसले । (तिंदुक- टेंबुर्णी)
जया मार्गा रोधी हर फुलवुनी केस अपुले
जलाचा हा साठा हरण करु दे त्रास सगळे ॥ २७

२८.

त्रपन्ते तीर्थानि त्वरितमिह यस्योद्धृतिविधौ
करं कर्णे कुर्वन्त्यपि किल कपालिप्रभृतयः ।
इमं तं मामम्ब त्वमियमनुकम्पार्द्रहृदये
पुनाना सर्वेषामघमथनदर्पं दलयसि ॥ २८

मराठी– ज्याचा उद्धार करण्याचे बाबतीत  विविध तीर्थक्षेत्रे हैराण होतात, शंकरादि देवही कानावर हात ठेवतात, अशा मला, हे हृदयात दयाबुद्धी असलेली आई, तू पापविमोचन करणा-या सर्वांचा गर्व हरण करून पावन करतेस.

टीप- येथे मोरोपंतांच्या ‘केकावली’तील ‘कर श्रवणि ठेविते नुघडि नेत्र घे भीतिला’ या चरणाची आठवण होते. फरक इतकाच की येथे शंकराने कानावर हात ठेवले आहेत, तर ‘केकावली’त गंगेने कानावर हात ठेवले आहेत.

विचारे मोक्षाच्या शरम मनि तीर्था सकळही
करे काना झाकी सगणप्रभृती देवगणही  । (सगण=शंकर)
करीसी उद्धारा जननि करुणापूर्ण हृदये
तयांच्या गर्वाचे हरण करिसी खास सदये ॥ २८

२९.

श्वपाकानां व्रातैरमितविचिकित्साविचलतै-
र्विमुक्तानामेकं किल सदनमेनः परिषदाम् ।
अहो मामुद्धर्तुं जननि घटयन्त्याः परिकरं
तव श्लाघां कर्तुं कथमिव समर्थो नरपशुः ॥ २९

मराठी– (अनेक कृत्ये करण्याबद्दल) अमाप चर्चा करूनही विचलित राहिल्याने जी पापे अनेक दुर्व्यवहारींच्या गटांनीही सोडून दिली, अशा पापांचे जणू (माहेर)घरच असा जो मी, त्या माझाही उद्धार करण्यास कंबर कसणा-या तुझी स्तुती करण्यास (हा) नरपशू कसा समर्थ असेल ?

बहू चर्चे पापे करिति नच चांडाल गट जी
अशी माझ्या ठायी अनुपम अघांचीच वसती ।
अशांच्या उद्धारा कसुनि कटि तू सिद्ध अससी
स्तुतीपुष्पे वाहू नरपशु कशी आज तुजसी ॥ २९

३०.

“ न कोप्येतावन्तं खलु समयमारभ्य मिलितो
यदुद्धारादाराद्भवति जगतो विस्मयभरः ” ।
इतीमामीहां ते मनसि चिरकालं स्थितवती-
मयं संप्राप्तोऽहं सफलयितुमम्ब प्रणय नः ॥ ३०

मराठी–  “ खरोखर, या काळाच्या सुरुवातीपासून (अनादि काळापासून) मला असा कोणीच मिळाला नाही, ज्याचा उद्धार करून या जगाला तात्काळ थक्क करून सोडता येईल ” या तुझ्या मनात फार काळापासून असलेल्या आकांक्षेची पूर्तता करण्यासाठी हा मी आलो आहे. हे आई, मजवर संतुष्ट हो.

मिळे अद्यापी ना मजसि बहु पापी कुणितरी
जया उद्धारूनी चकित जगता मी झडकरी ”।
अशी कांक्षा माते तव मनि वसे फार समया
मला मोक्षा देई, सफल तव हो तोष हृदया  ॥ ३०

— धनंजय बोरकर
९८३३०७७०९१

धनंजय मुकुंद बोरकर
About धनंजय मुकुंद बोरकर 60 Articles
व्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.

1 Comment on जगन्नाथपंडितकृत गंगालहरी – स्वैर मराठी भावानुवाद भाग ३

  1. जगन्नाथ पंडित यांच्या गंगालहरी चा आमचे परम मित्र श्री धनंजय बोरकर यांनी केलेला स्वैर मराठी भावानुवाद फार छान आहे. त्यावर भाष्य करण्याची आमची पात्रता नाहीं.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..